Thursday, December 15, 2011

गदिमांचे स्मारक अद्यापही पुण्यात नाही






गदिमा पुरस्कार सोहळा..रंगतदार..स्मणात राहणारा..


आपल्या भूमिकांनी आणि लेखनातून व्यक्त होणारे कलावंत दिलीप प्रभावळकर. ज्यांना यंदाचा `गदिमा पुरस्काराने` त्यांना एका अर्थाने जीनव गौरव देऊनच सन्मानित करण्यात आले. ज्यांच्या स्नेहात, आठवणीत आजही गदिमा किती आहेत ते सांगणारे ८४ वर्षाचे रावसाहेब शिंदे. गदिमा स्नेहबंध पुरस्कार दिला गेला. कमलाकर सारंग यांच्यामुळेच आपण आज जी कांही आहोत याची आठवण कायम जपणा-या आणि तेवढ्याच उत्तम त-हेने संसारात सखी-सचिव ही दोन्ही पदे भूषविल्याचे समाधान `गृहिणी सखी—सचिव`हा पुरस्कार घेताना वाटते ते जाहिरपणे कबूल करणा-या लालन सारंग. आणि चैत्रबन पुरस्कार दिल्या गेलेल्या लेखिका आणि माणूस म्हणून संस्कृतीचा झरा कायम ठेवा हे सांगणा-या डॉ.मोनिका गजेंद्रगडकर.


यातल्या प्रत्येक जणाच्या तोंडून पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर होताच पण एक जबाबदारीची सामाजिक जाणीव बोलण्यातून झिरपत होती. ज्येष्ठ कलावंत मोहन आगाशे यांच्या हस्ते गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे यंदाचे ३४ वर्ष होते. पण आजही गदिमांचे मोठेपण पटणारे सुमारे हजारभर श्रोते १४ डिसेंबरच्या संध्याकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सभागृहात तुडूंब गर्दीत त्या आपल्या लाडक्या लेखकाचे स्मरण करण्यास आणि पुरस्कार मिळालेल्यांचे कौतूक पहायला हजर होते.
ज्यांच्या गीतांचे झोके घेतच आम्ही मोठे झालो याची कृतज्ञता व्यक्त करताना पुलं, कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर आणि गदिमा यांच्या लेखनाने आपल्या आयुष्यात प्रभाव टाकला आहे. म्हणूनच हा पुरस्कार घेतानाचा आनंद अधिक असल्याचे दिलिप प्रभावळकर व्यक्त करतात.
डॉ. मोहन आगाशे यांच्या मते ,`महाराष्ट्रात दोन वर्षाहून अधिक राहणा-या आणि मराठी न येणा-या प्रत्येकाला मराठी भाषा शिकविणे हे काम मराठी मंडळीने केले तरच मराठी भाषा आपली कक्षा ओलांडून बाहेर जाईल. भाषा एकदा कळली की त्यातल्या साहित्याचा, नाटकांचा आनंद त्यांनाही घेता येईल.. त्यातूनच मराठी भाषा ख-या अर्थाने वैश्विक होईल. `इंग्रजांनी जाईल तिथे पहिल्यांदा इंग्रजी शिकविली त्याप्रमाणे आपणही आरडाओरडा न करता मराठी भाषा प्रेमाने शिकविली पाहिजे.`
आनंद माडगूळकर आणि श्रीधर माडगूळकर हे गदिमांचे दोन्ही सुपुत्र यांनी राहून गेलेले अनेक कलावंत आज हयात नाहीत याची खंत व्यक्त तर केलीच ( यात राजा परांजपे, राजा गोसावी, चंद्रकात, सूर्यकांत, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले) पण आज ३४ वर्षानंतरही गदिमांचे कायमस्वरुपी स्मारक नसल्याचे दुखः जाहिरपणे व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वरानंदने गदिमा गीतांना उजाळा दिला.



subhash inamdar, Pune
9552596276
subhashinamdar@gmail.com
---------------------------------------------------------------------------------


माणूस आत्मकेंद्री..तुटक होत चाललाय......
चैत्रबन पुरस्काराच्या मानकरी मोनिका गजेंडगडकर यांनी लिहलेल्या भाषणाची प्रत हाती आली. ती त्यांचे यापाठिमागचे विचार त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. माणूस आपल्याभोवतीच कसा हरखून गेला आहे ते यातून स्पष्ट होईल...............................................



गदिमा प्रतिष्टानच्या वतीने दिला जाणारा चैत्रबन पुरस्कार मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने स्विकारत आहे. कुठल्याही पुरस्काराचे मोल कलावंताच्या वा लेखकाच्या दृष्टीन मोठेच आसते, कारण त्याच्या कलेला, लेखनाला पुरस्काराच्या रुपाने मिलालेली ती एक उत्कट अशी दाद असते नि त्याच्या लेखनाचा तो गौरवही असतो. मात्र चैत्रबन पुरस्काराबाबतची माझी भावना थोडी वेगळी आहे...
या पुरस्काराचे मोल माझ्या लेखी अनमोल आहे. एक म्हणजे ग. दि. माडगूळकर या प्रतिभावंताच्या नावाचा हा पुरस्कार आहे. म्हणूनच माझ्या लेखनाच्या गौरवापेक्षाही मला हा एखाद्या आशीर्वादासारखा अलौकिक वाटतो. गौरवामध्ये कौतुकाची थाप असते. पण मिळालेला आशीर्वाद हा शाश्वत असतो. आणि या आशीर्वादातले चिरंतनत्व आपल्या वाटचालीला एखाद्या दिव्यासारखा शांत, निर्मळ प्रकाश दाखवित पुढे जाण्यासाठी सतत प्ररित करीत रहातो.
मी एका लेखकाची मुलगी- विद्याधर पुंडलीक माझे वडील. ही ओळख मला आवर्जून सांगाविशी वाटते आणि त्याबद्दल मला कायमच अभिमानही वाटतो. पुस्तकांच्या, शब्दांच्या संगतीत, सोबतीत मी वाढले. शब्दांचे सामर्थ्य़ काय असू शकते, हे जवळून अनुभवता अनुभवता त्याच शब्दांशी मैत्र कधी नि कसं जुळलं गेलं आणि माझ्या बोटात कसं झिरपलं हे मला समजलं नाही. स्वतःला व्यक्त करण्याची एक आस बनून मी लिहिती झाले. आज गंमत वाटते की , हे शब्द माझी खरी ओळख बनून जातील याची कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती. मुळात महत्वाकांक्षी मी नव्हतेच. आजही नाही. परंतु तरीही एका उर्मीने मला जे जणवलं ते दिसलं, जे भिडलं, भेटलं, ठसलं ते माझ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथेतून करत गेले आणि त्याचा एक ध्यास लागत गेला.
माझ्याकडे माझ्या वडिलांचा लेखनाचा वारसा आला, असे सगळे म्हणतात. पण मी म्हणते, माझ्या वडिलांकडून वारसा आला तो त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचा. (त्यांनी मला दिलेल्या संगीताच्या- सतार वादनाच्या कलेमुळे माझ्यातल्या संवेदनक्षमतेला अधिक तीव्र केलं.) मला का लिहावसं वाटलं... तर माणसं वाचण्याच्या अत्यंतिक ओढीमुळे.. माणसं समजून घेण्याच्या आंतरिक तळमळीमुळे.
माणसांबद्दल, त्यांच्यातल्या नात्यांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. आयुष्याबद्दल मला पडत गेलेल्या प्रश्नांमुळे आणि त्यांना विकल करुन टाकणा-या त्यांच्या वाट्याला येणा-या अनेक प्रकारच्या आर्त वेदनांमुळेही.
आज जागतिकीकरणाच्या अफाट घोंघांवत आलेल्या नि आपल्यावर आदळणा-या एका महाकाय शक्तीने आपलं सगळं जगणं ताब्यात घेतले आहे, इतकं की माणूस म्हणून आपला चेहरा, आपली ओळख आपण स्वतःच कुरतडत विद्रुप करत चाललो आहोत.
याशक्तिचा पाठलाग आपल्याला फक्त धावायला लावतो आहे--- का, कशाकरता, कुठे अखेर हवं तरी काय आहे आपल्याला- माहित नाही. आपल्याला एक संस्कृती आहे. आपल्याला आपली अशी समृध्द भाषा आहे. आपल्याला मूल्यविचारांची पार्श्वभूमी आहे. मुख्यतः आपण माणूस आहोत म्हणूनच आपल्याला दुस-य माणसाच्या सोबतीची, आधाराची, स्नेहाची गरज आहे.... कारण आपण बधीर नाही, तर आपल्याला संवेदना, भावना आहेत....
पण...दुर्दैवाने आपण एक चालते बोलते जिवंत माणूस आहोत, हे विसरत चाललो आहोत. हे विसरत चाललो असताना त्याची साधी खंतही आपल्याला वाटेनाशी झाली आहे इतके एकटे, आत्मकेंद्री होत स्वतः पासूनही तुटत आपण दूर चाललो आहोत...एकूणच या टप्प्यावर माझ्यातल्या लेखिकेसमोर आताचं आपलं जगणं कितीतरी प्रश्न बुचकळ्यात टाकते आहे आणि मी यातलाच एक माणूस म्हणून स्वत-लाही अजमावते आहे. थोडक्यात लेखिका म्हणून माणसांना समजून घेण्याचा माझा हा शोध संपणारा नाहीये. त्याच्या दिशा बदलताहेत....त्या विस्तारत जाताहेत....
लेखनाचा हा शाप लिहिता लिहिता स्वतःकडेही तटस्थपणे पहायला लावणारा असतो. तसा उत्कटतेच्या पातळीनरुन त्याला एकटं करणारी नि तरीही समाजाच्या, माणसांच्या अधिक जवळ जाण्याचा अथक् प्रयत्न करायला भागही पाडणारा असतो. दुसरीकडे त्याला स्वतःला माणूस म्हणून तो प्रगल्भपणे वाढवणारा असतो. अशा वळणावर चैत्रबन पुरस्काराच्या रुपाने आशिर्वादाचे हात जेव्हा पुढे येतात, तेव्हा माझ्यातल्या लेखिकेला म्हणूनच एक उर्जा मिळाल्यासारखे होते. आपल्या लेखनावर दाखविलेला हा विश्वास स्वतःकडूनही लेखिका म्हणून अधिक अपेक्षांची मागणी करु लागतो. आपलीच आपल्याशी स्पर्धी मांडत, आपण घेत असलेला माणसांचा शोध अपुरा ठरवत, आपण उभे केलेले आपणच मोडून पुन्हा नव्याने शोध घेत नव्याने घडवावे...अशी काहीशी आव्हानं उभी करत रहातो.




डॉ.मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई

न संपलेले




सुकून गेली फुले तरीही
गेध त्याचा मनी दरवळावा....
संपून गेला पाऊस तरीही
ओल्या आठवणी तशाच रहाव्या...
संपून गेले चांदणे तरीही
चंद्र नभीचा मनात दिसावा...
संपून गेला सहवास तरीही
स्पर्श सुखाचा पुन्हा आठवावा...
संपून गेली वाट तरीही
थांबा क्षणाचा सुंदर वाटावा...
संपून गेले शब्द तरीही
भाव प्रेंमाचा तसाच रहावा...
संपून गेले क्षण सुखाचे, तरीही
गोडवा त्याचा कधी न व्हावा....


श्रीकांत आफळे, पुणे
०२०- २४३६७५३२
९८९०३४८८७७

Monday, December 12, 2011

अंकुर आनंदाचे

आमच्या भविष्य जाणणा-या एका मित्राची हा भावना या कवितेतून मांडत आहे....
दाद द्यावी...



subhash inamdar
--------------------------------------------------------


अंकुर फुटावे एके क्षणी
आनंदाचे जीवनाला
अन् प्रवाह मिळावा
जीवन सागराला..


शब्द तेच होते कालचे
आज त्यांना अर्थ मिळाला
श्वासात त्या नवा प्राण
आणि नवा गंध मिळाला...

त्रतू आज कोणताही
वसंत वाटू लागला
जीवनाला क्षणोक्षणी
बहर येऊ लागला..


बांध मनाचा आनंदाने
भरुन वाहू लागला
चेह-यावर नवा नवा
रंग खुलू लागला...

जीवनाच्या मैफलीत
एक नवा सूर लागला
जगण्याला एक नवा
अर्थ आज लाभला....






श्रीकांत आफळे, पुणे
श्रीकांत आफळे, सी-१--९, गुरुराज सॉसा. पद्मावती, पुणे-४११०३७..फोन- (०२०) ४३६७५३२. मोबा.९८९०३४८८७७

सुचले तसे













मंडळी,
अनेक भावभावनांचे कोंब नव्याने पुन्हापुन्हा फुलतात...मी तेच साठवण्याचा प्रयत्न करतो...माझे मुक्तछंदात्मक स्वरुपात ते साठवितो...यात कोणताही आकार अभिप्रेत नाही...जे भासले..दिसले...आणि आठवावेसे वाटले तेच इथ शब्दातून व्यक्त करण्याचा हा एक अंशात्मक प्रयत्न....
मात्र ते सारे एकत्रित असावे यासाठी हा शब्दसोहळा इथे टाकत आहे..कुणाला यात स्वतः भासले तर तो यागायोग समजावा....वृत्त छंद...य़ाच्या पलिकडे जावून अनेक बंधनात मुक्त झालेली ही माझी शब्दांजली.....


सावधान असावे
व्यवधान नसावे
कार्यरत रहावे
सदैवही...

उरी शाती असावी
चित्त स्थिर राखावे
एकचित्त व्हावे
सदोदित...

विचार ऐसा ठेवावा
आचारही उत्तम राखावा
किमया नावाची उरावी
जगामध्ये.....

मैत्र अवघ जोडावे
स्वत्व तेही राखावे
बंधनात रहावे
कधीतरी....

अंती सुखाची आस
परमेशाचा ध्यास
चिंतनशील रहावे
क्षणोक्षणी.....






सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
9552596276
---------------------------------------------


तू दिलेला स्पर्श
आठवतो या क्षणी
आवरोनी मी मला
हरवतो या क्षणी
घेतलेला वसा मनीचा
ना कधी विसरणार
दिलेले वचन तुला
अखेरपर्य़ंत पाळणार
---------------------------------
विरले धागे
वस्त्रही उरले
ठिगळ दिसे
फसले सुटले
कधी कुणासाठी
झुरलो नाही
कधी कुणाचा
उरलो नाही
कधी विसावलो
कधी नादावलो
आकंठ बुडालो
तुझ्यामनी
-------------------------------------------
माझे जगणे कुणासाठी
स्वतःच्या मनासाठी
माझे रुसणे कुणासाठी
माझ्यातल्या त्या साठी
माझे अस्तित्व कुणासाठी
सत्य, सुंदरते साठी
माझे हसणे कुणासाठी
आनंद घेणा-या त्या साठी
माझे जीवन कुणासाठी
माझ्यावर प्रेम करणा-यांसाठी
माझे मी पण कुणासाठी
तुझ्यातल्या हरवलेल्या त्या साठी
-------------------------------------------
दिसताना तु किती साधी वाटते
अनुभवताना तूला
आदरयुक्त भिती वाटते
-----------------------------
आयुष्य ओघळताना
जुनेच क्षण आठवतात
नात्याचे धागे गुंफताना
विषण्णता पसरवतात
---------------------
अक्षदा पडतात पडदा दूर होतो
समोर एक सुंदर चेहरा येतो
मेकपने लगडलेला सुंदर आभास होतो
....कुठून काहीसे भासमय सत्त्यात येते
सकाळचे वास्तव आत्ता कुठे हातात येते
शब्द संपतात ओठ रंगतात
चेह-यावरचे मार्दव लाजून दुर होते
शरीरात हुरुप येतो सहवासाची ओढ लागते
एकमेकांच्या कुशीत शातपणे विसावते

आरंभ होतो...तसा शेवटही होतो
एकमेकांसाठी जगण्याचा अध्याय सुरु होतो
----------------------------------------

मी माझा अनुभवताना
मी माझाच रहात नाही
गुंतून तुझ्यात
मी माझा कधीच उरत नाही
----------------------------
सांधलेले क्षण
पुन्हा दरवळतात
जडावलेले ओझे
तसेच शुन्य भासतात
------------------------------------

कुंतल काळे मऊ मुलायम
कळी गुलाबी खुलली गं
-हदयी उठली एक शिरशिरी
कळले तुजला उमजेल गं
शरीरी माझ्या उठे कंपना
अशी भरारी घ्यावी गं
अलगद वाटे तुझ्या जवळी
बिलगुनी घ्यावे तुजला गं
एक अनामिक ओढ लागली
कधी तू मजला दिसली गं
भेटीमधले क्षण रुपेरी
मनी माझीया रुतले गं
जावे हरवूनी अलगद वाटे
हात हाती पकडला गं
हेच उरे मनी स्वप्न माझे
मिठीत तुझीया जावे गं
---------------------------------------------

भेटलेल्या प्रत्येक क्षणाची
पुनरावृत्ती नसते
एक क्षण कधीही
दुस-या क्षणासारखा नसतो
------------------------------------

काल तू भेटलीस
मी तुला यापूर्वीही पाहिले
कालची तू ती नव्हतीस
तजेलदारपणा, तडफ
निराळीच होती
एका बाजूला तो तू निवडलेला
दुसरीकडे तो तू निर्माण केलेला
दोघांचा प्रभाव तुझ्यावर..
अलगद..पण स्पष्ट पडलेला
आता सारे नागचे विसरायचे
नव्याने आयुष्याला सामोरे जायचे
भरारी घ्यायची गरुडासारखी
बघ माझी आठवण येते काय....
--------------------------------------------

Monday, December 5, 2011

आनंदपंढरीचा विठ्ठल


भारतरत्न, स्वरभास्कर, कलासम्राट स्व. भीमसेन जोशी यांचे चरणी
सविनय, अर्पण.
आपल्या गायनक्षेत्रातील असामान्य पराक्रमाने भारतवर्षाची कीर्ति वाढविणा-या व अभिमानपूर्वक निर्देश करण्यायोग्य अशा ज्या व्यक्ति प्रभूकृपेने आम्हला लाभल्या त्यापैकी आपण एक आहात.
श्रेष्ठ विभूतीप्रमाणे संगीतक्षेत्रातील आपले स्थान एकमेव आहे.पुणे नगरी आपल्या ऐन उमेदीतील कार्यक्षेत्र झाले व येथील दीर्घकाळ वास्तव्यामुळे पुणेवासियांना आपल्याविषयी पराकाष्ठेचा अभिमान व आत्मभाव वाटत आला आहे.
संपऩ्न होण्याचे अनेक योग टाळून त्यात मोहवश न होता दूर सारले, ही आपली पुणेकरांवरील एकनिष्ठता व प्रेम आपल्या लौकिकाला ऊज्वलता आणित आहे.


आपण गायन कलेत सम्राट व संगीत क्षेत्रात महर्षी झालात. अनेक अनिष्ट योग उतारवयात सहन करुन
, आपण रसिकांसाठी, संगीताचे ज्ञानसत्र, `सवाई गंधर्व संगीत महोत्सवा`च्या रुपाने वयाच्या ८८व्या वर्षापर्यंत चालू ठेवले..याहुन अधिक स्थितप्रज्ञतेचे उदाहरण क्वचितच सापडेल.
सतत ६५ वर्षे आपल्या अभिजात अतुलनीय गायकीचे स्वरुप कोणत्याही लौकिक मोहाला वश न होता आपण निर्भेळ व सोज्वळ ठेवले आणि अनेकप्रकारच्या विरोधी वातावरणाला न जुमानता आपण परंपरेच्या कलोपासनेचा कर्मयोग अखंड चालू ठवला , हा आपला आदर्श रसिकांना स्फूर्तिदायक व कलाकारांना मार्गदर्शक झालेला आहे.

आपल्या विशिष्ट गायनकलेचे वर्णन करणे शब्दाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपल्या कलेचे स्वरुप तसे हिमालयाएवढे भव्य आहे.आपल्या गायनप्रकारात नृत्याचे लालित्य, शमशेरीची फेक, मल्लाचे डावपेच, नदीप्रवाहातले गांभीर्य व सागराची अथांगता आढळून येते. शिवाय आपली अगाध बुध्दीमत्ता व योजनाचातूर्य इत्यादी असामान्य गुणविषेशामुळे `स्वरभास्कर`, `भारतरत्न` या पदांवरुन द्रष्टा या दिव्य ध्रृवपदाला आपण पोहोचला आहात.

`सवाई गंधर्व संगीत माहोत्सवा`मुळे, तसेच महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील आपल्या सूदीर्घ वास्तव्यामुळे संगीत कलामंदीराची अनेक नविन दालने जिज्ञासू कलाव्यसंगी लोकांना ज्ञात होऊ लागली व त्यामुळे तरुण पिढीच्या गायनवेलीवर विविधता येऊ लागली.संगीतक्षेत्रातील आपली ही प्रभावी सत्ता संस्मरणीय होणारी व चिरकाल स्मरणात राहणारी आहे.

गायनकलेच्या स्वरसम्राट पदावर दीर्घकाळ असूनही आपल्या ठिकाणी अहंभाव अणुमात्र नव्हता. या आपल्या गुणाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. या आपल्या राहणीतील प्रतिष्ठीतपणा, भाषेतील तटस्थपणा, समतोल गुणग्राहकता, अल्पज्ञाविषयी वत्सलता इत्यादी गुण आदर्शवत् होते.
भारतीय संगीत कलेचे एक असामान्य वैभवशाली प्रतिक या भावनेने नम्र होण्यायोग्य एक महान विभुती आपल्या रुपाने आम्हास दीर्घकाल लाभली यातच पुणेकरांना अभिमान वाटतो.
ईश्वर आपल्या आत्म्यास शांती , हीच क्षीचरणी प्रार्थना...

साश्रुनयनांनी....

आपले पुणेकर रसिक.



शब्दांकन- मनोहर देशमुख ,पुणे
9850371464

सहज भेटलेलं ते फुल


अशा एका अवचित क्षणी `ती` भेटते..
तुमची ओळख होते
थोडं पुढं जावून स्पर्श करुन बघण्याचा आदेश येतो..

स्पर्श वाढत जातात
जादुभरी बोटं फिरू लागतात
तुम्ही तुमचे रहात नाही
तुम्ही कुणाचे तरी मन
त्याचे विचार ऐकत असता...

सहाजिकच त्यातच हरवून जाता..
हुरहुर लागते. ओढ वाढते.. त्या वेदनाही मग गोड वाटू लागतात..
क्षणांचा सहवास... अधिकाधिक लाभावा अशी इच्छा होवून जाते.
तृप्ती होत नाही. अधुरेपणा सतत जाणवतो..
तिचे मन नव्हे.. तीच तुमच्यापाशी रिती होत असते..

भावना संवेदना बोलल्या जातात.
थोडं ओझं वाटतं. पण ते समजून घेणचं
पहिल्यांदाच वेगळं काही अनुभवून सोडतं.

तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याशिवाय घागर
एकमेकांची नाती अस्पष्ट दिसू लागतात
समाज यालाच प्रेमाची उपमा देत असावे.
सहज भेटलेलं ते फुल हुंगावसं वाटतें....

आणि मग.....


subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, December 4, 2011

माझे `मी` पण


माझे जगणे कुणासाठी
स्वताः.च्या मनासाठी

माझे रुसणे कुणासाठी
माझ्यातल्या `मी`साठी

माझे अस्तित्व कुणासाठी
सत्य, सुंदर `त्या`साठी

माझे जीवन कुणासाठी
माझ्यावर प्रेम करणा-यांसाठी

माझे `मी` पण कुणासाठी
तुझ्यातल्या `त्या`साठी

आज प्रत्येक जण काही खास कारणाने सतत धडपड करत असतो..कारण काय?..कुणासाठी...मला सहज सुचलेल्या ह्या ओळी...पहा..तुमच्याही भावना कदाचित याच असतील...


subhash inamdar
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, November 20, 2011

पैसा हाच प्रमाण -गिरीश कुलकर्णी



गिरीश कुलकर्णी उवाच्

अक्षराधार आयोजित माय मराठीच्या ४२१व्या ग्रमथप्रदर्शनाचा समारोप प्रसंगी वळ, गाभ्रिचा पाउस, विहिर आणि देऊळ चे लेखक आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी मुक्तसंवाद केला.त्यावेळी त्यांनी मांडलेले विचार..त्याच्याच शब्दात देंण्याचा हा प्रयत्न...


शालेय शिक्षणात साहित्याची आवड जोपासली गेली. साहित्य हा कलेचा गाभा आहे..तिथेच वाचनाचा छंद लागतो. प्रत्येकाने तो जोपासावा..नविन मराठी शाळा आणि नंतर न्य इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे इथेच तो ध्यास जडला.भेट या जी ए कुलकर्णी यांच्या पुस्तकाने ते शब्दांचे गारुड मनात भरुन सोडले.
वाचताना त्या पात्रांच्या ऐवजी मला माणसे दीसू लागतात..आणि शब्दांमधला आस दिसतो..तो जाणून घेण्याचा विचार चालू होतो... तिच सवय आजही आहे.

अजूनही बाबुजींची गाणी, जुने संगीत, जुने लेखक, जुन्या कविता, तेच जुने पुढारी, सारेच तेच तसेच चालत आहे आहे...त्यांचा ठसा आजही कायम आहे...पूर्वसूरींच्या जीवावर किती काळ जगणार...जरा स्वतःचे नवे तयार करा..
तुमचे गाणं, नवे लेखन, नव्या कविता...आजच्या तपरुणांना जे आपल्याला भावेत ते व्यक्त होणं आवश्यक आहे. याची नितांत गरज आहे.. माझा अन्वयार्थ मी लावणार,,,तसा मी लेखनात लावतो..देऊळमध्ये तेच केले आहे..माझ्या भावना व्यक्त केल्यात...

आज शहरात एकसुरीपणा वाढलाय...त्यात भावना, निसर्ग काहीच शिल्लक खेड्यात आजही माणसं आठवतात..दिसतात ती त्यांच्या निसर्गाच्या परिस्थितीसकट...तेच अधिक भावते.त्यांच्या व्यक्त होण्यात प्रांजळपणा, मोकळेपणा आहे. खरं जगणं. ती मंडळी जगताहेत.. मला ती अधिक जवळची वाटतात...आजही माझे मन मुंबईंच्या शहरी जीवनात रमत नाही...तिथे स्वतः हरविला जातो....काम आटोपून केव्हा एकदा पुण्यात येईन असे होते.

टीव्हीवर दिसणारे सारे कार्यक्रम मालिका टुकार आणि पांचट आहेत. टीआरपी मीळविणारे कार्यक्रम भुक्कड आहेत.
कृतिप्रवण होणे ही आज काळाची गरज आहे...पैशावर नातेसंबंध जपले जात आहेत..त्यात खोटेपणा आलाय...पैसा हाच प्रमाण बनलाय...





( हे अपूर्ण आहे...)

Saturday, November 19, 2011

चारोळ्यांनी पुन्हा केले घायाळ..
















`माझे शब्द`च्या निमित्ताने चारोळीकार चंद्रशेखर गोखल्यांनी केला रसिकांशी मनमोकळा संवाद

`मी माझा अनुभवताना
मी माझाच रहात नाही
ऐकताना गुंतून तुझ्यात
माझा कधीच उरत नाही`

अक्षरधाराच्या ४२१ व्या माय मराठी शब्दोत्सवात चंद्रशेखर गोखले आले..बोलले..आणि आपल्या अर्थपूर्ण गप्पातून आणि सादर केलेल्या भावस्पर्शी चारोळ्यातून चटका लावून गेले...

शनिवारची संध्याकाळ ..१९ नोव्हेंबर २०११.. अकरा वर्षांनी जाहिर कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचकांसमोर आले ते पुण्यातल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने.
पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणा-याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत

या सहज सुचलेल्या पहिल्या चारोळीच्या अनुभवविश्वात नेवून इथं चंद्रशेखर गोखल्यांनी आपण अनुभवेलला अद्ष्य झालेला काळ पुन्हा दृष्य केला..आपल्या तेवढ्याच भावूक शब्दांतून..

आयुष्य जगताना येणा-या विरोधाभासातून या सहज सुचलेल्या चारोळ्यांनी त्यांच्या आयुष्याच जे परिवर्तन घडविले..विशेषतः `प्रिया तेंडूवकरांनी आपल्या पिशवी तपासताना माझा कवितेची वही उलगडून पाहिली आणि ती वाचतच गेली. तिने भराभर फोन केले...आणि लोकसत्ताच्या कार्यालयात माधव गडकरी यांनी आपल्या सर्व सहका-यांना केबीनमध्ये बोलावून जेव्हा या चारोळ्यांचे वाचन केले तेव्हा..आणि लौकप्रभेत ह.मो. मराठे संपादक असताना चारोळ्यांनी स्वतःचे अस्तित्व सिध्द केले तेव्हा झालेला बदल`....ते आनंदाश्रुंच्या मदतीने सांगत गेले आणि रसिक टाळ्यांनी त्याला दाद देत गेले..

शाळेत शिक्षक हुशार मुलाला पुढे बसवितात..त्यांना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायची पार्सलिटी करतात....मात्र अभ्यासात कच्च्या असलेल्य़ा माझ्यासारख्या मुलाला वर्गात मागच्या बाकावर बसवू काय बैलोबा..म्हणत..जेव्हा विचारतात..तेव्हा त्यावेळी येणारे नैराश्य..कधी कधी अनेकांच्या जिव्हारी लागते...मला ही ते बोचायचे...म्हणूनच उपस्थितातल्या शिक्षकांनी त्यांनी विनंती केली की, हुशार नसलेल्या मुलातही काही चांगले गुण असतात त्यांना सारखे हिणवू नका...त्यांनाही माणूस म्हणून वागविण्याचे आवाहन केले.

`संघर्ष, कष्ट आणि आयुष्यात नोकरी करायची नाही..या लिखणावर जगायचे ठरविले..आजपर्यंत तेच केले..मात्र ज्यांनी सतत अवहेलना केली त्यांच्या शेजारी मान्यवर म्हणून बसायचा मान मिळतो..तेव्हा..माझे मलाच आश्चर्य वाटते.. आणि असे वाटते ...त्यांनी त्यावेळी आपल्याला योग्य प्रोत्साहन दिले असते तर अधिक कांही माझ्याहातून घडले असते असे वाटते...` ;गोखले सांगत गेले.

आपल्याला इंग्रजी जमत नाही.. आणि तरीही माझे अजूनही कधी अडले नाही...मी नापास झालो..तरीही भावना व्यक्त करण्यात कमी पडत नाही...हुशारात गणला गेलो नाही....तरीही कलेतल्या मान्यवरांचे आशिर्वाद....क्वचित त्यांनी माझ्या सह्या घेतल्या.... सारेच ते बोलत असताना..

मधुनच..एखादी चारोळी सांगतात आणि त्यापाठीमगचे घटना ऐकवतात तेव्हा तर हे यांना कसे सुचते असेच जाणवत रहाते..
अंधेरीला माईकडे रहायलो गेलो..पण आई-वडिल पार्ल्यांला...एके दिवशी माझी पावले सहजपणे जुन्याच पार्ल्याच्या घराकडे वळली..गोखलेच्या घरात सगळे दिवे सुरु होते.. तेव्हा ध्यानात आले..मी चुकीनं इथं आलो..मी माईकडे अंधरीला रहातो...दारातच पावलं थबकली आणि चालतो झालो...आणि ओळी आल्या

प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
प्रतेकाला एक घरटं असावं
संध्याकाळी परतण्यासाठी


आपल्या मित्र नव्हते..आणि फारसे नाहीतच...म्हणून आयुष्यभर मी शब्दांशीच बोललो..आणि लेखनाचे व्यसन लागलं...
घरात पालक सांगतात..मुलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं रहावं...मुलीला म्हणतात..काय नाचायचं ते त्या घरी जावून नाच... चेद्रशेखर गोशले यांना या वाक्यांचा तिटकारा आहे..ते सांगतात... पालकहो..मुलाच्या पायात बळ देण्याचे सोडून त्याला स्वतंत्रपण सोडून देणं किती बरोबर...मुलीलाही फुलायचे ..उमलायचे..बहरायचे नाचायचे..ते माहेरी..तिला स्वतः अस्तित्व ..जग मिळायला पालकांनीच मदत केली पाहिचे..जग पाहण्याचे आणि अनुभवण्याचे बळ त्यानीच दिलं पाहिजे....
१८ एप्रिल १९९० ला माईंच्या आर्थिक बळावर `मी माझा` पहिले पुस्तक प्रकाशित झालं...मग मात्र आपण मागे वळून पाहिले नाही...

तसा मी लाजरा, बुजरा...इथंही येण्याबूर्वी आपण बोलू शकू की नाही..अशी भिती मनात होती...
मात्र असे म्हणतानाच स्वतःचे आयुष्य उसवत ते मागे मागे..काय घडलं..माणसं कशी भेटली...एका स्टुडिओच्या लिफ्टपाशी माझ्या देवता असलेल्या आशा भोसले यांनी माझ्या समोरचर `मी माझे` पुस्तक पुढे करुन यावर `सही कर` म्हणून दरडावले..तो क्षण आपण आयुष्यात विसरु शकणार नाही..असेच कांही सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे आज वयाची पन्नास वर्ष पूर्ण करताना ( ८ जानेवारी २०११) पाणावताना पाहिले..की आपणही हळवे बनतो...
त्यांचे एकच सांगणे होते माणसाला माणूस म्हणून समजावून घ्या...त्याच्यात लपलेल्या गुणांना शोधा..त्याला प्रोत्साहन द्या....

ही संध्याकाळ बोलती करणारे आमचे मित्र संजय बेंद्रे यांनीही `तू नसतास आलास तर चालले असते... कारण तूझ्या जाण्याचे दुःख अधिक होते...असे सांगून हूरहूर व्यक्त केली.






सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, November 13, 2011

समाजासाठी एक वस्तुपाठ-कलागौरव पुरस्कार


मुलाच्या स्मृतिसाठी ...कलावंतांना पुरस्कार
अनंतरंग आर्ट फौंडेशनचे कला गौरव पुरस्कार आणि त्यामागची भूमिका


रविवारी १३ नोव्हेबरला पुण्यात भारत गायन समाजात असंख्य संगीत श्रोत्यांच्या साक्षीने बालरोगतज्ञ डॉ. प्रमोद जोग यांच्या हस्ते समारंभपूर्वक कलागौरव पुरस्कार श्रीपाद भावे आणि सौ. अस्विनी गोखले यांना तो दिला गेला.
प्रथम तो ३०० रुपयांचा. मग ५०० आणि नंतर ७५० रुपयांचा झाला. आणि गेली काही वर्षे तो १००१ रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन वितरीत केला जातो. त्यासाठी काही लोक स्वेच्छेने पैसे देतात..पण न मागता...पण त्यासाठी स्वबळावर तो देण्याची परंपरा भिड़े कुटुंबीय जपत आहे.

या `अनंतरंग आर्ट फौंडेशनचे` कार्यवाह चित्रगुप्त भिड़े सांगतात... पुरस्कारासाठी आम्हीच नावे ठरवितो. काहींचा सल्लाही घेतो. आत्तापर्यं दिल्या गेलेल्या पुरस्कारात मधुवंती दांडेकर, विजय कोपरकर, कै. शरद गोखले, मुकुंदराज गोडबोले, रविंद्र कुलकर्णी, प्रभाकर करंदीकर, अश्विनी भिडे, सानिया पाटणकर, संजीव मेहेंदळे, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे, आनंद भाटे, राजीव परांजपे, सुचेता अवचट, संपदा थिटे ,उदयन् काळे, मानसी खांडेकर, बिल्वा द्रविड अशा अनेक गायक-वादकांचा समावेश आहे.

अनंत भिडे. हे ज्येष्ठ चित्रकला शिक्षक. अनंतरंग आर्ट फौंडेशन यानावानं ते वयाच्या ७७व्या वर्षी आपली कला जपत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होत असतात. आपल्या मिळालेल्या कमाईतला काही वाटा ते आवर्जुन समाजोपयोगी कार्यासाठी दरवर्षी वापरतात. त्यातलाच एक भाग म्हणजे सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या श्री नृसिंह मंदिरात ते गेली दहा वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला ३०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा करतात. यंदा तर त्यांनी पितळी निरांजने विकत घेऊन त्या १५० कायमस्वरुपी प्रकाशांनी मंदिर उजळून निघाले होते.

त्यांचा तिसरा मुलगा जन्मापासूनच मेंदुच्या पक्षघाताने आजारी असायचा. त्याला कुठलाही उपचार नाही. तो उठून बसणेही शक्य नाही. हाताच्या आधाराने बसायचा. मोजकेच अन्न भरवायचे. आई, बाबा, काका आणि आमा एवढेच चार शब्द तो उच्चारु शकायचा. सर्व उपचारानंतर तो जन्मभर तसाच रहाणार. उठणे आणि चालणे शक्य नाही. कधी झटका येईल याची खात्री नाही. त्याही अवस्थेत अनंतराव भिडे आणि त्यांच्या पत्नी यांनी आपली रोजची कामे , नोकरी सांभाळून या मुलाला..त्याचे नाव विश्वजित ...सांभाळले. अगदी २२ वर्षे. बुध्दीत वाढ होणार नाही..म्हणून शाळेत नाव नाही.. केवळ जन्म दाखला..एवढेच... त्या काळात दोघांनी आणि घरातल्या दोन्ही मुलांनी या `विश्वजीत`ला जपले. पेरुगेट भावे हायस्कूल मध्ये चित्रकला शिक्षकाचे काम ध्यासाने केले. विश्वजीतच्या काळात..कुठे सभा-समारंभात जाणे नाही... नाटक, सिनेमा पहायचा नाही. सारा वेळ मुलाच्या पालनपोषणात...घालविला...

विश्वजीतला बोलता..येत नव्हते..मात्र.. क्रिकेटचे वेड अफाट..टीव्हीवरची सगळी मॅच तो पहायाचा..मात्र लंच झाला की तो संतापायचा...भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत त्याला फार प्रिय होते. गाणे बंद झाले की तो अस्वस्थ असायचा..ते संपण्याआधी ते वडिलांना खुणेने सांगायचा..


आयुष्यातली २३ वर्षे..जपल्यानंतर तो १९९७ साली गेला. मात्र तुमचा विश्वास बसणार नाही..गेल्यानंतर महिन्याभराने अनंत भिडे यांच्यासमोर हजर झाला आणि मी दुस-यांकडे उत्तम असल्याचा साक्षात दृष्टांत दिला. भावाला `तुम्ही समारंभाला जाता पण माझे पोटाचे काय? `, असे स्वप्नात विचारले..त्यानंतर रोज सकाळी त्याला वरणःभाताचा नैवैद्य दाखवून मगच आम्ही जेवतो...अनंतराव भिडे सांगत होते..

तो तसा मासाचा गोळाच जणू..पण आमच्याकडे जन्माला आला हे भाग्य..आमच्याकडून सेवा व्हायची होती..म्हणून...त्यांचे नाव कुठेच नाही..केवळ जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यापुरते उरले..त्याचे अस्तित्व आणि नाव जागविण्यासाठी त्याला आवडत असलेल्या संगीतात काम करणा-या कलावंतांना गेली १३ वर्षे त्याच्या नावे पुरस्कार देण्य़ाचे व्रत हे कुटुंबीय करतात. स्वतःच्या पैशातून..हे कायम रहावे यासाठी एक लाख रुपये त्यासाठी डिपॉझिट ठेऊन त्याच्या व्याजातून दरवर्षी दोन कलाकारांना कलागौरव पुरस्कार दिला जातो.

आपल्याकडून समाजासाठी काही करावे यातूनच हा एक वस्तुपाठ अनंत भिडे आणि त्यांचे कुटुंबीय जपत आहेत. आपल्या मुलाचे हाल तर पाहिले..सोसले...त्याला बळ दिले..जगायला दोन हात दिले...आणि तो गेल्यावर त्याचे नाव अशा त-हेने पुरस्कार देऊन समाजासमोर ठेवले..

हा एक आदर्शच आहे..त्यासाठी यात राबणा-या सा-याच हातांचे आभार....



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276