Wednesday, July 7, 2010

भक्तिचा हा सागर ...


टाळांच्या नादाने . वारकरी पंथाच्या अभंगाने. भुरळ पडते. हरपून जातो.
पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील एका दिंडीत आजही मी मनाने आहे.
वारकरी पंथांचे भजन चालता-चालता ते गात होते. काय सूर होता खडा. काय नाद होता . संथ ..तरीही टाळांच्या एकेक लडीतून नादांची आवतरणे कानात घुमत होती. मृदुंगाच्या तालाची लय अजून ठेका धरत आहे. गाण्याची उत्तम तयारी . शिष्यांकडून तेवढीच तयारीची खात्री. गरु शिष्याची ही वीण इथेही होती. . सारेच. साठवून मी मनातही तो अभंग आजही गात आहे. शब्द होते.' केली बहूत पर निंदा....'.
पालख्यांच्या गर्दीत ती दडून गेली तरीही त्याचा सूर आजही हाळी घालतोय .

कोकण म्हणू नका. लातूर म्हणू नका.
नाव घ्याल ते गांव इथ हजर .

रस्ता अडनूवच वारकरी शनिवार वाडा ते मंडई परिसरात दाटी करून मनसोक्त हिंडत होते. कधी नुसतेच तर कुणा भजनाच्या नादात.
कुणी चहा देते. तर कोणी बिस्कीटांचा पुडा. दिंडीत सामवलेल्या वारक-यांच्या मुखात कांही जावे यासाठी अगदी बोलावून , वाट अडवून खाणे-पिणे देण्यासाठी व्यापारी वर्ग उत्सुक होता.
जो लक्ष्मी रस्ता तुकाराम महाराज पालखीच्या काळात अबोल झाला होता तो वारक-यांच्या हालचालीने जिवंत- चैतन्यमय बनला होता.
फुटपाथवर चहा देणारा मुलगाही आधी गरम चहा घ्या म्हणजे अभंग म्हणायला हुरूप येईल हे सांगत होता.
मग काय एका भक्तिंच्या साधकांनी टाळ-मृदंगावर मारली थाप आणि सुरू केला अभंग . अगदी दहा मिनिटे. ते गात होते. वारकरी ठेक्यातली मजा सारेच अनुभवत होतो.' पंढरी नामाचा बाजार...' ताला ठेक्यात नामाचे उच्चारण सुरू होते.

पालख्यांच्या मुक्कामीपणाने भक्तिचा हा सागर भावाच्या लहरींवर झुलत होता.
हे सारे शब्दात सांगणे अवघड. ते अनुभवण्यासाठी एकदा पुण्यात येवूनच ते याची डोळ पहा.. साठवा आणि भक्तिच्या शक्तिचा उत्साह जीवनात साठवून ठेवा.


सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmail.com

9552596276

Tuesday, July 6, 2010

पालखीच्या संगे रंगले रूप, नाद झाला तो टाळांचा


संताचा मेळा जमला भूवरी . दाटूनीया नभ उतरे सत्वरी
वर्णाया मज नाही शब्द बापूडे, धावे मन माझे तुज चरणाशी

कालपासून भावीकांनी पुणे शहर बहरून गेलेय. भक्तिचा मळा खरा फुलला तो आज.
धन्य ती माऊली आली दर्शनाला
तुकयांच्या भक्तिने तृत्पावली

काल रात्री तुकाराम महाराच्या पालखीचे आगमन झाले. वारक-यांची भगवी पताका पुण्यात रोवली गेली. आपले दैनंदिन व्यावहार सांभाळत. वाहतुकीची कोंडी सोडवत तो भक्तिच्या या वातावरणात रंगून गेलाय. खरोखरीच वातावरण बदललय. संत परंपरेचे दोन महान संत आजही लोकांच्या मनाला स्पर्श करताहेत. हे किती विरळे.

काळ बदलला. सवयी बदलल्या. भावना ओथंबल्या. आक्रसल्या. पण ही संतांची शिकवण. त्यांचे विचार आजही कायम राहिलेत.
आज संत ज्ञानंश्वरांची पालखी पुण्यात आली मात्र पुणे शहराचा प्रत्येक भाग चैतन्यमय बनून गेला.

मंदिर, धर्मशाळा, व्यापा-यांची गोदामे इतकेच काय रस्त्यावरचे फुटपाथही भरून गेलेत. विविध सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था , राजकीय कार्यतर्तें सारेच माऊलींच्या भक्तांसाठी सेवा देत आहेत.
पालखीच्या दिंड्यावर नजर टाकली तर खरेच अबाल वृध्द, तरूण, महिला, युवक वर्ग साराच एकवटला आहे.
इथली जात एकच भागवत भक्तिची.
नाळ कुठे जुळली असेल तर ती वि्ठ्ठल नामाशी
चौका-चौकात नाद ऐकू येतो तो अभंगाचा....
अशा या वातावरणात दोन दिवस पुण्याला संतांच्या परंपरेचे जतन करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. हा समृध्द परंपरेचा वारसा पुढच्या पिढीपर्यत नेण्याची तळमळ दिसून येत आहे.

दाटी झाली नगरीत
उरी उरलो सत्वरीत
तेणे भक्तिचा साकरू
सर्व रूपे आकारू



सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

Sant Tukaram Palkhi In Pune

Thursday, July 1, 2010

'आई रिटायर होतेय'-प्रयोग सफाईदार


'आई रिटायर होतेय' या नाटकाचा विषय निघाला की, नाव येते ते भक्ती बर्वे यांचे. किती सहजपणे त्यांनी आभिनयाचे दर्शन घडवून नाटकाला समर्थ केले. आज तेच अशोक पाटोळे यांचे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा घाट पुण्याच्या रवींद्र सांभांरे यांनी घातला आणि मध्यमवर्गीय नाट्यवेड्या रसिकांना आवडेल असे नाटक दिमाखदारपणे उभे केले. वास्तविक नाटकात एकही नावाचा कलाकार नाही. (तसे म्हटले तर नाव असूनही नाटकाला किती येतात हा प्रश्न वेगळा) पण नाटकाची जाण आणि अभिनयाचे धडे घेतलेले नट यात काम करतात. नाटकाचा प्रयोग चोख होतो. भडकपणा, नाटकीपणाचा लवलेशही नसणा-या या नाटकाला आजही तेवढीच दाद मिळते. तुम्हीही एकदा अनुभव घेउन बघा.

रसिकानंद निर्मित या दोन अंकी नाटकाचा विषय सांगणे, ही आजची गरज नाही. साधेच म्हटले तर घरी सर्वांचे हवे-नको ते पाहणार्‍या, सुख-दुःखात पाठीमागे खंबीरपणे उभी असणार्‍या आईनेच ही चाकरी करण्याचे बंद केले तर काय होईल? यातून नाटक घडते आणि खरे तर नाटक बिघडते. बायको, आई, सासू या तिन्ही भूमिकेत वावरणारी आई ठरवून रिटायर होण्याची घोषणा करते आणि ती या भूमिकेशी खंबीर राहते. यातून घडलेले हे नाट्य. मुळातच अशोक पाटोळे यांच्या संवादातून उभ्या राहिलेल्या या नाटकाने रसिकांची मने जिंकली आहेत. पण ते संवाद त्याच ताकदीने रसिकांपुढे यायला हवेत. तेच काम दिग्दर्शक या नात्याने रवी सांभारे यांनी चोख बजावले आहे.
मुळातच वीणा फडके यांच्याकडून आईची भूमिका काढून घेताना त्यांच्यातल्या सहजीपणाला अधिकाधिक वाव देऊन नाटक सांधले व साधले आहे. हेच या नाटकाचे यश म्हणावे लागेल. नाटक पाहताना प्रेक्षक नाटकाशी एकरूप होतो. मधूनच दाद देत राहतो. नाटक कुठेही रेंगाळत नाही. प्रवाही होत प्रत्येक प्रसंग चढत्या क्रमाने मनावर बिंबवला गेला आहे. आजच्या काळात नाटकाला आलेली परिस्थिती पाहता जुनी नाटके पुन्हा करायला हवीत, याचे भान ठेवून नाटकाची निर्मिती केली गेली आहे. रवी सांभारे मुळातच नाटकवेडा माणूस. बॅरिस्टरही त्यांनी यापूर्वी सादर केले होते.
रेखीव नेपथ्य. भासमय प्रकाशयोजना. संगीताचा माफक वापर करून नाटकाला कणखरपणे ऊभे करण्यात दिग्दर्शक पुरेसा ठरला आहे.
वीणा फडके आईच्या मध्यवर्ती भूमिकेत अतिशय साधेपणाने कुठलाही अभिनिवेश न आणता उठावदार भूमिका सादर करतात. देहबोली आणि वावरण्यातूनही त्यांची भूमिका ठसत जाते. संवादातील सहजता तर नाटकाला अपेक्षित परिणाम देते.
विश्वास सहस्रबुध्दे (पपा), मंदार गोरे (मंदार), नेहा परांजपे (नेत्रा), रश्मी देव (वीणा) यांच्या साथीने नाटक घडत राहते. रवींद्र बापट यांचा फाटक नाटकात नाट्य निर्माण करण्यास पुरेसा आहे. सुशीलकुमार भोसले आणि रूपाली फोपसे अधिक परिणाम देऊ शकले असते.
सौ. रश्मी सांभारेंच्या निर्मितीला साह्य करून मनोरंजन संस्थेने एक चांगले नाटक पुनरुज्जीवीत करण्यात सहाय्य केले, याचा आनंद आहे.
आज काळ थोडा बदलला असला, तरी नाटकाला पुन्हा प्रेक्षक येतील याची खात्री वाटते.
नावाचे कलावंत नसूनही प्रयोग सफाईदार होतो व त्याला प्रेक्षक टाळ्या देतात, याचाही उल्लेख करावा लागेल.

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, June 29, 2010

DSK 61th Birthday Celebration in Pune

साधे,नम्र आणि सच्चे तबला वादक चंद्रकांत कामत


आपल्या कलेवर. कलावंतावर. नम्रपणे प्रेम करणारे तबलावादक चंद्रकांत कामत आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या तबल्याचा ठेका कायम लक्षात रहाणारा आहे. गायक मग तो पं. भिमसेन जोशींसारखा जागतिक कीर्तीचा असो वा उपेंद्र भट यांचेसारखा असो ते तबल्याची साथ करणार. गायनाबरोबर जाणारे. स्वतःचे कसब मधूनच न दाखविता साथ कशी करावी हे ते आपल्या वादनातून दाखवून देत.

सच्चेपणा आणि साधेपणा हे दोन गुणांना त्यांच्यातला कलाकार नेहमीच नम्र राहिला. आकाशवाणीवरही त्यांच्या वादनाची साथ अनंक गायकांनी अनुभवली आहे. आपण साथीचे वादक आहोत ही सततची जाणीव त्यांच्या वागण्यात होती.

अशा उत्तम तबला वादकाला माझी ही श्रध्दांजली..

त्यांच्या वादनाची ही एक झलक... पं. भिमसेन जोशी यांच्या गायनाल केलेली साथ ही अशी साधी पण गायनाला पूरक...



सुभाष इनामदार, पुणे.

Friday, June 18, 2010

व्हायोलिन वादकांची कमाल




जागतिक व्हायोलिन दिनानिमित्ताने पुण्यात गुरूवारी २२ व्हायोलिनवादक एकाच रंगमंचावर आल्यामुळे व्हायोलिनच्या सुरेल सादरीकरणाचा एक आगळा वेगळा नमुनाच पुणेकर रसिकांना अनुभवता आला.

गेली सात वर्षे पुण्यातले चार व्हायोलिनवादक संजय चांदेकर, चारूशिला गोसावी, निलिमा राडकर आणि अभय आगाशे हे आंतरराष्ट्रीय व्हायोलिन दिनानिमित्ताने वेगवेगळ्या रचनातून या वाद्याची विविध सुरेल रूपे या दिवशी वादनाच्या विविध रचनांमधून साकार करतात.भरत नाट्य मंदिरात संगीतातल्या विविध रागांवर आधारलेल्या रचना सादर केल्या गेल्या.

'रसिकप्रिया व्हिओलिना'तून कांही हिंदी गाणी आणि वविध वाद्यातूमधून सादर होणारा वाद्यमेळ( फ्यूजन) सादर करून रसिकांना मोहवून टाकले. व्हायोलिनचा प्रसार आणि प्रचार करण्याबरोबरच या वाद्याला स्वतःचे असलेले स्थान बळकट करून प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा या चार व्हायोलिन वादकांचा प्रयत्न दाद देण्याजोगा आहे.

त्यांच्या प्रत्येक रचनेला टाळ्या तर मिळत होत्याच पण वन्समोअरची दादही रसिकातून दिली जात होती.संगीताच्या कार्यक्रमातून स्वतंत्रपणे साथ करणारे हे कलावंत या वाद्याविषयीचे प्रेम दरवर्षी स्वतंत्र रचना सादर करून व्यक्त करतात. व्हायोलिनवर प्रेम करणारे पुणेकर चाहतेही या दिवसाची वाट पहात असतात.

उपाध्ये व्हायेलिन विद्यालयाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयाने ' रसिकप्रिया व्हिओलिना'हा कार्यक्रम करणा-या कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिला होता. उपाध्ये विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांनी मिश्र शिवरंजनी रागातली रचना व्हायोलिनवर सादर करून पुढच्या वादनातली उत्सुकता कायम ठेवली.

व्हायोलिन दिनाच्या या कर्यक्रमात यंदा प्रथमच सतारीची साथ घेण्यात आली होती. गिरीश कांबळे यांची तयारीही लाजवाब अशीच होती.वाद्यातली आर्तता आणि मार्दव दोन्हीतून वाद्याचा उठाव अनुभवताना चारही वादकांची व्हायोलिनवर असललेली कमांड क्षणोक्षणी जाणवत होती.कार्यक्रमाला मनोज चांदेकर, रविराज गोसावी यांची तबला साथ तेवढीच तयारीची मिळाली
होती. पखवाज वादनातली कारागिरी विनित तिकोणकर यांची होती. दशर्ना जोग यांनी स्वरांचा भरणा करून कार्यक्रमाला उठाव आणला . वैशाली जुंदरे यांच्या मोजक्या शब्दांच्या निवेदनाने कार्यक्रम फुलत गेला.

संगीतकार आणि व्हायोलिनवादक प्रभाकर जोग, भालचंद्र देव, डॉ. अनिल अवचट, विजय कोपरकर यांच्यासारखे मान्यवर हजर राहिल्याने कार्यक्रमाला स्वतंत्र दर्जाही प्राप्त झाला होता.


सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
www.globalmarathi.org
9552596276

Thursday, June 17, 2010

कधी पाणी, कधी झळाळी


काय निसर्गाची करणी

कधी पाणी, कधी झळाळी

दोन दिसाचे गे नाते

दोन देहाचे गे वाटे


एका मनाने घेतले

भिजला गे साजणा

दुसरा मनाने सांगला

कधी खोटा सांग जाला



काय आबाळाला ठाऊके

धरणीच्या उरी दाटे

वरी आबाळ थेंब धारा

खाली पसरी सोनसळा



एका घराले आता

नाही सारखे दावावे

माती पाणी ग इथले

तुला नाले कळाचे


देही माझ्या ग येतो

दोन ऋतुंचा हा मेळ

दावा दावा आता माला

कधी येणार तो आबाळा ....



सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276