Sunday, February 19, 2012

गोनीदांच्या श्रींची इच्छेने श्रवणसंपुटे तृप्त जाहली




पुण्याच्या पावन विश्रामबाग वाड्यातील भवानी महालात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या विद्ममाने शिवजयंतीच्या पावन दिवशी गो.नी. दांडेकरांच्या लेखणीतून साकारलेले `हे तो श्रींची इच्छा`च्या कादंबरीच्या अभिवाचनातून उपस्थित शिवप्रमी संतुष्ट जाहले.
रविवारची संध्याकाळ. १९ फैब्रुवारी. २०१२. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत गोनदांच्या कन्या आणि साहित्यिक सौ. वीणा देव यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेकावर आधारित असलेले हे लेखन प्रभावीपणे सादर झाले.

राज्याला छत्रपती देणारा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक त्याची सारी पार्श्वभूमी त्यावेळचे सारे वातावरण आणि त्याकाळाची परिस्थितीचे यथोचित सादरीकरण या अभिवाचनातून श्रोत्यांच्या कानी पडले..एकूणच श्रवणसंपुटे तृप्त झाली.

सासू (डॉ.विणा देव), सासारे (डॉ.विजय देव) जावई (रुचिर कुलकर्णी) आणि नातू (विराजस कुलकर्णी) यांनी आपल्या प्रभावी वाचनातून सारा तो सोहळा..आउसाहेब आणि शिवाजी महाराज यांचे पुत्रप्रेम. गावोगावच्या लोकांना झालेला आनंद. गागाभट्ट आणि कवीभूषण यांच्या उपस्थित झालेल्या राज्याभिषेक सोहळ्याची वर्णने...सारेच ऐकून उपस्थित सारेच शिवाजी महाराजांच्या त्या काळात न्हाऊन निघाले.

गोनि दांडेकरांच्या संवादातील प्रतीभा..नव्हे त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेले असावे असे लेखणीतील जीवंतपण ही त्या लेखनाची ताकद होती. ते वाचन करताना सारेच अभिवाचक त्या काळात रमून तुमच्याशी जणू ती गोष्ट सांगताहेत असा भास होत होता.

राजगडावर ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन महाराष्टाराचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांना राज्याभिषेक कसा झाल्या त्याचे वर्णन कानात टिपून घेत श्रोतेही त्याकाळात स्वतःला नेत होते. ती भाषा. ती भावना आणि लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा अतिव आदर सारेच इथे ओतप्रोत दिसत होते.

विश्रामबागवाड्याच्या त्या महालात झुंबरांच्या साक्षिने आणि देखण्या ऐतिहासिक दरबारात बसून ऐकताना जी वातावरण निर्मिती झाली ती शब्दात सांगणे कठीण आहे. त्यासाठी पुन्हा एकदा असा अभिवाचनाचा कर्यक्रम होणे आवश्यक आहे.




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: