Monday, August 31, 2020

खणखणीत आवाजाचे गायक श्रीपाद भावे गेले..

जानेवारी २० ..आणि तारीख होती १४ जयजयराम जयजयरामच्या गजराने श्रीपाद भावे यांनी पंचपदीची सुरवात केली..आणि उद्यान प्रसाद सभागृहातले वातावरण आपोआपच भक्तीरसात बुडून गेले..संतदर्शनचे संस्थापक श्रीराम साठे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्ताने संतवाणी..साजरी केली जात होती..टाऴ मृदुंगाच्या साथीने कार्यक्रम बहरत जात होता.. 

आज आठ महिन्यांनी त्याची आठवण पुन्हा आली..कारण आज सकाळीच यातले दमदार आणि खणखणतीत आवाजात अभंगातून रसिकांना तृप्त करणारे गायक श्रीपाद भावे यांच्या निधनाची बातमी आली..त्यांचा तो जाहिरपणे झालेला कार्यक्रम पुन्हा मनात ताजा होऊन मनात ते स्वर आळवू लागला.. 

जयश्री कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही संतवाणी सादर झाली होती.. निष्ठापूर्वक गाणारा आणि सहजपणे आपल्या गायनात तन्मय होणारा श्रीपाद भावे..अभंग, नाट्यसंगीत..आणि भकतीगीते आपल्या जात्याच तयार असलेल्या
आवाजात सादर करीत असे.  







आपली महाराष्ट्र बॅंकेतली नोकरी निवृत्तीपर्यत प्रामाणिकपणे करून श्रीपाद भावे आपले गायनातील सौंदर्य रसिकांच्या पदरात आपल्यापरीने टाकत होते. 

भक्तीभावाने आणि तल्लीनतेने गाणे सादर करण्याचे कसब संतदर्शन मंडळाचे संस्थापक श्रीराम साठे यांनी तेव्हांच ओळखून त्यांना दरवर्षी होणा-या संतवाणीच्या संचात हमखास स्थान देत असत. छोटे माठे कार्यक्रमातून भावे यांचे दर्शन आणि त्यांची गायनातली तल्लीनता महाराष्ट्रातल्या रसिकांना आता कळून येत होती..
नोकरीच्या मर्यादा ओळखून ते गायनसेवा रुजू करीत असत.. 

नोकरीत असताना त्यांनी ज्या एकमेव संगीत नाटकात भूमिका केली त्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कट्यार काळजात घुसली.. यात.. मीही त्यात एक कलाकार म्हणून सामिल झालो होतो. पंच्च्याहत्तर सालापासून श्रीपाद भावे यांच्याशी संबंध आला.. गाण्यासोबत अभिनयाचे अंगही त्यांच्यात होते..पण ते पुढे नाटचकाकडे अधिक वळलेच नाहीत.


 कट्यारमध्ये त्यांची खांसाहेबांचे शिष्य असलेल्या चांदची भूमिका छान होत असे. . आम्ही त्याचे पंचवीस तरी प्रयोग केले असावेत. 

सगळ्याशी मनमोकळे वावरणारे भावे..कलावंत आणि सहभागी तंत्रज्ञात लाडके होते.. निगर्वी स्वभाव ..मिळून मिसऴून वागण्याने भावे सर्वांना आपलेसे करत.. कसदारपणे तान घेणे आणि त्यातील स्वरात आपला ठसा उमटविणे हे त्यांचे विशेष गुण होते. अभंगातला ताल आणि स्वरातील भाव ते सहजपणे व्यक्त करत.. 

 श्रीपाद भावे यांच्या जाण्याने एक दिलदार मनाचा..मित्र गमावला यांचा निषाद वाटतो.. 

 वडीलांच्या वाहतूक व्यवसाला मदत करून प्रसंगी त्यांनी गाडीही चालविली आहे.कष्टाची तयारी आणि संघर्षमय आयुष्यातून वर येऊन ते आपल्या बंगल्यात उत्तम वास्तव्य करीत होते..

त्यांच्या या चटका लावून जाणा-या वृत्ताने संतवाणीतला खणखणीत आवाजाचा गायक हरपला आहे..
त्यांच्या स्मृतीस आदरांजली.. 



 - सुभाष इनामदार, पुणे..
 subhashinamdar@gmail.com

Friday, July 17, 2020

आठवणीत कायम कोरले एन डी आपटे ..गेले






अनेकांना घडविणारे एन डी आपटे सर..

कालच्या सकाळमध्ये आम्हा अनेकांना घडविणाऱ्या एन डी आपटे सर यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि खूप काही शिकविणाऱ्या या गुरूंच्या आठवणीने मन हेलावून गेले..
पुण्याच्या माडीवले कॉलनीतील तळमजल्यावरचे घर समोर आले.. आणि त्यांच्या स प समोरच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील त्यांच्या वर्गातील सारे चित्र स्पष्ट डोळ्यासमोर आले.. जिद्दीने आणि तळमळीने विद्यादान सढळ हाताने करणारे अतिशय प्रेमळ , हळुवार बोलणारे एन डी समोर उभे राहिले.. खरे तर त्यांच्या पाठीवर फिरलेल्या हातानेच तर मी पदवीधर बनलो.. कितीही शंका अगदी ती बारीक असली तरी सरांनी ती सविस्तरपणे निरसन केली आणि त्यामुळेच वाणिज्य शाखेतील अवघडलेले कोडे आयुष्यात सहजी सुटून गेले..
त्यांनी कधी फी मागितली असे आठवतच नाही.. किती मुलांनी त्यांची फी बुडविली याचे गणित त्यांनी कधी केलेच नाही..
बी एम सी सी महाविद्यालयातली प्राध्यापक पद सोडून ते आपल्या स्वतंत्र वर्गात ते रमून गेले.
पण त्यांचे खरे प्रभुत्व होते ते सहज सोपे इंग्रजी अधिक समजेल अशा भाषेत सांगण्याची लकब..तेच त्यांचे महत्व ओळखून  संपादक सदा डुंबरे यांनी त्यांना  साप्ताहिक सकाळ मध्ये त्याचे सदर सुरू केले..त्या निमित्ताने ते जेंव्हा सकाळमध्ये येत तेंव्हा मी ई सकाळचा वृत्तसंपादक म्हणून रुजू होतो..ते आवर्जून भेटत .. सविस्तर गप्पा मारत..
बोलणे , गप्पा मारणे आणि शिकविणे हे त्यांचे आवडते विषय..

पॅन्ट, साधा शर्ट , डोळ्यावर सतत खाली ओघळणारा चष्मा आणि हातात मोठी पिशवी घेऊन ते सहजपणे पाठीवर हात ठेऊन गप्पा मारत..

शेवटपर्यंत तो साधेपणा कधीही लोप पावला नाही..आणि ती समजवण्याची तळमळ कमी झाली नाही..

संगीत, क्रिकेट आणि बँकिंग अश्या विषयात त्यांचे सखोल विचार असत.. वक्तृत्वाची छाप नसली तरी विषय समजून सांगण्याची त्यांची हातोटी  विलक्षण होती..

माडीवाले कॉलनीतल्या वास्त्यव्यायानंतर कर्वे रस्ता परिसरात ते रहायला गेले आणि थोडा नेहमीचा दुरावा कमी झाला..

आपल्या स्वभावाने आणि शिकविण्याने त्यांनी अनेक मित्र जमविले.. त्यांच्यामुळे कितीतरी विद्यार्थी पदवीधर होण्याचे स्वप्न साकार करू शकले..

त्यांच्या ८१ व्या वाढदिवशी आपल्या सौंभाग्यवतीं सह टिपलेले हे प्रसन्न छायाचित्र  



एन डी  आपटे यांच्यासारखे सालस, सरळ आणि हळवे व्यक्तिमत्व आता दिसणार नाही..याचे दुःख आहे..पण त्यांनी घडविलेल्या अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या अनेक क्षेत्रातल्या मुशाफिरीने ते सतत समाजात कायम स्मरणात रहातील..

त्यांच्या कर्तुत्वाला आम्हा सगळ्यांचा अखेरचा सलाम..आणि आदरांजली..




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail. com






Sunday, July 12, 2020

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...






छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत.



एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत.



घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत.



घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी.



मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण.






घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.






अशी फुलवली बाग



ःबागेसाठी जागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली.



नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.



आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला.












वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली. आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली.






गच्चीवरील बाग






ःरो-हाऊसच्या बाजूच्या भागात फरशी घालताना तयार झालेली खताची माती सहा बाय चारच्या जागेवर गच्चीवर टाकली. त्या खाली प्लॅस्टिकचे कापड अंथरले. त्या बेडवर शेतीसारखे भाजीचे बी टोकले. आज कोथिंबीर, पालक आणि मेथी एकत्रित नांदत आहेत. भाज्यांवरोबर लसणाच्या कुड्याही लावल्यात. त्यातूनही हिरवे अंकुर डोकावू लागलेत. सहा मोठ्या सिमेंटच्या कुंड्यांतून गुलाब, लिंबू आणि डाळिंबाची रोपे लावली. कुंडी लावताना खाली थोडा विटांच्या भुग्याचा थर त्यावर माती, मातीवर ओला कचरा असे करत कुंडी भरली. गुलाब फुललाय. मात्र लिंबे आणि डाळिंबाची वाट पाहतोय.निशिगंध, मोगरा, चार-प्रकारची जास्वंद. कोरफड, गुलाब, शेवंती, जाई, बह्मकमळ आणि छोट्या कुंड्यांतून मनी प्लॅंट, पुदिना वाढतोय. कुंड्यांत मात्र वारंवार माती उकरावी लागते नवी माती भरावी लागते. कधी काही कुंड्यांतली माती कमी करून बागेतला पानांचा थर देऊन त्यावर माती पसरली जाते. पाणीही सतत घेता कधी भांडभर तर कधी पूर्णपणे झाडावर पाण्याचा फवारा करतो.मध्यंतरी बायोकल्चर वापरून कुंडी कशी भरावी ते पाहिले. कुंडीमध्ये खाली विटांच्या तुकड्यांचा थर, नंतर भाजीपाल्याचा ओला कचरा, वर बायोकल्चर, परत ओला कचरा अशी कुंडी भरून त्यात रोप लावले. आता त्याला महिना पुरा होतोय. फुले भरभर उमलतात. गुलाबाच्या रोपांची पाने वाढताहेत. जास्वंदीच्या फांदीची वाढ होतेय. सारेच आनंदाचे. वाढत्या बहरलेल्या झाडांचे.






येत्या काही दिवसांत बाकीच्या गच्चीत मातीचे बेड करून त्यात भाजीपाल्याची लागवड करायची आहे. घरची पालेभाजी खाण्यातल्या आनंद काही वेगळाच आहे. हे सर्व करताना एक पथ्य पाळलंय, की रासायनिक खत वापरायचे नाही. लागलेच तर शेण खत घालायचे. हे सारे जपण्याचा छंद लागलाय. त्यात वेळ कसा जातो ते कळत नाही. मातीच्या कुपीतून बाहेर येणाऱ्या या हिरवळीची मजा चाखल्याशिवाय कळणार नाही






सुभाष इनामदार, पुणे-



९८८१८९९०५६