Tuesday, January 6, 2009

तरूणांच्या संवेदना कळत नाहीत

तरूण पिढीच्या संवेदना कळायला जरा अवघड जाते. त्यांच्या भावना सांगण्याची पध्दतही वेगळी आहे. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असते. ती मिळविल्याशिवाय ते शांत होत नाहीत.
मागणी करताना आजूबाजुच्या परिस्थितीचा विचार केला जात नसावा. यामुळे हाते काय?
ते मागत नाहीत तर आग्रह धरतात. ते विचारत नसतात. थेट सांगतात.

पालक म्हणून पाहिले तर, आपल्या काळात काय होते, कसे होते, ते सांगण्याची सोयच ऊरली नाही. पालकांचे उत्पन्न त्यांना माहित असते. त्यामुळे पालक मागेल ते देणार ही मुलांना खात्रीच असते.

यातुन निर्माण होतो. वाद. इथे संवादाला फार वाव उरत नाही.तो कदाचित एका बाजूनेही होऊ शकतो. कारण जे सांगू ते ऐकायची मनस्थिती त्यांची असेलच असे सांगता येत नाही.

एकूणच पूर्वी असलेला पिढीचा फरक काळ बदलला तरी तसाच पुढे सुरू आहे.
फरक इतकाच पात्रे बदलली. भुमिका बदलेले. संदर्भ बदलला.

काय हे तुम्हालाही पटतय ना?

सुभाष इनामदार, पुणे

Friday, December 26, 2008

सवाई गंधर्व संगीत महोत्सव- 2008

पं. अजय चक्रवर्ती यांचे लालित्यपूर्ण सादरीकरण आणि पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर अतिशय मोजक्‍या वेळात छेडलेला "दुर्गा', ही सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राची वैशिष्ट्ये ठरली.
पहिल्या सत्राचा प्रारंभ तुकाराम दैठणकर यांच्या सनईवरील "भीमपलास'ने झाला. सनईवादनाच्या सलग चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तुकाराम दैठणकर यांनी सनईच्या मंगल सुरांनी महोत्सवावरील सावट दूर तर केलेच; पण सुंदर लयकारीचे दर्शन घडवत रागमांडणी केली. विलंबित एकतालातील त्यांचे वादन "अब तो बडी बेर' या रचनेशी साम्य दर्शवणारे होते, तर त्रितालातील रचना "नैना रसीले जादूभरे' या रचनेसारखी वाटली. त्यांना मंगेश करमरकर यांनी तबल्याची उत्तम साथ केली. सीतलाप्रसाद (सनई), गणेश व अशोक दैठणकर (स्वरपेटी), नितीन दैठणकर (सुंद्री) हे त्यांचे अन्य साथीदार होते.
आश्‍वासक गायन युवा गायक कृष्णेंद्र वाडीकर यांनी या महोत्सवात प्रथमच गायन सादर केले. त्यांचे गुरू श्रीपती पाडेगार हे पं. भीमसेनजींचे ज्येष्ठ शिष्य होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून वाडीकर यांच्या गायनाचे आयोजन केल्याचे या प्रसंगी श्रीनिवास जोशी म्हणाले. वाडीकर यांना अर्जुनसा नाकोड यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याचे, तर पाडेगार यांच्याकडून किराणा गायकीचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी "राग पटदीप'मध्ये "धन धन घडी' हा विलंबित एकतालातील ख्याल मांडला. त्यांचा आवाज उत्तम आहे; पण परिपक्वता आणि वजन येण्याची गरज आहे, असे जाणवले. "पटदीप'मध्ये शुद्ध निषादावर अपेक्षित असणारा न्यास, या गायनात दिसला नाही. मात्र लयकारी आणि बोलताना उत्तम होत्या. विशेषतः एक आवर्तन-अर्ध्या आवर्तनातील बंदिशीचे शब्द घेऊन आलेल्या बोलताना खास ग्वाल्हेर घराण्याच्या होत्या. त्यांनी "पिया नाही आये' ही बंदिश मांडली. ताना जोरकस असूनही वैविध्य कमी वाटले. "स्मरता नित्य हरी, मग ते माया काय करी' हे भजन आणि रसिकाग्रहास्तव एक कानडी भजनही त्यांनी ऐकवले. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच शिरीष कुलकर्णी आणि प्रशांत यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
तालमीचे गाणे ज्येष्ठ गायक, गुरू आणि रचनाकार पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य सुहास व्यास यांनी पूर्वी रागाची मांडणी केली. त्यांनी निवडलेला राग अलीकडे फारसा गायला जात नाही, तसेच त्यांनी हा राग तिलवाड्यात (१६ मात्रा) मांडला. सुरवातीला तालाचे वजन लक्षात येण्यासही रसिकांना जरा वेळ लागला; पण ते लक्षात येताच गायनात रंग भरला. व्यास यांना वडिलांप्रमाणेच पं. के. जी. गिंडे यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. "तालमीचे गाणे' असेच त्यांच्या सादरीकरणाचे वर्णन करावे लागेल. विशेषतः तार सप्तकातील गंधारावरचे काम त्यांनी चांगले केले. "बनत बनाओ बन नहीं आये' या द्रुत बंदिशीत ताना, लयकारीही उल्लेखनीय वाटली. व्यास यांचे स्वरलगाव, ठेहेराव त्यांच्या वडिलांची आठवण करून देत होते. याच रागातील एक तराणा त्यांनी एकतालात सादर केला आणि "एक सूर चराचर छायो' या भजनाने सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) आणि आदित्य व्यास व अनुजा देशपांडे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
रंगतदार वादन पं. शिवकुमार शर्मा यांनी मोजक्‍या वेळेचे महत्त्व जाणून पाच स्वरांच्या "दुर्गा' रागाची निवड केली असावी. ते सिद्धहस्त कलाकार असल्याने थोड्या वेळातही त्यांच्या वादनाने रंग भरला. मोजक्‍या आलापात "दुर्गा'रूप दर्शवून अतिशय नेटके तरीही प्रभावी रागचित्र त्यांनी निर्माण केले. "झाला' मात्र त्यांनी आटोपता घेतला, असे वाटले. "दुर्गा' रागातील १३ मात्रांतील "जय' तालात (४-४-५ अशी मात्रा विभागणी) त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. तबलावादक योगेश सम्सी यांच्यासह द्रुत वादनातील रंगतही रसिकांची दाद मिळवून गेली. त्रितालातील एक रचना ऐकवून त्यांनी "पहाडी'मधील नवी रचना ऐकवली. डॉ. धनंजय दैठणकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
लालित्यपूर्ण गायन पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या अत्यंत लालित्यपूर्ण गायनाने पहिल्या सत्राचा समारोप झाला. त्यांना योगेश सम्सी (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनिअम) यांनी साथ केली. पं. ग्यानप्रकाश घोष यांचे मार्गदर्शन लाभलेल्या चक्रवर्ती यांच्या गायनात वैविध्य आणि भावपूर्णतेचा दुर्मिळ संगम होता. "खमाज'मधील "आय आयो पाहुना' ही पं. घोष यांचीच रचना त्यांनी मांडली. "खमाज' हा मांडणीचा राग म्हणून सहसा गायला जात नाही. बहुधा उपशास्त्रीय रचना त्यात सादर केल्या जातात; पण चक्रवर्ती यांनी शुद्ध खमाज मांडला आणि अन्य "मिश्रपणा'पासून खमाज अलिप्त ठेवला, हे आवर्जून नोंदवायला हवे. "काहे करत मोसे बरजोरी' ही त्यांची स्वतःची बंदिश झपतालात बांधली होती. बडे गुलाम अली खॉं यांची "मनमोहन शाम रसिया' ही त्रितालातील रचना, "कोयलियॉं कूँक सुनावे' (यातील कूँक या शब्दावरील नि सा या स्वरांचा न्यास अप्रतिम) "आज मोरी कलाई मुरकतली' ही रचना...असे वैविध्य त्यांच्या गायनात होते. मंद्र सप्तकापासून अतितार सप्तकातील स्वरांचे काम, आकारयुक्त गायन, दमसांस, भावपूर्णता, तिन्ही सप्तकांत फिरणारा आवाज, अप्रतिम सरगम, गमकी ताना, स्वरांचे लगाव, ठेहेराव आणि आंदोलने...अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असणारे हे गायन त्यातील विलक्षण सहजता आणि प्रसन्नतेमुळे रसिकप्रिय ठरले. "आवो भगवान' या भैरवीने चक्रवर्ती यांनी गायनाची सांगता केली.

Saturday, October 11, 2008

व्यंगचित्र कागदावर उमटतात कशी ?


व्यंगचित्राच्या दुनियेत आपले नाव कोरलेले मंगेश तेंडूलकर यांनी व्यंगचित्र

कागदावर उमटतात कशी ?

"आयुष्याच्या प्रवाहात तुम्ही जर सतर्क उभे राहिलात की

एखादी विनोदी कल्पना माशासारखी चटकन क्‍लिक होते.

ती तिथून उचलायची आणि थेट कागदावर उतरायची',

मंगेश तेंडूलकर सांगतात.फोटो आणि कॅरिकेचर मधला फरक सांगताना ते म्हणतात,

फोटो हा चेहऱ्याची कॉपी असते. व्यंगचित्रातला चेहरा त्या व्यक्तिच्या स्वभाव

वैषिष्ठ्यासह कागदावर रेखाटता येते.

हेच क्ररिकेचरचे वेगळेपण आहे.


वयाच्या १८ व्या वर्षा पासून व्यंगचित्रे काढणारे तेंडूलकर वयाच्या ७२ व्या वर्षीही

तेवढ्याच उत्साहाने नविन कल्पना कागदावर रेखाटताहेत.

त्यांच्या समीक्षात्मक लेखनातही ते वारंवार अनुभवता येते.

दिसताना तेंडूलकर गंभीर दिसतात.

पण त्यांच्यातला मिश्‍किल भाव त्यांच्या व्यंगचित्रातून उमटतो.

कुठलेही व्यंगचित्र वास्तवतेची सीमा ओलांडून क्रिएटिव्ह बनून

तुम्हाला जे म्हणायचे आहे ते अचूक सांगते .

वास्तवतेला इतके भव्य स्वरूप व्यंगचित्रातूनच अंगावर येते.

आपल्या व्यंगचित्राच्या दुनियेत वावरताना पहाणे आणि

मंगेश तेंडुलकरांची व्यंगचित्रे फ्रान्समध्ये झळकली

गेली 54 वर्षे विविध विषय व्यंगचित्रातून मांडणाऱ्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार
मंगेश तेंडुलकर यांची चित्र यंदा फ्रान्समध्ये विविध प्रदर्शनातून झळकत आहेत.

सिएटेलनंतर परदेशात भरलेलं हे त्यांचं पहिलंच प्रदर्शन असून फ्रान्समध्ये
यापूर्वीही त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शिखर परिषदेसाठी जमलेल्या वायनरीजशी संबंधित
मंडळींनी त्यांच्या चित्रप्रदर्शनाला भेट दिली. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून
त्या शेजारच्या आर्ट गॅलरीत वेगळ्या दहा चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
चित्रांची निवड आणि मांडणी विनिता आपटे यांनी केली आहे.
सामाजिक विषयांवर आधारित चित्रांमध्ये वाहतूक प्रश्‍नांशी
निगडित चित्रांचं प्रमाण मोठं आहे.
या व्यंगचित्रांबाबत बोलताना तेंडुलकर म्हणतात, ""व्यंगचित्रांची ही जी भाषा
आहे ती इतर भाषांचे बांध ओलांडून पलीकडच्या माणसांपर्यंत पोचते.
त्याची मला एकदा प्रयोगादाखल सत्त्वपरीक्षा घ्यायची होती ती
जगातल्या इतर लोकांना कशी समजतात. याचा अनुभव घ्यायचा होता.
हा अनुभव प्रोत्साहन देणारा आहे.''

त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा..

आत्तापर्यंत त्यांची 46 ठिकाणी व्यंगचित्रांची स्वतंत्र प्रदर्शने भरली आहेत. व्यंगचित्र प्रदर्शनाचा सुवर्णमहोत्सवही लवकरच वेगळ्या तऱ्हेने साजरा करण्याचा त्यांचा विचार आहे.
व्यंगचित्रे कशी सुचतात हे सांगताना तेंडुलकर म्हणतात, "
"आयुष्याच्या प्रवाहामध्ये जर तुम्ही सतर्क उभे राहिलात की
एखादी विनोदी कल्पना कुठेही सापडते. मात्र ती उचलण्यासाठी नजर हवी.
माणसाच्या स्वभावात काय काय असू शकेल हे पाहण्याचे कुतूहल आपल्याला आहे.
त्यातूनच ही चित्रे कागदावर चितारली आहेत.''

Wednesday, October 8, 2008

पुणेकरांनी अनुभवला भव्य दिंडी सोहळा

तुकारामबुवा भूमकर यांनी तुकाराम महाराज जन्मचतुःशताब्दी निमित्ताने
आणि मृदंगाचार्य बाबूराव डवरी यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्ताचे औचित्य साधून
कसबा पेठेतल्या भूमकर निवासापासून तुकाराम महाराजांच्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या
मंदिरापर्यंत मृदंग दिंडी मिरवणूक सोमवारी आयोजित करण्यात आली होती.
यात तुकारामबुवांचे दीडशे शिष्य आपल्या मृदंगासह सहभागी झाले होते.
सोहळ्याचा आरंभ भूमकर निवासापाशी संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे
यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या रथावर आरूढ झालेल्या पुतळ्याला
पुष्पहार घालून झाले.
भूमकरांचा नातू बाळही यात मृदंग वाजवत सामील झाला होता, ही विशेष बाब...
काही महिलांचेही नाजूक हात मृदंगावर नाद काढीत होते.
दिंडी सोहळा अनुभवण्यासाठी इथे क्‍लिक करा....

कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि लक्ष्मी रस्त्याने ही दिंडी
तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली.
"ज्ञानोबा महाराज तुकाराम'चा गजर आणि टाळ-मृदंगांचा नाद
यानिमित्ताने पुन्हा एकदा पुणेकरांनी अनुभवला

Saturday, October 4, 2008

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा

किती वेचू, किती आठवू

क्षण माझा मोहरुन विसरलो मी मला....


हिच कविता प्रत्यक्षात ऐका आणि पहा...

Wednesday, October 1, 2008

क्षणांचा पडला सडा

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा
किती वेचू, किती आठवू
क्षण माझा मोहरुन विसरलो मी मला....

ओंजळीत वेचलेली फुले मनात दरवळतात
किती घेऊ, किती टिपू
क्षणांचा सहवास सादही मला घालतात....

न्हालेल्या केसांतून गळतात टपटप मोहरा
किती झेलू, किती सोडू
क्षणात दिसतात, पाहतात तो चेहरा....

स्पर्शाचा बहर नटलेला, स्वर्ग हलताना दिसतो
किती ओंजळी, किती वेळा
क्षणांची निसटतात पिसे, मोहवतात, भिरभिरतात....

वर्षांची उलटतात पाने, विरतात कागद
किती शोधू, किती साठवू
क्षणांच्या त्या भाग्याने, ओंजळीतल्या कशिद्याने....

क्षणांचा हिशेब क्षणातच उलगडतो
किती मोजू, किती नाचवू
क्षण मात्र वेढतात पुढच्या क्षणांचा तिढा...

सडा पारिजातकाचा आहे क्षणभंगुर
किती भरू, किती निवडू
क्षणांवर कोरलाय क्षणांमधला भावांकुर.....

कधी विसरू म्हणता विसरता येत नाही
किती देऊ, किती घेऊ
क्षणांचेही त्या सांगता येत नाही....

बेईमान न होता, सोबत करीन तुला
किती शपथा, किती सांगता
क्षणाला झेलण्यासाठी क्षणांचा करीन झुला...

सारे जीवन म्हणजे पारिजातकाचा सडा
किती साठवू, किती निवडू
क्षणांच्या साक्षीने क्षणांवरच झालो मी फिदा.....

सुभाष इनामदार,
पुणे.
३० सप्टेंबर २००८

उदे ग अंबे उदे- जागर देवीचा

देवीच्या नवरात्रीचा उत्सव मंगळवारपासून देशभरात सुरु झालाय.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत.
घरोघरी घटस्थपना करुन देवीचा जागर केला जातो.
देवीच्या नावाने घातलेला गोंधळ हा याच उत्सवाचा एक भाग समजला जातो.

गोंधळांचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करावे.

Tuesday, September 30, 2008

दीदी आणि मी- आठवणींचा कप्पा




मंगेशकर कुटुंबाला "सोनियाचा दिनू' दाखवणारी आमची लतादीदी म्हणजे


मास्टर दीनानाथांचा पुनर्जन्मच...


हृदयनाथांच्या दाटलेल्या कंठातून अशा एक एक आठवणी उलगडत गेल्या


अन्‌ त्या ऐकताना श्रोत्यांनीही पाणावलेल्या डोळ्यांत ते "सोनियाचे' क्षण साठवले.


निमित्त होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ८० व्या वाढदिवसाचे!


"स्वरभारती'तर्फे आयोजित "दीदी आणि मी' या कार्यक्रमात


ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या आणि लतादीदींच्या


आठवणींचा कप्पा पुणेकरांसमोर उघडला .


या क्षणांचे साक्षिदार होण्यासाठी तुम्हीही हा व्हिडीओ पहा.




......आणि रविवारी सायंकाळ दणाणून गेली




बीएमसीसी महाविद्यालयाने सादर केलेल्या "दोन शूर' या एकांकिकेत ओम भूतकर आणि अभय महाजन.------------------------------------------------------------------------------------




""पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येक फेरीत केलेला संघर्ष


आणि त्याचा अनुभव ही आयुष्यभराची शिदोरी आहे.


नव्या पिढीला रंगभूमीवर कार्य करण्यास "महाराष्ट्रीय कलोपासक'ने


नेहमीच प्रोत्साहित केले आहे.


या स्पर्धेतील प्रत्येक कलाकाराच्या मनात "पुरुषोत्तमचे दिवस'


निरंतर घर करून राहतात. हेच या स्पर्धेचे यश आणि


स्पर्धेने दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे.''


इति अरुण काकडे.


या स्पर्धेतले यशस्वी संघांना अणि महाविद्यालयांना


अरुण काकडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.


अतिशय तरिणाईने बहरलेल्या वातावरणात हा समारंभ रविवारी साजरा झाला.