Saturday, August 9, 2008
प्रदीप पटवर्धनांमुळे सुसह्य होणारे नाटक "आम्ही शहाणे'
आम्ही शहाणे' या नाटकात नूतन जयवंत, प्रदीप पटवर्धन अणि मैथिली वारंग
.............................................................................
सुखी संसारात थोडा निवांतपणा हवाच. तो मिळविण्यासाठी चाललेली या तरुण जोडप्याची धावपळ आणि त्यातूनच कधी मित्राचा अतिस्नेह, तर कधी सासू-सासऱ्यांची एंट्री. डॉ. यश आपटेंच्या जीवनात सुगंधी हवा येते ती मेहुणीच्या 'आयटम' रूपात. अलीकडच्या जमान्यातली ही मेहुणी जीजूच्या- जीजू मेहुणीच्या स्पर्शाने बहरतात. आणि सुरू होतो या साऱ्या शहाण्यांचा खेळ.
नाटकातला काही अंश पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
डॉ. अविनाश कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित "आम्ही शहाणे' यात प्रदीप पटवर्धन यांच्या खांद्यावर नाटकाचा सारा भार पेलण्याचा प्रयत्न केला आहे. नाटक हसवते. कधी गंभीरही बनवते. पण शहाण्यांच्या खेळात नेमके काय सांगायचे तेच कळत नाही. रंगमंचावर कलावंत आपापल्या भूमिका करतात खरे; पण नेमका विषय बाहेर येत नाही. अनेक मालिकांचे वेगवेगळे एपिसोड आपण पाहत आहोत असा भास नाटक पाहताना होतो.
संजय बांदेकर यांनी "नउनी' निर्मित हे नाटक सादर केले आहे. नाटकाच्या नामावलीत प्रथमच लेखक (डॉ. अविनाश कुलकर्णी) वेगळा आणि नाट्यरूपांतर करणारे (अनंत सुतार) दुसरे, अशी नावे दिसतात.
बायकोपेक्षा मेहुणी बरी अशाच थाटात पहिला अंक होतो. तर दोन्ही मुली असलेल्या आई-वडिलांची वानप्रस्थाश्रमात जायची तयारीही होते. त्यांचे नेमके दुःख काय आणि कशामुळे या प्रश्नाला स्पर्श करून नाटक पुढे जाते. स्वतःच्याच मुलीला आयटम म्हणणाऱ्या बापाची तिच्या लग्नासाठी चाललेली धावपळ दिसते. तर बहिणीच्या प्रेमलीला पाहून अवाक झालेली मेहुणी प्रकट होते.अखेरीस डॉक्टरांच्या मित्राच्या जादुई प्रेमात मेहुणी सापडते आणि हे शहाणे म्हणवणारे कुटुंब आनंदात गाणे म्हणत नाटक संपते.
नाटक सारे फिरते ते डॉ. यश आपटे अर्थात प्रदीप पटवर्धन यांच्याभोवती. ते ज्या ताकदीने आणि प्रसंगी ज्या टायमिंगने ह्युमर डेव्हलप करतात ते पाहण्यासाठी तरी नाटक अनुभवायला हवे.
प्रदीप पटवर्धन यांची भूमिका पाहताना त्यांच्याकडे असलेली अभिनय क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही अशी खंत व्यक्त करावीशी वाटते. विनोदाची, संगीताची आणि तेवढीच गंभीर अशी वेगळी भूमिका त्याच्यासाठी लिहायला हवी. त्यांच्याशी बोलतानाही हे जाणवले. सुलेखा या डॉक्टरांच्या पत्नीच्या रूपात मनापासून दाद दिलीय ती मैथिली वारंग यांनी. सहजता हे त्याच्या भूमिकेचे वैशिष्ट्य आहे.
आयटम म्हणून ज्यांना दाखविले आहे त्या नूतन जयवंत भूमिकेची गरज पूर्ण करतात. स्वतःला त्या आकर्षकपणे पेश करतात. जीजूशी असलेली जवळीक आणि सौंदर्याचा स्पर्श लाभणे हा गुन्हा आहे काय, असा सवालही त्या करतात.
बऱ्याच वर्षांनंतर रंगमंचावर अवतरलेले कलावंत म्हणजे जनार्दन परब. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनप्रमाणे ते वावरतात. वरवर बावळट; पण आत अस्सल असलेला हा बाप ते छान खुलवितात. त्यांच्या पत्नी झाल्यात सुलभा मंत्री. सुचित जाधवची हिरोगिरी नाटकाला पोषक ठरते.
प्रसाद वालावरकरांचे नेपथ्य पात्रांना वावरायला आणि त्यांच्या श्रीमंती थाटाचे दर्शन घडवायला पुरेसे आहे.
प्रकाश, संगीत या नाटकाला पोषक आहे.
हे कधीतरी आपण कुठल्यातरी नाटकात अनुभवले आहे, असे सतत वाटत असताना नाटक पुढे सरकते. ते खिळवत नाही; पण वेळ मजेत घालवेल.
सुभाष इनामदार
mail - subhashindmar@esakal.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment