Friday, April 16, 2010

आता बोलायलाच हवे


कुणीतरी आता सांगायलाच हवे
सोसत नाही ते बोलायलाच हवे
जगण्यात आता अर्थ नाही
बदलेल म्हणणेही सत्य नाही
सारा समाज गोठलाय
महागाईच्या खाईत लोटलाय
कुणी कुणाला सागायचे
हाच खरा प्रश्न आहे
राजकारण्यांना चाड नाही
अस्तित्वाचीच ओढ आहे
डाळ, साखर, भाजी महाग झाली
दूधाचीही किंमत वाढली
त्याचे कुणाला काय?
तरीही जनता जगते आहे
सण-जयंत्या साज-या करताहेत
कुणी कुणायला सांगायचे हाच खरा प्रश्न आहे
कुणी कुणाचे ऐकायचे हाही एक प्रश्न

सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com mob: 9552596276

Wednesday, April 14, 2010

शाहू मोडक अवतरले पुस्तकातून....

मे ११ एकोणीसशे ९३ ला देवतेसमान अध्यात्मिक पुरूषोत्तमाचे निधन झाले खरे. पण शाहू मोडकांच्या आठवांनी पुन्हा एकदा एस एम जोशी सभागृहातला प्रत्येक रसिक गहिवरून गेल्याचे दृष्य अनुभवले. माणूस असतानाचा साक्षात्कार वेगळा आणि त्यांच्या जाण्यानंतर सुमारे १७ वर्षानंतर जगलेल्या क्षणांचा साक्षात्कार होणे वेगळे. यातच सुशिलकुमार शिंदेंसारखे रसिक सांस्कृतिक आणि दिलदार व्यक्तिच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व्हावे. हाही एक योग आगळी होता.
केंद्रात उर्जा मंत्रीपदाची शाल अंगावर घेत सुशिलकुमार यांनी रसिकांनी शाहू मोडकांच्या ज्या आठवणी ज्या सहजतेने रसाळपणे ऐकवल्या त्यामुळे शाहू मोडकांची वेगळी ओळख झाली.
आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका अभिजात आभिनयाने जिवंत करणारे शाहूजी ह्यांचे देवत्व रसिकांनी मान्यच केले होते पण त्यांच्यातल्या भविष्यकाराचे रूप सुशिलकुमारांच्या भाषणातून प्रकर्षाने बाहेर आले. मंत्री असूनही पुस्तक दोनदा वाचून ते भाषणासाठी तयारी करून आले होते. मंत्री येताना वाचून येत नाहीत असा गैरसमज त्यांनी दूर तर केलाच पण आजही असे मंत्री आहेत जे कार्यक्रमांना जाण्यापूर्वी अभ्यास करून जातात. याचाही उल्लेख करायला ते विसरले नाहीत.
शाहू मोडक आणि प्रतिभाताईंची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. ती आजच्या प्रेमविरांनी वाचायलाच हवी. यात नाट्यपूर्णता आहे आणि सत्यताही.

सर्वधर्मसमभावाचे उदाहरणही पुस्तकातून सामोरे येते. शाहूराव ख्रिच्शन तर प्रतिभाताई जैन.
ही सारी वाक्ये घेताना सुशिलकुमार मधूनच पुस्तकातल्या उता-यांचा आधार घेत होते. अध्यात्मिक दर्शन घडविणारे हे पुस्तक आहे. ते नुसतेच मराठीत नवहे तर इतर भाषेतूनही निघायला असे असे शिंदेयांनी मुद्दाम सांगितले.
जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला आहे. मात्र ते सांगताना जैन धर्मातील साध्वींच्या मनाचा विचार करण्याची गरज आहे , असे आपले स्पष्ट मतही मांडायला ते विसरले नाहीत.
विषय कलावंताच्या व्यसनावर गेला तेव्हा राजकपूर घराण्यातले सर्वच थोड्याफार प्रमाणात दारूच्या आहारी गेल्याचे उदाहरण सांगताना त्यांनी कलाकारांना त्यांच्या अभिनयातून ओळखले जावे. अभिनय करताना त्यांना किती दिव्याच्या सामना करत भूमिकेत शिरावे लागते याचा विचार करून त्यांच्या इतर बाबींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही रसिकांनी दिला.
पुण्यात झालेला हा पुस्तक समारंभ म्हणजे एक नकळत साधलेली शब्दांची मेजवानीच होती. उपदेशही होता आणि माणसात असलेल्या देवत्वाचे स्वरूपही पुस्तकरूपाने बाहेर येत होते.
  • अमेय प्रकाशनच्या सोहळ्याची ही पर्वणी घडवून आणली ती सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकीत केलेल्या शाहू मोडक... प्रवास..एका देवमाणसाचा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात
बेबी शकुंतला, प्रतिभाताई मोडक आणि सुशिलकुमारांचे भाषण यातून शाहूरावांच्या कार्याची दिशा आणि अध्यात्माची प्रचिती येत होती.
अर्जूनमय रसिकांना शाहूरावांच्या जीवनातून श्रीकृष्णाने सांगितलेली गीताच प्रतिभाताईंच्या तोंडून रसिक-वाचकांच्या समोर मांडली गेली. प्रश्न एवढाच आहे की कीती जणांच्या वाचनात ही अध्यात्मिक गीता येते ते .आणि किती जण त्यातून प्रत्याक्षात आचरणात आणतात ते ?

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, April 2, 2010

मनातले सांगायलाच हवे

साठलेले मनात बोलायचे असते
कधी शब्दात, कधी देहबोलीतून
व्यक्त व्हायचे असते
सतत काहीतरी विसरत असतो
नको तेच आठवत असते
क्धीतरी कुठेतेरी भेटायला हवे
मनातले ते सांगायलाच हवे


सुभाष इनामदार, पुणे

Tuesday, March 30, 2010

साहित्य गर्दीने काय साधले .....


गेली काही महिने पुणे गाजते आहे ते ८३ व्या साहित्य संमेलनामुळे. दोनच दिवस झाले तो धुरळा खाली बसू लागला आहे. प्रत्यक्ष ते पार पडल्यानंतर आता वादावरचे पडदे दूर होत होऊन नेमके यातून काय साधले याची चर्चा होऊ लागली आहे. अजून खर्चाचा आकडा बाहेर यायचाय. पण दोन कोटींचा आकडा पार झाला असावा असा अंदाज आहे. साहित्यप्रेमी आले . वादात उभें राहिलेलें पुस्तकांचे दालनात लाखोंची उलाढाल झाली.
डॉक्टर श्री .सतीश देसाईंचे नाव गाजले. अचानक विंदांचे निधनाने हळवा झालेला रसिक गर्दी करून गेला. त्यांच्या जागी ना धो महानोरांची नियुक्ती झाली.
विंदांच्या एका हाताने त्यांनी या साहित्य सोहळ्याचे दीप प्रज्वलित झाले. अजित पवारांची हजेरी लागली. द भिंचे भाषण झाले. दरबारात उत्साह आला. त्याच त्या परिसंवादाने मंडप डोलू लागले .
काव्य कट्टा ओसंडून वाहत काव्याची तिरंदाजी भिरभिरत होती.परदेशांत तयार होणाऱ्या साहित्यावरच्या चर्चेला रंग भरत गेला.
समारोपाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बरोबर अमिताभ बच्चन यांची हजेरी लागणार की नाही याचीही चर्चा प्रसारमाध्यमांनी रंगवत ठेवली .अभिव्यक्तीच्या मुद्यावर बोलायाला एक दिवस आधीच मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंडपात हजर झाले. कॉंग्रेसच्या दालनात गडबड पाहून मुख्यमंत्री वादात न अडकता विंदांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून ते परत फिरले .
समारोप समारंभाला पद्मभूषण डॉक्टर सत्यव्रत शास्त्री यांना हजर करून संस्कृत साहित्याचीही थोरवी गायली गेली . अमिताभ बच्चन यांच्या तोंडून हरीवंशराय बच्चन यांच्या हिंदी साहित्याची उदाहरणे ऐकता आली. महानायकाला पाहण्यासाठी आणि त्यांचा आवाज कानात साठवुन ठेवण्यासाठी साहित्यिक रसिक प्रचंड संख्येने जमला होता .
द भि कुलकर्णी यांनी हा समारोप नसून ही तर सुरवात असल्याचे सुतोवाच करून या मराठीतल्या या महाकुंभात सामील झालेल्या सर्वांचे आभार मानले .
झाले साहित्याचा महाकुंभ तर संपला . यातून मराठी भाषेला काय मिळाले ?
यातुन कुणाचा फायदा झाला ? इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या मराठी मनावर याचा किती असर झालाय ?
यातून मराठी माणसे जोडली गेली . पण मराठी मन जागृत झाले का ?
रोजचे जगणे जिथे कठीण होत आहे त्याला हा साहित्य सोहळा कसा रुचेल ?
मराठी वाढली पाहिजे . तिचे संगोपन झाले पाहिजे . विविध भाषेतील चांगले साहित्य मराठीत आले पाहिजे. त्यासाठी मराठी विद्यापीठ होणे हाच उपाय आहे काय?
सारेच प्रकरण गंभीर आहे. याची उपाययोजनाही तेवढ्या गांभीर्याने करण्यात येते काय ?
खरेच सोहळा पार पडला मात्र यातून काय साधले गेले ?
तुमचे मत मोकळेपणाने लिहाल काय ............

सुभाष इनामदार , पुणे
subhashinamdar@gmail.com

Wednesday, March 17, 2010

आता उरलो संस्कारापुरते


गुढी पाडवा. .चैत्र शुध्द एक. भारतीय नव्या वर्षाचा पहिला दिवस. देशात ही सार्वजनिक सुट्टी होती. हिंदू धर्मात या सणाचे महत्व मोठे आहे. नव्या कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो. नवे संकल्प केले जातात. नव विचारांची, आचारांची सुरवात होते.


सामान्य वर्गात आपल्या ऐपती प्रमाणे गुढी उभारून गोड केले जाते. नवे कपडे घालून देवाला पाया पडायला जाण्याची प्रथा आहे. एकमेकांच्या घरी जावून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. असे कितीतरी.....


पण कालचा अनुभव पहाता. कालाय तस्मैन महाः .. काळ बदलला. विचार वेगळे होत चालले. संगणकाचे युग आले. एस एम एस वाजू लागला. सोवळ्याच्या जागी साधे कपडे आले. अंगणे गेली. दारे छोटी झाली. रांगोळी गायब होवून तिथे शहाबादी फरशीच्या उंबरठ्यावर तुळशी बागेतली कायमची अशी चिटकवलेली पट्टी आली. लवकर उठण्याची घाई नसल्याने टिव्ही पाहून सावकाश , पेपर वाचन झाल्यावर एकेकाच्या आंघोळी उरकून गाठीची माळ, सोबत तयार आणलेला हार आणि दोन रूपायला मिळालेली कडुनिंबाची काडी जोडून काठीवर वस्त्राला एकत्र करून गुढी जशी उभारली गेली. यात उत्साहापेक्षा परंपरा सांभाळणे इतकेच राहिले. घरी दुकानातून आयात केलेले गोड पदार्थ ताटात घेउन पोटावर हात फिरवत जेवणे उरकली गेली. तसाच सहजी हा सारा कार्यक्रम दिवसभरात यथावकाश पार पडला.


बाहेर गावात संस्कारासाठी निर्माण झालेल्या संस्थांची मिरवणूक नाचत होती. सणांचे ते जाहिर दशर्न होत असते. हिंदू म्हणून जन्म घेतलेते कांही निवडकच यात होते. इतर तमाम मंडळी जमेल तसा गुढी पाडव्याचा आनंद आपापल्यापरिने घरीच घेत असतात.


एस एम एस वर मात्र दिवसभर गुढी पाडव्याच्या शुभेच्छा येत असतात. पण ते कोरडे संदेश. त्यात भावनेपेक्षाही तांत्रिकता अधिक. संध्याकाळी एम पी एलच्या क्रिकेटसाठी टिव्ही समोर क्रिकेटप्रेमी सज्ज. ठराविक कार्य्रक्रमांना गर्दी. कांहीच मंडळी रस्त्यावर. बाकी आपापल्या करमणुकीत मग्न.


महागाईचा पर्वत उंचच होत चाललाय. रोजचे जिवन जगण्याचे प्रश्न आ वासून उभे. राजकारणाला भ्रष्टाचाराचा टिळा लागलेला. उद्याची भ्रात पडलेल्या सामान्य माणसांसाठी असे कित्येक सण येतात ते केवळ कॅलेंडरवर. तीथेच ते संपतात. केवळ सुट्टीचा आनंद घेत आरामत दिवस काढणे हेच महत्वाचे.माणसांची माणुसकी गोठत चालल्याचे प्रत्यय येत आहे. शेजा-यावर प्रेम करा ची संकल्पना बाजूला झालीय. शेजारी कोण आहे याची माहितीही नसते ही वस्तुस्थिती आहे.


अशातच मोबाईल, टीव्ही मालिका, आणि संगणकाने जगाला जवळ आणण्याचे यत्न होत असताना माणसाच्या संवेदना गळून पडताहेत. नजर बोथट झालीय. शरीर केवळ जगण्यासाठी धावते आहे. शिक्षणाखाली जुंपला गेलेला विद्यार्थी पुस्तकाची घोकंपट्टी करण्यात वेळ घालवतोय. यात कांही ठिकाणी मास्तरच कॉपी करणायत गुंतल्याची उदाहरणे घडताहेत. शिक्षणसम्राट धनदांडगे बनत चाललेत. नोकरीसाठी प्रयत्न करणा-याला रोज वेगळाच अनुभव मिळतोय.
कुठे चाललाय समाज. आणि आपण.


सण आणि संस्काराची नाती कुठवर बांधत ठेवायची.. हाच प्रश्न मला तरी आज पडलाय.तुम्हालाही तसेच वाटतेय ना.....मग माझ्या ब्लॉगवर आपणही प्रतिक्रया द्या...


सुभाष इनामदार, पुणे.
email- subhashinamdar@gmail.com


mob. 9552596276..


Friday, March 12, 2010

संगतकारांचा सार्थ सन्मान


उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी चिंब भिजवले. संध्याकाळी आलेल्या पावसाने जसा आनंद दिला तसाच तो काही दशके संगीत क्षेत्राला स्वतःच्या वादनकलेने तृप्त करणाऱ्या दोन वादकांनाही दिला. पावसाची उघडीप झाल्यावर या वादकांचे चाहते बाजीराव रोडवरच्या गांधर्व महावाद्यालयात दाखल झाले.
एक होते हार्मोनियमवादक नरेंद्र चिपळूणकर तर दुसरे तालवाद्य तरबेज राजेंद्र दूरकर.
दोघेही पदवीने डाॅक्टर पण त्यांचा सन्मान केला गेला तो त्यांच्या वादनक्षेत्रातल्या कामगिरीमुळे. अनेक गायकांना साथ करताना स्वतःचे कर्तृत्व सिध्द केलेले आजच्या वादनक्षेत्रातले दोन अढळपद कमावलेले दोन तारेच.

ज्येष्ठ भावगीत गायक अरूण दाते यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष दाजीकाका गाडगीळ यांच्याकडून संगतकाराचा पुरस्कार स्विकारताना पाहणे हेही भाग्य होते. गायकांना, संगीतकारांना, गीतकारांना पुरस्कार मिळतात पण जे हात गाण्य़ातला ठेका आणि सूर थेट तुमच्या मनापर्यंत पोचवितात अशा पट्टीच्या वादकांची आठवण यानिमित्ताने गांधर्व महाविद्यालयाला होते आणि ते त्यांचा सन्मान करतात यातच वादकांचे मोठेपण सिध्द होते.

यानिमित्त बोलताना अरूण दाते यांनी तर जाहिरपणे सांगून टाकले की मी जोपर्यंत गाण्याचे कार्यक्रम करत राहिन तोपर्यंत नरेंद्र चिपळूणकर हेच हार्मोनियमच्या साथीला असतील. यापेक्षा मोठा सन्मान वादकाला दुसरा कुठला असू शकेल.
राजेंद्र दूरकर यांनी आपल्या मनोगतातून या पुरस्काराबद्दल झालेला आनंद व्यक्त करताना गांधर्व महाविद्यालयाचा हा पुरस्कार म्हणजे आम्हाला मिळालेल्या पद्श्री पुरस्करासमानच आहे.
साथीदारांचा हा सन्मान म्हणजे संगातावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आहे.
यावेळी रसिकांना आपल्या कलेचा आस्वाद देण्यासाठी प्रज्ञा कुलकर्णी आणि संजिव मेंहेंदळे यांच्या सुगम गाण्याचा कार्यक्रम सादर केला गेला. याला साथ-संगत होती ती याच पुरस्कारप्राप्त साथीदारांचा. यानिमित्त अरूण दाते आणि अनुराधा मराठे यांनी एक युगलगीत सादर करून संगतकार पुरस्कार्थींना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

साथीदारांसाठी दिल्य़ा जाणाऱ्या पुरस्काराने वाद्यवादन करणाऱ्या असंख्य कलावंतांनाही प्रेरणा लाभेल.



सुभाष इनामदार, पुणे.

email_subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276

Thursday, March 11, 2010

मातृभाषेतून शिक्षण

मराठी भाषेतून शिक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत. माणसाची जडण-घडण ज्या भाषेतून होते तीच भाषा मनात ठसते. भाषेची विविध रूपे मनात आकाराला येतात. त्यातूनच मनाचे विचार बोलू लागतात. मनातले भाव त्या भाषेतून व्यक्त होत असतात. मनाची भाषा स्वतःची अशी नसते. ती घडत जाते. अगदी बालपणापासून आधी जग पाहिले जाते. एकेक गोष्टी मनाच्या कप्प्यात साठवून ठेवल्या जातात. आधी तो स्वतःला घडवतो. मगच त्याची भाषा तयार होऊ लागते.
घरात उच्चारले जाणारे शब्द. बोली. ओठातून बाहेर पडायला उतावळे होत असतात. एकदा का ते बाहेर पडू लागले की ती बोलीच ऐकतानाही छान वाटायला लागते.
एकूणच संस्काराची बीजे मनावर कोरली जातात. ती काळानुरूप विकसीत व्हायला लागताना उच्चारण्याचे शब्द बाहेर पडायला सुरवात होते. तेच शब्द येतात मातृभाषेतून. नात्यांची, संस्कृतीची खरी ओळख होते ती मातृभाषेतून. म्हणूनच प्राथमिक शिक्षणाचा पाया मातृभाषेतून दिले गेले पाहिजे.
नव्हे तो प्रत्येकाचा हक्क आहे......
या मताविषयी तुमचे विचार जुळतात काय...
नसल्यासही जरूर लिहा.....
प्रतिक्रियासाठी वाट पहातोय....

सुभाष इनामदार
email_ subhashinamdar@gmail.com
mob.9552596276

Tuesday, March 9, 2010

पहाट झाली


वयाची संध्याकाळ होताना
`सकाळ`ची साथ मिळताना

नवे धेय्य दिसत होते

संधीचे नवे दार उघडत होते


तंत्राशी नाते नवे होते

आता ते बातमीतून बोलत होते

बातमी सांगत होती मला कुठे बसवा

लेखही बोलताना सदर खुणावत होता

वर्तमानाला अधिक गतिमान करणारे

नवे माध्यम हाताळताना धीर अधीरता

तंत्राच्या कोंदणात बसवण्याची कारागिरी

दिसायला सोपी तरीही नवे प्रश्न

छापलेल्या शब्दांना इंटरनेटच्या

जगात जायचे होते

अंतरावर असलेल्या मराठी मनात

ते रुजवायचे होते


दिशा दिसू लागली

रिकाम्या जागा भरु लागल्या

तंत्रातून भाषा उमटायला लागली

संगणकावरची कळ शब्दांना आकारु लागल॓


नवी पहाट नवे तंत्र

छाप्यावाचून बातमी उमटायला लागली

फेर धरुन अंक हलू लागला

किलोमिटरची सीमा सोडून

परदेशात वाचता यायला लागल॓

विश्वची माझे घर

शब्दातून खरे झाले

२६ जानेवारी २०००

`सकाळ`चे दालन जगावर दाखल झाले

आनंदाचा वेलू गेला विश्वावरी

शांती मनाची आता झाली खरी


सुभाष इनामदार

email- subhashinamdar@gmail.com (mob. )9552596276

Wednesday, March 3, 2010

शुभचिंतन


पहिली परीक्षा दहावीची . आज लाखो मुले एकचित्ताने पेपर लिहितायत .
या लाखोंना मनापासून शुभेच्च्या .
शुभचिंतन .
कुठलेही शिक्षण माणसाला मोठे बनविते .
तुम्हीही मोठे व्हा .
चिकाटी , एकाग्रता आणि धाडस यातूनच उद्याचा नागरिक घडणार आहे .
विषय कुठलाही असला तरीही पाठांतर आणी मनन केले कि तो विषय सोपा जातो .
आजची परीक्षा हि उद्याच्या भाविष्यची नांदी आहे .
अथांग सागरात अनेक मासेही असतात , पण प्रत्येकाचे भविष्य वेगळे असते .
विद्येच्या सागरात आज तुम्ही पोहत आहात .
यातही तुमचे साव्तःचे वेगळेपण जपा.
साध्य नक्की करा .
उद्याचा काळ नक्कीच तुमचा आहे .

Friday, February 5, 2010

धारदार..बहारदार्...सुरेली..रसिली.....कटयार


कट्यार काळजात घुसली या नाटकातल्या दोन प्रसंगांची ही छायाचित्रे नाटकाच्या नव्या रुपाविषयीची कल्पना देण्यास पुरेशी आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------

तो गातो तेव्हा डोळे मिटून ऐकले की जणू वसंतराव देशपांडेच गातात.
त्याच गायकीची नजाकत राहूल देशपांडेंच्या गळ्यातून निघते. पण..आज
आजोबांनी गाजविलेल्या कट्यार मधल्या खॉंसाहेव आफताफ हुसेन यांच्या
भूमिकेत तो कसा दिसतो हे पाहण्यासाठी पुणेकरांची नजर एकवटली होती.
रंगमंचावर एंट्री झाली आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी या नव्या रुपातल्या
खॉंसाहेबांच्या प्रवेशाचे स्वागत केले. राजस्थानी हवेलीचे दर्शन देणारा जयपूरच्या
फिकट तपकीरी रंगाचा भव्य सेट नांदी नंतर डोळ्यांना सुखावतो. आणि कट्यार
नाटकाच्या जुन्या आठवणी दूर निघून जातात.
कै. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर करुन ठेवलेल्या नाटकाला तब्बल 28 वर्षानंतर साकारण्याचे
राहूल देशपांडे यांनी मनात आणले आणि ते सिध्दीस नेले.
याचे कौतूक करावे तेवढेच थोडेच आहे. आजोबांचा वारसा नातवाने अशा पध्दतीने
पुढे न्यावा ही खरी संस्कृतीची ओळख आहे. साकारताना आजोबांच्या भूमिकेत
राहूल बसले पण ती साकारली आपल्या स्वतःच्या गायकी ढेंगाने.
अगदी टेचात.
या निमित्ताने कट्यारच्या रुपाने गेले कांही वर्षे अस्तंगत पावत असलेल्या
अभिजात संगीत नाटकाला नवसंजीवनी मिळाली असे म्हटले तरच ते वावगे ठरणार नाही.
वंसतराव देशपांडे संगीत सभा निर्मित वंतराव देशपांडे प्रतिष्ठान प्रकाशित
संगीत कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता होती.
त्यामुळेच चार फेब्रुवारीची गुरुवार संध्याकाऴ संगीत रसिकांसाठी एक आनंददायी पर्वणीच होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हाऊसपुल्लची पाटी झळकत होती.
नाट्यसंपदेचे प्रभाकर पणशीकर ज्यांनी वसंतराव देशपांडें यांचे कट्यार आपल्या
संस्थेमार्फत सादर केले ते ही प्रयोगाला हजर होते.
विद्याताई अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर, रघुनंदन पणशीकर असे संगीत
आणि नाटक अनुभवलेले अनेक रसिक सारेच नाटक पाहण्यासाठी अधिर झाले होते.
नाटकाला पारंपारिक संगीत नाटकापेक्षा वेगळी ट्रीटमेंट देताना दिग्दर्शक सुबोध भावे यांनी
मूळ संहितेला धक्का न देता वंगळ्या पध्दतीने रंगमंचावर मांडले आहे.
पं. भानुशंकराचे पात्र नाटकाच केवळ संवादातून प्रकटते.
कांही वेळा वेगळे संवादही अभिराम भडकमकरींनी दारव्हेकरांच्या संवादाला साजेसे लिहले आहेत. घराणेदार गायकीची परंपरा आणि त्यातल्या अनिष्ट वृत्तीवरही नाटकात अखेरीस टिका करुन
संगीत साधकांना दिशा देण्यासाठी नवा संवाद शेवटी नाटकातून भरत वाक्य या न्यायाने दिले आहे.
तेही वेगळपण.
हेच वेगऴेपण काय आणि नाटक कसे उभे केलेय हे पाहण्यसाठी कट्यारचा प्रयोग पहायला हवा. रसिकांच्या चेहर्‍यावर याबद्दची उत्सुकता दिसत होती.
पुरुषोत्तम दारव्हेकरांचे दर्जेदार लेखन आणि पं. जितेंद्र अभिषेकींनी संगीत दिग्दर्शनाच्या रुपाने चढविलेली रुपेरी झालर या दोन्हींचा मिलाफ या नव्या नाटकातून कसा होतो आहे ते पाहण्यासाठी
पुणेकर मोकळ्या मनाने आले होते.
एकेकाळी शंकर घाणेकरांना गाजविलेल्या कविराजाच्या भूमिकेत सुबोध भावे कसा शोभतो तेही पाहणे आकर्षणाचा भाग होता.
अखेरीस खॉंसाहेबांच्या रुपात राहूल देशपांडे यांची एंट्री झाली आणि..... उत्स्फूर्त टाऴ्यांनी प्रक्षागृह
निनादले गेले. कट्यार मधल्या संवादाची पकड आणि स्वरांचे मधाळ पण धारदार
घुसळत जाणारे स्वर प्रेक्षागृहात घुमु लागले. तेव्हाच ही कट्यार रसिकांच्या काळपर्यंत
थेट पोचल्याची पावती मिळाली.
घेई छंद मकरंदनंतर टाळ्यांनी दिलेली दाद अणि राहूलच्या रुपात नटलेल्या
खॉंसाहेबांची उर्दू मिश्रीत भाषा सारेच ऐकण्यासाठी आतूर झालेले रसिक तृप्त होत गेले.
तोच पण नवा पेहराव. वाक्यातली ती खास शैली. संयमीत पण संवादातले वेगळेपण टिपत रंगमंचावर फिरलेली व्यक्तिरेखा पाहताना मन मोहरुन जात होते. यातली नाट्यपदे तो इतरही वेळा
गाजवत असे पण आज भूमिकेच्या आकृतीबंधात राहून इतरांना बरोबर घेऊन साकारली
जाणारी व्यक्तिरेखा पाहण्यात नाविन्य होते.
राहूल देशपांडे भूमिकेत दिसले छान आणि रंगलेही उत्तम. संगीत रंगमंचावर अशी ताकदीची तीही आजोबांनी गाजविलेली साकारण्याचे शिवधनुष्य त्यांनी सहजी पेलले. तो सूर त्यांनी
नेमका पकडून ठेवला होता. नाटक चढत जाताना दारव्हेकरांच्या संवादातली ताकद
पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने बाहेर येत होती.
राहूलच्या दमदार गायकीचा अनुभव घेतानाच महेश काळे यांनी सदाशिवाच्या रुपाने
साकारलेली भुमिका ठसत गेली ती त्याच्या संथ पण तळपत्या गायन शैलीने.
दुसर्‍या अंकात शेवटी सूतर पियाकी नाट्यपदातून दोन गायकींची सुरेल मैफल ऐकताना
येणारा आनंद शब्दापलिकडचा होता.
कविराजाच्या भुमिकेत संयमी आणि मोकळ्या संवादाची किनार सुबोध भावेंच्या
सहजी अभिनयातून उलगडत गेली. वाक्यांचा तोल संवादातला पोत सांभाळत ते वावरले.
दिप्ती माटे( राहूलची बहिण) अणि सौरभ काडगावकर,अमेय वाघ यांनी नटविले चांद-उस्मान
हवेलीतल्या सूरांना सांभाळत रसिकांना आपल्याबरोबर घेउन जातात.
वेदश्री ओक (उमा)यांच्या लडीवाळ सुरेल पदांनी नाटकाची उंची गाठली .
दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे यांनी नाटकात जिवंतपणा आणला. नेपथ्य, प्रकाशातून साकारलेला
हे चार तासांचे हे नाटक कविराच्या रागमालिकेत गुरफटत नाही.
स्वतःच्या रागांची मैफल मांडताना प्रकाशाच्या आणि हालचालीच्या सहाय्याने रागमालिका
वेगळीच संगीत अनुभूती देते.
संगीताची तोच बाज आणि नाटकाची गती अणि संवादफेकीतली गंमत यातून
कट्यारचा प्रयोग एक नवा आनंद देउन जातो यात शंका नाही.
महेश काळेया अमेरिकास्थित अभिषेकींच्या शिष्याने गायनात सादर केलेले कौशल्य पाहण्यासाठी
ही नवी कट्यार आपल्या काळजात घुसवून घ्यायलाच हवी.
संगीत नाटकाचे हे वैभव , ती भव्यता, ते देखणेपण आणि नाट्यपदातली करामत पाहताना
चार तास कसे जातात ते कळतच नाही.

सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com(9552596276
)