Thursday, September 26, 2013

'संहिता - The Script' - येत्या ११ ऑक्टोबरला




दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २० पुरस्कारांवर नाव कोरलेला आणि सहा विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झालेला चाकोरी बाहेरचे विषय हाताळणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. 'अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहकार्याने निर्माण झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्टस लि.' ने केली असून, प्रस्तूती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेची आहे.

साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटाच्या सर्वोत्तम संगीतासाठी असलेला पुरस्कार शैलेंद्र बर्वे यांना तर सर्वोत्तम पार्श्वगायनासाठी असलेला पुरस्कार आरती अंकलीकर यांनी गायिलेल्या 'पलके ना मोडो… ' या गीतासाठी मिळाला असून हे दोनही पुरस्कार सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' या चित्रपटासाठी मिळाले आहेत. 

ही कथा आहे एका चित्रपट दिग्दर्शिकेची. ब्रिटीश राजवटीच्या काळातल्या म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या आधी एका शाही संस्थानाच्या काळात या चित्रपटातल्या घटना घडतात, अशी कल्पना ती करते. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे एक राजा, एक राणी आणि एक राजगायक यांची गोष्ट होऊन बसते. त्याचबरोबर त्यात प्रेम, दुरावा, अगतिकता आणि ध्यास याही ओघानेच येतात. गंमत म्हणजे अश्या या सगळ्या कथानकाची कल्पना करता-करता त्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या खाजगी आयुष्यातल्या घटनांचेही बेमालूम मिश्रण त्यात होऊन जाते. चित्रपटाचा निर्माता, लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शिकेसमवेत इतर तिघीजणी असे सगळेजण मिळून त्या चित्रपटाचा आणि व्याक्तिगत जीवनाचा शेवट देखील समाधानाचा आणि गोड कसा होईल याचा शोध घेतात. थोडक्यात सांगायचे झाले तर संहिताची गोष्ट ही स्वतः त्या चित्रपट दिग्दर्शिकेचीच आहे. 

 'संहिता - The Script' चे दिग्दर्शन करणारे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी आजवर बारा चित्रपट, चाळीसांहून अधिक लघुपट, पाच टेलिफिल्म्स आणि एक मालिका यांची निर्मिती केली असून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील असंख्य पुरस्कार मिळवले आहेत. 

 'संहिता - The Script' या मराठी चित्रपटाची निर्मितीसाठी तीन मान्यवर संस्था एकत्र आल्या असून सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्ट्स लि.' ने तसेच अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहयोगाने सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेने हा चित्रपट प्रस्तुत केला आहे.

 'संहिता - The Script' चे कथा, पटकथा आणि संवाद लेखन सुमित्रा भावे यांचे आहे तर गीतलेखन सुनील सुकथनकर यांनी केले आहे. संगीत शैलेंद्र बर्वे यांचे असून पार्श्वगायन आरती अंकलीकर यांचे आहे.

 सिनेमेटोग्राफी संजय मेमाणे यांची असून संकलक आहेत मोहित टाकळकर. कला दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि संतोष संखद यांचे आहे तर वेशभूषा गीता गोडबोले आणि सुमित्रा भावे यांनी केली आहे.  'संहिता - The Script' मध्ये देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठये, नेहा महाजन असे प्रमुख कलाकार आहेत.                        
                              

Monday, September 23, 2013

प्रत्येकाच्या मनात ...

शोध घेत आहे..कुठे स्वतःला रमवावं..काय नव करावं ज्यामुळे मनही मानेल आणि काही काम केल्याचा अनुभव येईल..एके काळी काम इतकं असायचं की पडल्यापडल्या कधी डोळा लागला ते कळायचंही नाही..आज मात्र उलटं आहे..आज काय काम काय याचा विचार करावा लागतो. खरं विचार करायचा झाला तर अनुभव असा आहे...कुठलेही काम कमी नाही हे मनात ठरवून काय केलं तर..त्याचा आनंद अधिक घेता येतो.. घरातलीही खूप कामे असतात..ती सहजपणे आपण करुन घरातल्या वातावरणात स्वतःला रमवून घेऊ शकता..


प्रत्येकाचा एक दिवस असतो
तेव्हा कुणी कुणाचा नसतो
उरतो तो स्वतः असतो
विचार न करताही तो दिसतो
मनताही त्याचा विचार पक्का असतो
तिथे कुठलाही अविचार नसतो
फक्त निग्रह कायम असतो

माणसावरचे प्रेम आतप्रोत असते
सारे काही त्या शब्दात सांधते
कितीही झाले तरी त्याचा एक काळ असतो
त्याचा आग्रह मग निग्रह असतो
कुणाचे राज्य त्याच्यावर नसते
तो स्वतंत्रपणे भासत असतो

प्रत्येकाच्या मनात असा दिवस येतो
काहीना काही सांगून जातो
नकळत सारे घडत असते
त्याचेसाठी सारे काही असते
त्याला विचारत सारे काही सुरु असते
त्याचे मत मग महत्वाचे असते


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, September 17, 2013

आपण हे पाळू या...

आपण हे पाळू या...


आयुष्यात दुस-याच्या दुःखात
आणि सुखात
सहभाग घ्या..
...समाधान सहज मिळेल.

दुस-याला मदत करता आली नाही तरी चालेल...
पण विनाकारण डिवचणे चांगले नाही.

घरात आपल्यापासून इतरांना त्रास होईल
असे वागण्यापेक्षा
त्यांच्या आवडी-निवडी जपायचा प्रयत्न करा..

समाज कार्यात
स्वतःचा स्वाभिमान सोडून तन,मन
आणि जमेल त्या धनाने सामिल व्हा..
मन तृप्त होईल..

आनंदाच्या प्रसंगी आणि
 दुःखाच्या वेळी
मित्र , नातेवाईक आणि शेजारी यांच्याकडे जा...
माणूसपण जपले जाईल...

वेदना, विरह यापासून विरक्ति घेऊन
समाधानात सुख मानून..
मनशांत ठेवा



सुभाष इनामदार, पुणे

Saturday, August 24, 2013

'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत नव्या स्वरुपात



 
बकिंमचंद्र चटर्जी लिखित 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा नव्या स्वरुपात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय देश बांधवांच्या भेटीला आले आहे.. गायक - संगीतकार ऋग्वेद देशपांडे व  'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'ची प्रस्तूती असलेल्या या राष्ट्रभक्ती जागविणाऱ्या गीताचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पश्चिम येथील  युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आले.
 
या नव्या गीतांचे संगीत ऋग्वेद देशपांडे  यांनी केले असून संगीत संयोजन वरद खरे यांनी केले आहे. आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, अनघा ढोमसे आणि  ऋग्वेद देशपांडे यांनी या गीतात आपला स्वर 
मिसळला असून सतारवादक शेखर राजे आणि प्रसाद रहाणे यांच्याबरोबर बासरीवादक डॉ. हिमांशू गींडे यांनी सातसंगत केली आहे. 
 
या गाण्याचे रेकॉर्डींग ठाण्यात ऋग्वेद देशपांडे यांच्याच 'आरडी म्युझिक' या स्टुडिओत झाले असून   व्हिडिओ स्वरुपातील  गीत 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' ने तयार केले आहे. या  व्हिडिओ  गीताचे दिग्दर्शन सुमेध समर्थ यांनी केले आहे. `वंदे मातरम` हे संपूर्ण काव्य आजच्या तरुणाईच्या विस्मरणात जाऊ नये आणि आपल्याला कलात्मकतेने आपल्या भारत मातेला वंदन करता यावे असा दुहेरी हेतू या गाण्याच्या निर्मिती मागे आहे असे संगीतकार  ऋग्वेद देशपांडे यांनी सांगितले. तर आजचे कलावंत आणि तरुणाई देशाविषयी खूपच सजग आहे आणि म्हणूनच हे देशाभिमान उंचावणारे  
राष्ट्रीय गीत आम्ही देशबांधवासाठी 
विनामूल्य बहाल करीत आहोत असे 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप'च्या वतीने मंदार गुप्ते यांनी सांगितले.

Friday, August 23, 2013

श्रावणात असायचे कहाणीचे पठण.

आजही आठवते ते जुने दिवस...
 श्रावणात असायचे कहाणीचे पठण.
सोमवारी उपवास असायचा संध्याकाळी लवकर भोजन
दुपारी शालेला सुट्टी यवतेश्वरला जाण्यासाठी
सातारच्या बोगद्याजवळ असलेल्या शंकरांच्या मंदिरात ही तोबा गर्दी चालत निघालो की तासाभरात यवतेश्वरी.
 किती भावीकता होती मनात स्वच्छ विचार होते. शंकराच्या पिंडीवर बेल वाहिली की मनालाही शांती मिळायची ...
गरजा कमी होत्या ..पैसाही हाती कुठे होता ...साध्याभोळ्या स्वभावाची माणसे प्रत्येकाच्या घरी असत आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ, सुखाने नांदत
एकमेकांत असूनही खासगीपणाची गरजच नव्हती भाकरी-आमटीची चव पुरणपोळीच्या वरताण होती.
कारण होते एक मनी होते समाधान..माणसात होती तेवढी जाण..
आजही मनात ते दिवस अधिक रुंजी घालतात.
श्रावणातल्या मंगळागोरीने घरे बहरुन जायची..
खेळ खेळणा-या मुलींचा ग्रुप पैसे देऊन बोलवावा लागायचा नाही..सारे कांही मनापासून उस्फूर्तपणे होत असायचे..
वाड्यातले वातावरणही तेवढेच खेळीमेळीचे असायचे.
एकाच्या घरचे कार्य म्हणजे सर्वांच्या घरातला तो आनंद असायचा...

काळाप्रमाणे आनंदही संकुचित झाला..ती घरे नाहीशी झाली..याबरोबरच ती मनेही..
मग विरंगुळा शोधला जाऊ लागला..
सारे कांही वेळेत...फार गाजावाजा न करता...

Wednesday, August 7, 2013

जयमालाबाइंच्या जाण्याने .संगीत रंगभूमी पोरकी



वय वर्षे ८७ चालू असताना किडनी काम करेनासे झाल्याने जयमालाबाई शिलेदार यांचे बुधवारी उशिरा रात्री २ च्या सुमारास निधन झाले..त्यांच्या दोन्ही कन्या कीर्ती आणि लता दोघीही त्यांच्याजवळ होत्या..त्यांच्यावर गुरूवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी वौकुंठ स्मशानभूमीतल्या विद्युत दाहिनीत अंतीम संस्कार करण्यात
आले..

गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे पार्थीव शरीर दर्शनासाठी..घरुन निघून बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर आणि टिळकस्मारक मंदिरात ठेवण्यात आले. संगीत, नाटक आणि कला क्षेत्रातल्या कलावंतांनी अंतीम दर्शन घेऊन झाल्यावर दुपारी पुण्यातल्या वैकुंठात अंतीम क्रियाकर्म करण्यातक आले. तिथे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी त्यांच्याविषयीचे आज गाणे संपले यां शब्दात त्यांच्याविषयीचे वर्णन एका शब्दात केले.


गंधर्वयुगाची परंपरा जपणा-या ..ती परंपरा स्वतः अऩुभवून ती आपल्या नाटकातून प्रज्वलीत करून ..पुढच्या पिढीपर्यंत पोचविणा-या मराठी रंगभूमीवर स्वतःची छाप पसविणा-या श्रेष्ठ ..अभिनय आणि गान कुशल अशा जयमालाबाई शिलेदार यांच्या निधनाने आज खरच मराठी संगीत रंगभूमी आईविना पोरकी झाली.

गेली काही वर्षे त्या सारे काही पाहू शकत होत्या पण बोलू आणि गाऊही शकत नव्हत्या..कीर्ती शिलेदार एका समारंभात मागे म्हणाल्या प्रमाणे ...`तिची आता मी आई झाले आहे.`..इतक्यापध्दतीने जपता जपता आज अखेरीस त्यांच्यावर नियतीने घाला घातला आणि त्यांचे निधन झाले..चेतनेतून त्यांचा देह अचानक अचेतन झाला..

संगीत रंगभूमीवर स्वतःची परंपरा सांगणारी आणि बालगंधर्वांच्या बरोबरीने काम केलेल्या कांही हयात असलेल्या मोजक्याच नव्हे तर अखेरच्या या शिलेदाराची आज अखेर झाली असे लिहले तरी ते योग्य होईल.

आपला सारा संसारच त्यांनी मराठी संगीत रंभूमीला बहाल केला..त्यातून दोन रत्ने मराठी रंगभूमीला अर्पण केली कीर्ती आणि लता... स्वतःची मराठी रंगभूमी ही संस्था स्थापन केली. जयराम शिलेदारांच्या खांद्याला खांदा लावून ती संस्था त्यांनी जपली, टिकविली, वाढविली...त्यांच्या भूमिकांचे गारूड आजही संगीत रसिक विसरु शकत नाहीत.

रंगभूमीवर कसे दिसावे..गाताने गालावर प्रेक्षकांना आनंद कसा दाखवावा..गाण्यात सहजता कशी अशावी..उत्तम वेशभूषा कशी करावी..अभिनयाचा भाग कितपत आणि किती असावा..इतर पात्रे गात असताना स्वतः कशी दाद द्यावी..सारे काही प्रत्यक्ष करुन दाखविणारी ही कर्तृत्ववान श्रेष्ठ कलाकार आज काळाच्या ओघात स्वतःचा ठसा मागे ठेवत आठवणीतच जगत राहिल्या आहेत.

थोडे मागे वळून पाहताना.. संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात शिलेदार कुटुंबाची घराणेशाही अशीच लोकांनी स्वीकारलेली ,. ‘मराठी रंगभूमी’ ही शिलेदार कुटुंबाची नाटय़संस्था यांनी जयराम आणि जयमालाबाई शिलेदार यांनी संगीत रंगभूमीवर अनेक उत्तमोत्तम नाटके सादर केली.  विवाहापूर्वी जयमालाबाई या प्रमिला जाधव या नावाने रंगभूमीवर सक्रीय होत्याच. १९४२ ते १९६७ हा त्यांच्या नाटय़कीर्दीतील बहराचा काळ. ‘देशांतर’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल टाकले. गोविंदराव टेंबे त्यांचे मार्गदर्शक होते. साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात त्यांनी बालगंधर्वाबरोबर प्रथम ‘सं. शारदा’मध्ये काम केले. पुढे त्यांनी गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केला. बालगंधर्व जेव्हा केव्हा काही कारणांनी नाटकात काम करू शकत नसत तेव्हा त्या त्यांच्या भूमिकेत उभ्या राहत. त्यांची उणीव सहज भरून काढत. गायनात बालगंधर्व त्यांचे आदर्श होते. त्यांचे अनमोल मार्गदर्शन जयमालाबाईंना  जयमालाबाईंना लाभले. 

सुरेल, लयीबरोबर जाणारे, भावस्पर्शी, लडिवाळ गाणे हे बालगंधर्वाच्या गाण्याचे वैशिष्टय़ जयमालाबाईंच्या गायनातही आढळते. अभिनयाचे धडे तर त्यांनी गणपतराव बोडस व चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या दिग्गजांकडून घेतले. हसरा चेहरा व सहज, लाघवी संवादोच्चार हे त्यांच्या अभिनयाचे विशेष. 


‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’, ‘मानापमान’ आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. ‘शाकुंतल’मध्ये त्यांनी जयराम शिलेदारांबरोबर प्रथम एकत्र काम केले आणि पुढे त्या त्यांच्या सहचारिणीच झाल्या. उभयतांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली आणि प्रारंभी बाळ कोल्हटकरांच्या ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’ इ. नाटकांची तसेच ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ यांसारख्या नाटकांची निर्मिती केली. जुन्या संगीत नाटकांचे प्रयोगही संस्थेतर्फे करण्यात येऊ लागले. आपल्या संस्थेशिवाय इतर संस्थांतूनही त्या कामे करत. छोटा गंधर्वाबरोबरची त्यांची अनेक नाटके गाजली. . 

त्यांनी नाटकात काम करण्याबरोवरच नवी पिढी जी नाट्यसंगीत शिकू इच्छीत आहेत त्यांना नाट्यसंगीताचे धडे देण्याचे काम केले..म्हणूनच आज संगीता नाटके जरी कमी होत असली तरी नाट्यसंगीता्च्या मैफली बहारदार होताहेत...याचे क्षेय जयमालाबाईंसारख्या काळाच्या पुढे पहाणा-या कलावंताना द्यायाला हवे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानीत अशा या जयमालाबाईंनी वयपरत्वे काम करणे बंद केले.तरीही संगीत नाटकाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती..त्यांचे याही स्थितीत मार्गदर्शन सुरुच असायचे...खरे सांगायचे म्हणजे त्यांनी संगीत नाटके जगविली..त्यांना नवे घुमारे दिले. नवी पिढी तयार केली..आजही कीर्ती शिलेदारांच्या रुपाने संगीत नाटकांचा हा प्रवास एकांडे ध्येयपथीकाच्या रुपात पुढे सुरु ठेवला आहे..

आजही त्यांची ती संगीत नाटकातली मानापनातील `भामिनी`,स्वयंवरीतली `रूक्मीणी`,सौभदातली `सुभद्रा`..एवढेच नव्हे शारदेतली `सिंधू` समोर उभी राहून रसिकांना मनमोहक अशा संगीताभिनयाने मोहवित असल्याचा भास होत आहे...अशा श्रेष्ठ आणि पिढी घडविणा-या ज्येष्ठ आणि सर्वांच्या मनात भरून राहिलेल्या जयमालाबाईंच्या स्मृतीत राहणेच मराठी रसिक अधिक पसंत करतील..

त्यांच्या गाण्यांची मोहिनी काळानुरुप कमी झाली असली तरी त्यांची ती स्नेहल मुद्रा आजही रसिकांच्या मनात तेवढीच जिवंत आहे..त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली..
या रुपाने हिच आमची शब्दांजली....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, August 4, 2013

मैत्री म्हणजे ...

आज मैत्री दिवस साजरा केला जातो..खरे मित्र कोण जो संकटाच्या वेळी उपयोगी पडतो...असे वस्तुतः म्हटले जाते..पण या मैत्री दिवसाचे वर्णन करणारी ही रचना ...



मैत्री म्हणजे नाही केवळ गाणे फक्त क्षणांचे 
मैत्री म्हणजे दो -हदयातील नाते युगायुगांचे..

मैत्री म्हणजे तरल मुलायम मोरपिस हळुवार
 मैत्री म्हणजे दोन मनांचे पंख मनांच्या पार..

मैत्री म्हणजे रंगवनातील झुळझुळणारे वारे 
सुख-दुःखाच्या पलिकडे ती जाणून घेते सारे ..

मैत्री असते नाजुक सुंदर भाषा डोळ्यांची 
शब्दाविणही पटते ओळख हळव्या प्रेमाची.. 

मैत्री हसते ,मैत्री रडते ,मैत्री जपते मित्र 
अशा मैत्रीचे चल रेखू या गोड गुलाबी चित्र...





-संगीता बर्वे, पुणे




Wednesday, July 31, 2013

माणसातला देव शोधणारे सविता भावे


ज्येष्ठ चरित्र लेखक सविता भावे यांचा आज  80व्या वर्षानिमित्त गौरव करण्यात येत आहे.

14 नोव्हेंबर 1933 रोजी मळवली येथे जन्मलेल्या भावे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पेण येथे झाले. पुढे फर्ग्युसनमधून बीए आणि भारतीय विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी घेतली. मात्र तातडीने विवाह करावा लागल्याने वकिलीऐवजी मुंबईतील "वेस्टर्न इंडिया लाइफ इन्शुरन्स'मध्ये नोकरीला त्यांनी प्राधान्य दिले.

नोकरीदरम्यान, "नारळकर इन्स्टिट्यूट'चे एन. जी. नारळकर भेटले. त्यांच्या प्रेरणेतून 1967 मध्ये त्यांचेच पहिले चरित्र लिहिले. त्याचे आचार्य अत्रे यांनी कौतुक करीत "मराठा'तून अग्रलेख लिहिला. त्यातून प्रोत्साहन घेत लोकमान्य टिळक, वालचंद हिराचंद, शंतनुराव किर्लोस्कर, विनोबा भावे, जे. पी. नाईक आदींसह एकूण छत्तीस चरित्रे भावे यांनी लिहिली. निळकंठ कल्याणी यांचे चरित्र लिहिण्याचा योग आला आणि भावे स्थिरावले.

भरभक्कम व्यायाम, संतुलित आहारामुळे प्रकृती ठणठणीत होती. त्यानंतर हृदयविकाराचे झटके येऊनही उदंड उत्साह आणि लिहिण्याची इच्छाशक्ती यामुळे त्यातून तरल्याचे भावे सांगतात. पत्नी कुमुदिनीनेही साथ देत तिन्ही मुलींचा उत्तम सांभाळ केला. आज नातवंडे, पतवंडे असा परिवार पाहण्याचे भाग्य लाभल्याचे ते नमूद करतात.

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने घरातून विरोध झाला. घर सोडावे लागले. वकिली करता आली नाही. संसारात पडल्याने राजकारणात जाण्याची इच्छा अपुरी राहिली. मात्र, अनेकांची चरित्रे आपल्या हातून लिहिली गेल्याचा आनंद वाटतो.
 
आपल्या `माणसातील माणूस` या आत्मचरित्रांच्या प्रस्तावनेत सविता भावे यानी नमूद केलेले त्यांचे मत त्यांच्याच शब्दात देत आहे.

आयुष्यातल्या माझ्या सा-याच धडपडीच्या तळाशी एक गोष्ट कायम राहिली आहे, ती म्हणजे माणसाच्या मनाचा आणि त्यातही माणुसकीचा शोध घेणे. थोड्याच काळात मला उमगले की, सर्वांत अनाकलनीय गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणूस.  जितका अनुभव जास्त तितके हे कोडे अधिकच गहन होत जाते.  पण प्रत्येक माणूस मुळात चांगलाच असतो, हा विश्वास असल्याने प्रत्येकामधील चांगुलपणा जाणून घेण्याचा माझा यत्न राहिला आहे. 
अगदी क्वचित उदाहरणांमध्ये माणसांच्या ठायी दुष्ट प्रवृत्ती वास करताना आढळते. मलाही आयुष्यात अशा दोघांना सामोरे जावे लागले. पण काय योग असेल तो असो, त्या दोन्ही बाबतीत त्यांना परस्पर शासन घडल्याचेही प्रत्ययाला आले. पण काही अपवाद वगळले तर मला समोरच्या प्रत्येकाच्या ठायी काहीतरी गुण किंवा चांगुलपणा वास करताना आढळतो आणि त्यामुळेच जगण्यातली गंमत कायम रहाते.

स्वतःमधील माणसाचा शोध घेणेही माझे सतत चालू असते. आपल्या वागण्याचा काय अर्थ होऊ शकतो याची मी सदैव फिकीर बाळगतो. आपल्याकडून कुणावरही अऩ्याय होऊ नये यासाठी सतत मी दक्ष राहात आलो आहे. शक्यतो माझे मतही कोणावर मी लादत नाही. म्ङणून कोणत्याही नव्या वृत्तीला किंवा आव्हानाला सामोरे जाण्याची माझी तयारी राहिली आहे. .

व्यक्तिगत-व्यावसायिक जीवनात अडचणी, अपेक्षाभंगाचे प्रकार अनेक घडले, पण त्या सा-यातून वाट काढीत पुढे चाता आले. व्यक्तिगत-कौटुंबिक आयुष्य समाधानाचे होते. व्यावसायिक जीवनात कष्टसाध्य पण भरपूर यश पदरी आले. पैश्या -अडक्याला कधी ददाद पडली नाही. ऐहिक सुखे सारी मिळाली. जो छंद जोपासला त्यात यश मिळाले, नाव झाले. प्रकृती उत्तम राहिली.




त्यांच्या सहवासात कांही काळ घालविता आला..त्यांचे स-दय मन आणि त्यांच्यातला माणूल अनुभवता आला..याचे समाधान मला अदिक आहे.माणसातला देव शोधणा-या या.........
 सविता भावे यांना विनम्र दंडवत.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Sunday, July 21, 2013

स्मरण गुरूंचे - पं. भीमसेन जोशी


मला पंडितजींच्याकडे १९७८च्या चैत्री पाडव्यापासून गाण्याचे शिक्षण घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त झाला. नंतर केवळ आठ दिवसातच त्यांच्या बरोबर गाण्याच्या निमित्ताने परगावी प्रवास करण्याचे योग सुरु झाले.

कुठेही प्रवासाला निघताना अत्यंत शिस्तबध्द पध्तीने उदा. प्रवासाला निघताना बॅग भरणे, प्रवासात लागणा-या सर्व वस्तू (स्वच्छ इस्त्री केलेले कपडे, लुंगी,दाढीचे सामान, पेस्ट, ब्रश इ.) व्यवस्थित बॅगेमध्ये आहेत का, हे पहाणे. वेळेच्या आधी किमान अर्धातास तरी इच्छित स्थळावर पोहोचणे याबबाबत पंजितजींचा कटाक्ष असे. अत्यंत शिस्तप्रिय हा एक त्यांच्या स्वभावाचा पैलू होता. 

मी पंडितजींना बाबा म्हणत असे. ते अत्यंत प्रेमळ होते. ब-याच वेळी गाणे शिकण्याच्या निमित्ताने माझा मुक्काम त्यांच्याकडेच असे. दररोज पहाटे चार वाजता ते उठायचे . स्वतः चहा करायचे. एखाद्या वेळेस मला जाग आली नाही तर ते स्वतः मला उठवत असत.  `उठा दात घासा...  तु चहा घे व मलाही दे ...`, असे सांगायचे.  चहा घेऊन झाल्यावर रियाजाला बसायची वेळ असायची. रियाजाला बसताना व गाण्याच्या मैफलीत बसताना मांडीवर तंबोरा घेऊन बसणे त्यांना अजिबात आवडत नसे. तंबोरा उभा घेऊन -अर्थवीरासनात ( मारूती बैठक ) बसायला लावत. सूर्योदय होईपर्यत फक्त खर्जाचा रियाज करायला लावायचे. एकदा असाच रियाज चालू असताना मी मध्य षडजावर चुकून एक स्वर लावला तर बाबांनी खिडकीकडे पहात `अजून सूर्योदय झाला नाही ., एवढे एकच वाक्य बोलले  व `खर्जाचे स्वर लावा `,असे सांगितले.

एकदा असेच गाण्याच्या मैफलीमध्ये त्यांच्या बरोबर गाण्याची साथ करत असताना सुंदरसा `कान्होबा तुझी घोंगडी चांगली `हा अभंग चालू होता. त्यामध्ये अनेक विविध ताना म्हणायला सांगीतले आणि मी मूळ चालीतली ओळ गायली ....त्यावेळी माझ्याकडे बाबांनी कटाक्ष टाकून मी म्हणलेल्या मूळ ओळीतून त्यांच्या चालू असलेल्या विविध ताना घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नेउन परत गाणे चालू केले. ती गाण्याची मैफल संपल्यानंतर मी अस्वस्थ झालो व आपण गाण्यात एवढी मोठी चूक केली या विचाराने मला रात्रभर झोप आली नाही. दुस-या दिवशी पहाटे गुरूजांच्याकडे रियाजाला गेलो तेव्हा मी त्यांचे पाय धरले आणि त्यांना म्हणालो.. `काल गाणे म्हणत असताना मी फार मोठी चूक केली.. `यावर ते मला म्हणाले..`अरे राजा..आपण केलेली चूक लक्षात येणे हे अत्यंत महत्वाचे आहे व आपण केलेली चूक मान्य करणे हा प्रामाणिकपणा व मोठेपणा आहे...अशा व्यक्तिलाच गाणं म्हणता येतं. आता अशी चूक परत तुझ्याकडून कधी घडणार नाही..`

माझ्या गुरुजींना गाडी चालविण्याची खूप आवड होती. असेच एकदा बेळगावला गाण्यासाठी त्यांच्या आवडत्या मर्सिडीज गाडीतून निघालो असताना गाडी सूरू केल्यानंतर मला म्हणाले..`आज काय गाडीचे तंबोरे जुळलेले दिसत नाहीत, जरा बेसूरच बोलती आहे..जरा पंडीत ओटोमोटीव्हमध्ये फोन लाव व बावडेकरांना  सांग की मी बोलावलं म्हणून..``.  श्री. बावडेकर आल्यानंतर त्यांनी गाडीची चाचणी केली व म्हणाले, `गाडी गॅरेजला न्यावी लागेल ..पण मी तुम्हाला एका तासाभरात गाडी आणून देतो` . गाडी परत आल्यानंतर बाबांनी बावडेकरांना विचारले  ,`काय झालं होतं.. `.बावडेकर म्हणाले ,`पंडितजी गाडीचा एक सिलेंडर बंद होता, आता दुरुस्त केला आहे. तुम्ही आता कुठेही घेऊन जावू शकता.. मग आम्ही  पुढील प्रवासाला निघालो..अशा पध्दतीने त्यांच्या रोमारोमात स्वर भिनलेला आहे.

 पंडितजींच्या अनेक अविस्मरणीय मैफलींमध्ये त्यांना मी तानपु-यावर गायन साथ केली. ते नेहमी मला सांगत....`तुम्हाला जेवढं गाणं येतं तेवढं प्रामाणिकपणे मांडा..   मैफलीत रियाज करु नका. प्रत्येक मैफल ही एक महापरीक्षा आहे आणि त्या परिक्षेत आपाल्याला उत्तम गुण मिळवून पास झालं पाहिजे. नक्कल करण्यापेक्षा स्वतःच्या आवाजाला काय झेपेल तेवढे नेमकेच घेऊन आपल्या गाण्यातले सैंदर्य वाढविता येते. त्यासाठी रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गाण्यानी जर आपल्याला आनंद वाटला तरच ऐकणा-यालाही आनंद मिळतो.`

 हे स्वरसंगतीचे सुवर्णाचे क्षण मला माझ्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आता माझे मार्गदर्शक झाले आहेत. माझ्या गाण्याची प्रत्येक मैफल माझ्या गुरीजींना समर्पित आहे. 




 राजेंद्र दिक्षित,पुणे

Thursday, July 18, 2013

उंब-याबाहेरचं जग ...


उंब-याबाहेरचं जग किती वेगळं
सुंदर, आकर्षक, डोलणारं
प्रत्येक दिवस तिथं फुलत असतो
स्वप्नांना रोज झुलवीत असतो


चालताना फुले दिसतात.
पक्षी ऊडताना पाहता येते
वाहनातून शाळेत जाणारी ती पोरं दिसतात
मन पुन्हा शाळेत जाऊन बसतं
तिथली मुले ..शिक्षक..फळा आणि मित्रांसोबत घातलेला धिंगाणा .. सारं..
पुढे काळ बराच गेला..शाळा फुटली
महाविद्यालय दिसले....
बेगळ्याच दुनियेत गेलो 

आयुष्याला बहर आला.. 

सारं काही तेच असतं
वय वाढते
वर्ष ओघळून जातात
दाराबाहेरच जाणं कमी होत
बाहनांची भिती वाटते
दुःखांना झेलणं झेपत नाही
समोरच्यांचा बोलण्याचाही राग येतो..
काही करावसं वाटत नाही
पडून रहावं... शांतपणे
मग बाहेर कधीतरी पडलं..
तर मन मागे जातं...
बस्स आता एवढचं



- subhash inamdr,pune
subhashinamdar@gmail.com