Friday, February 18, 2011

कविता टिकून राहिली..


काही भावना थोडक्या शब्दात व्यक्त होतात. ते माध्यम म्हणून मी कविता करत राहिलो. बातमी सविस्तर लिहिण्यापेक्षा जशी एका छायाचित्रातून जे शब्दात म्हणावचे आहे ते चटकन कळते आणि पूर्ण अर्थबोधही होतो.

केवळ प्रेमच नाही तर नातीही या शब्दकळेतून नीट बाहेर येतात. त्यांचा पोत सर्वांना थोडक्यात कळतो. सामाजिक बांधिलकीशी नाते जोडताना आपण कुणाचे तरी डोळे होतो. दुस-याचा आनंद आणि दुःखेही या माध्यमातून कळू लागतात. आणि ते सारे थेट ह्दयापर्यत जावून भिडते.

गेली ३५ वर्षे पत्रकारितेत काम करताना...जुना दैनिक तरूण भारत असेल किंवा इंडियन एक्प्रेस असेल...लोकांच्या प्रश्नात गुंफत गेलो. सकाळ समूहाची इंटरनेच आवृत्ती वृत्त संपादक या नात्याने दहा वर्षे सांभांळली... त्यात नवे प्रवाह प्रवाह पाहिले. या सगळ्यात बरे वाईट अनुभव घेतले...टक्के टोणपे खाल्ले... व्यवस्थापनाची नोकरीवर घेतनाची दृष्टी आणि प्रत्यक्षात नोकरीत रुळताना होणारे बदल अनुभवले...


सांस्कृतिक क्षेत्राचा विविध माध्यमातून आढावा घेतला. समीक्षणे लिहली...वृत्तांत नोंदविला..लेखही लिहले....

तरीही कविता टिकून राहिली..नवे अनुभव विश्व पुढे येत राहिले... आजही नव्या तंत्राची अजोड जोड घेऊन आषुष्याची वाटचाल सुरूच आहे.



अखेरीस.....


चालणे आहे तरीही असा दमणार नाही

देऊनी सारे तुला भारावलो पण दुरावलो नाही

धर्म पत्रकारितेचा माझा तो कधी संपणार नाही





सुभाष इनामदार,पुणे

Mob_ 9552596276

subhashinamdar@gmail.com

www.subhashinamdar.blogspot.com

www.culturalpune.blogspot.com

Monday, February 7, 2011

स्मरण गुरूंचे





गायन वादनाचार्य कै. पं. गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने स्वरबहार या संस्थेने व्हायोलिन वादनाची मैफल पुण्याच्या स्नेहसदनच्या दालनात शनिवारी ५ फेब्रुवारी २०११ला आयोजित केली होती. दरवर्षी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्याचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. भालचंद्र देव हा कार्यक्रम आयोजित करीत असतात.

कार्यक्रमाच्या पूर्वाधात अनेक वर्ष बबनराव हळदणकरांना साथ करणारे पुणे आकाशवाणीचे निवृत्त व्हायोलिनवादक आणि पं. डी.के.दातार यांचे शिष्य रत्नाकर गोखले यांचे वादन रंगले. प्रारंभी भिमपलास रागात विलंबित एकताल आणि द्रुत तीन ताल सादर केला. पं. गजानबुवांनी बांधलेली जयताश्री रागातली एक रचनाही सादर केली. शेवटी पं. भीमसेन जोशी यांचा अधिक देखणे हा अभंग सादर करून आपल्या सुरेल आणि गायकी पध्दतीने वादनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकरांचे शिष्य मयंक बेडेकर यांनी अतीशय समर्पक साथ केली.

उत्तरार्धात भालचंद्र देव ( पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य) आणि सौ. चारूशीला गोसावी (भालचंद्र देवांची कन्या व शिष्या) यांच्या व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगदार झाली. जुगलबंदीतून सादर केलेली मधुवंती रागातली रचना सुरेल तर होतीच पण ती तेवढीच बहारदारपणे या दोन कलावंतानी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मधुवंतीनंतर सादर झालेला राग होता श्री. या श्री रागातली पं. गजाननबुवांची मध्यलय तीनतालातली रचना सादर करून भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना तबला साथ केली ती रविराज गोसावी (चारूशीला देव यांचे पुत्र) यांनी. त्यांच्या वादनकौशल्यावर खूष होऊन रसिकांनी टाळ्याची पावतीही दिली. उत्तरार्धानंतरच्या कार्यक्रमाचे आणि एकूणच मैफलीचे संचलन राजय गोसावी यांनी केले. या पितापुत्रींचे वारंवार कार्यक्रम होवोत हिच आमची इच्छा.या कार्यक्रमाला रसिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता

गुरूंचे स्मरण करताना आजोबा. भालचंद्र देव. कन्यका आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी. तबल्यावर नातू रविराज गोसावी आणि सूत्रे हाती होती ते जावई राजय गोसावी. असा हा नात्याचा सुरेख आणि सुरेल संगम स्नेहसदनाच्या मंचावर एकत्रित झाला.

Friday, January 28, 2011

देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात





नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी
नेहमीची पारंपारिकता झुगारून देविशा फिल्मसने आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणाच इतक्या झोकदार प्रमाणे ऐटित केली की......मराठी चित्रपट सृष्टीत एक निराळा तरीही मराठीची पताका उंचविणारा चित्रपट येणार याची खात्रीच देऊळच्या निमित्ताने झासी.

वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ताने धाडसाने विषयाशी भिडलो असे ते सांगत नाना-दिलिप यांच्या अभिनयातून दोन अभिनय संपन्न नट ज्यांना आपण लहानपणी पाहिले त्यांच्याकडून ही गोष्ट चित्रपटातून साकार होताना पाहणे हा आनंदही पटकथा-संवाद लेखक गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या खास शैलीतव्यक्त केला ...त्यांच्या मनोगतातून देऊळ मधून एका समुहाची, गावाची, आजच्या काळची गोष्ट आशय गंभीर तरीही...तो विनोदी पध्दतीने चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पषट झाले.
पुण्याच्या हॉटेल प्राईडमध्ये निर्माते अभिजित घोलप यांच्या या चित्रपटाची घोषणा २७ जानेवारीला झाली. तीही वेगळ्या थाटात, दिमाखात आणि संगीताच्या निनादात.. टाळ्य़ाच्या गजरात...ते ही उर्स्फूतपणे...
फेब्रुवारीच्या चार पासून वाईजवळच्या खेड्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होत आहे. तिथे साकारणारा हा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या नजरेतून उमटत जाणार आहे.
दिलिप प्रभावळकरांच्या भाषेत सांगाचये झाले तर उमेश कुलकर्णी हा सिनेमाच्या भाषेत काम करणारा दिग्दर्शक....
नानाचा आपण फॅन असल्याची कबुली देत त्याच्या अभिनयातून त्याचा आवाका थक्क करणारा आहे... त्याच्याबरोबर काम करणे हा योग या मिमित्ताने जुळून येतोय याचा आनंदही दिलिप प्रभावळकरांनी आपल्या सत्काराच्या भाषणात व्यक्त केला.
त्यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला म्हणून नाना पाटेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार इथे करण्यात आला...या वेळी दिलिप प्रभावळकरांनी पुरस्कार मिळाल्य़ाचा आनंद नक्कीच आहे.. अजून अनेकांचा पुरस्कार होणे गरजेचे आहे... हे ही स्पष्ट केले. लगे रहो मुन्नाभाई मधील गांधींच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तेव्हा जसा आनंद झाला तसा आज होत असल्याचेही ते म्हणाले.
नाना पाटेकरांच्या शब्दातच सांगाचये म्हणजे त्याची ( दिलीप प्रभावळकरांची) पात्रता जेवढी आहे तेवढे त्याला नाव मिळाले नाही असे वाटते....दिलिपची हसवा फसवी मधली भूमिका मी कित्येक वेळा पाहिली आहे.. खरचं इतका छान....
पण त्यांने स्वतःला मराठी पुरते मर्यादित ठेवलेय....आम्हाला तो हिंदीत मिळाला नाही...
मला खूप दिवसांनी मराठीत सिनेमा करायला मिळतोय..याचा आनंद आहे...हा चित्रपट चालेल... तो तुम्हाला हसता हसता विदारक सत्य सांगेल...चित्रपट चांगला होईल याची खात्री आहे.. मला उत्तम भूमिका दिली आहे.. मी ती छान करेन असा विश्वास द्यायलाही नाना पाटेकर विसरले नाहीत. इतरवेळी ज्यांच्याशी बोलायला घाबरतो तो नाना पाटेकरांचा आविर्भाव इथे नव्हता..ते खुशीत आणि आपल्या माणसात मनसोक्त विहरत होते...

गेले दहा महिने चित्रपटाचा अभ्यास आपण करत आहोत.. आज रिजनल सिनेमाला जे चॅलेंज दिसते ते पाहून ते स्विकारून चित्रपट यशस्वी करण्यासाठी राईट टिम निवडल्याची खात्री तंत्रज्ञानाच्या क्षेत्राक़डून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राक़डे वळणा-या अभिजित घोलप या मराठी निर्मात्याने नेमक्या वेळी सांगून जिद्दीचा प्रत्यय दिला. या चित्रपटाद्वारे मार्कटिंग आणि चित्रपटाचे ब्रॅंडिंग उत्तम करण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. आपली संस्था उत्तमोत्तम विषयावरचे चित्रपट बनवून मराठी प्रेक्षकाला आनंदी बनविण्याचा प्रयत्न करेल असा आशावाद दिला.
देऊळच्या निमित्ताने ग्रामीण पार्श्वभूमि लाभलेली मराठीतील एक ब्लॅक कॉमेडी पाहायला मिळेल याची खात्री वाटते.. वळू आणि विहिर नंतर उमेश कुलकर्णी यांच्या कडून नाना पाटेकर आणि दिलिप प्रभावळकरांमधला अभिनेता ताकदीने पडद्यावर दिसेल. या दोघांचा एकत्रीतपणे साकारलेला शोवटचा प्रसंग वनटेक मध्ये तर चित्रित होईलच..पण तो क्लायमॅक्स आत्तापर्यतच्या मराठी चित्रपटात मैलाचा दगड म्हणून साकारेल असा विश्वास उमेश कुलकर्णी यांना आहे....

मराठी चित्रपटाच्या भविष्याकडे पाहताना देऊळच्या कलावंतांनी रचलेली वीट न वीट प्रेक्षकांना सजवून अनुभवता येईल.
श्रेयनामावली

देऊळ
निर्माता- अभिजित घोलप
दिग्दर्शक- उमेश कुलकर्णी
पटकथा,संवाद- गिरीश कुलकर्णी
गीतकार- स्वानंद किरकिरे
संगीतकार- मंगेश धाकडे
प्रमूख भूमिका-
नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, डॉ.मोहन आगाशे, उषा नाडकर्णी, अतिशा नाईक, किशोर कदम, विभावरी देशपांडे, ज्यांती सुभाष, मंजूषा गोडसे, हृषिकेश जोशी इत्यादी.....


सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob. 9552596276

Wednesday, January 19, 2011

चंगळवादाच्या विळख्यात कलांची अवस्था बिकट


- डॉ. अरूणा ढेरे
डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार प्रतिष्ठानामार्फत दिला जाणारा, साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा एक लक्ष रूपयांचा पुरस्कार डॉक्टर अरूणा ढेरे यांना रविवारी १६ जानेवारीला ज्येष्ठ समीक्षक-साहित्यिक चंद्रकांत बांदिवडेकर यांच्या हस्ते पुण्यात देण्यात आला. याप्रसंगी अरूणा ढेरे यांनी केलेल्या भाषणात त्यांनी हे प्रतिष्ठान साहित्याच्या गौरवाबरोबरच सामाजिक भान ठेवून ही परदेशस्थ माणसे कृतिशिल स्वायत्त संस्थांचा एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत याबद्दल अभिनंदनही केले. त्यांच्या भाषणातला काही भाग मुद्दाम सर्वांसाठी देत आहे....


प्रेमाच्या पहिल्या उच्चाराइतकचं उत्कट गाईन म्हणते मी सारे काही स्वतःमधून
आणि देवाची फूलसुपारी पदरात न्यावी जपून, वारीच्या लोटत्या गर्दी मधून
तशी नेईन म्हणते कविता भवतीच्या कोलाहालातून...
ही दिंडी खरं तर अजून पंढरपूरला पोचलेली नाही. वाटेतच आहे. पण वाटेत कुणीतरी थांबते. ते जेऊ घालतं, पाणी पाजतं आणि म्हणतं, ` बाई, इथवर आलिस ! शाबास तुझा ! आता धरला नेम सोडू नको. `
आज मिळालेला हा पुरस्कार असा आहे...


अशा पुरस्काराचं जसं व्यक्ति म्हणून लेखकाच्या वैयक्तिक वाटचालित स्थान असतं तसं आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जगातही एक स्थान असतं. एखादी मोठी पडझड चालू असताना जो गोंगाट आणि कोलाहाल असतो, त्यातून घातल्या गेलेल्या या दिलाशांच्या हाका असतात. काही चांगलं टिकलेलं आहे, वाचलेले आहे, काही सांभाळलं गेलं आहे, काही नव्याने निर्माण होत आहे- ह्यासाठी समाजाला हाक मारून हे सांगणं आहे.
पडझड तर गेल्या १००-१५० वर्षात अनेक प्रकारची झाली. घट्ट आणि चिरेबंदी कुटुंबव्यवस्थेची झाली. घातक आणि अन्यायी जातिव्यव्स्थेची झाली. आग्रही आणि एकाधिकारी धर्मव्यवस्थेची झाली. स्त्रीच्या कृतिम प्रतिमेची झाली. तिच्यासाठी निषिध्द अशा व्यवस्थेतल्या अनेक परिसरांमध्ये तिच्या अस्तित्वाला जागा निर्माण करून देण्यासाठी झाली, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांमध्ये झाली. साहित्य आणि इतर कलांमधल्या संकुचित भूमिकांचीही झाली.
ही पडझड आवश्यकच होती. पण त्याचबरोबर काही विधायक गोष्टींनाही धक्का लागला आहे. नुसत्या भौतिकवादाच्या नव्हे तर चंगळवादाच्या विळख्यात वाड्मयाची आणि खरे तर सर्वच कलांची अवस्था बिकट होत चालली आहे. जीवनाच्या संदर्भात कलेच्या निर्मितीचा आणि परिणामकतेचा विचार गौण ठरतो आहे आणि साहित्याला काय आणि इतर कलांना काय विक्रयमूल्य देण्याच्य़ा प्रक्रियेला गेल्या दोन दशकांमध्ये कमालीचा वेग आला आहे.

माणसाच्या जगण्यातही नैसर्गिकता नष्ट होण्याची प्रक्रिया काही आजच सुरू झालेली नाही. मानवी संस्कृतिच्या विकासात लगटूनच मानवेतर सृष्टीपासून माणूस दूर होण्याची प्रक्रिया अखंड सुरू आहे. आपला सांस्कृतिक विकास म्हणजे एका बाजूनं प्रचंड भौतिक प्रगतिचा इतिहास आहे. दुस-या बाजूने मानवजातीनं मानवेतर सृष्टीवर मिळवलेल्या वर्चस्वाचा इतिहास आहे.
आपण जीवनाच्या जवळ असण्याला, सृष्टीच्या लयीत असण्याला, चैतन्याचा विस्तारशील अनुभव घेण्याचा उर्मिला कसे पारखे आणि विन्मुख होत आलो आहोत याचा इतिहास आहे. आपण सर्जनाच्या प्रवाहांची मुखं बंद करीत आलो आहोत.

शतकानुशतकं आपण स्त्रियांचा, आदिवासींच्या, व्यवस्थेच्या तळाशी असणा-या माणसांचा आवाज दडपत आहोत. आपण अत्यंतिक व्यक्तिवादाच्या टोकावर चढताना सामूहिक जगण्याचं वळण नव्हे तर भानही गमावत चाललो आहोत.
साहित्यिक म्हणून या भौतिक वास्तवाचा आवाज शब्दात उमटवण्याची जबाबदारीही आम्हा लेखकांची आहे. भोवतालच्या सपाटीकरणाच्या गजबज गर्दीत आपला आवाज आणि आपला अनुभव यांचं प्रामाण्य ठेवून मनुष्यकेंद्री निर्माणात गुंतलेला साहित्यकार हे काळानं निर्माण केलेल्या संहारप्रधान प्रश्नांना सगळ्यात समर्पक आणि सर्जक उत्तर असू शकते ,असा माझा विश्वास आहे.

माणसाला जगायला, टिकायला, समृध्द व्हायला उपयोगी पडणारा या जगातला प्रत्येक लहान मोठा स्त्रोत वाचवू पाहणा-यांची जी एक अल्पसंख्य जमात आहे त्यात मी अभिमानानं सामिल आहे.
यासाठी माझ्याजवळ मदतीला आहे तो शब्द आहे. शेवटी आपलं साहित्य किती टिकेल किंवा किती गाजेल याचा विचार करून आपण लिहित नसतोच. समाजातल्या उदार, समन्वयशील, विधायक रीतीने बंडखोर आणि कसदारपणे परिवर्तनशील अशा विचारधारांचा, संस्थांचा आणि व्यक्तिंचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. अभिजतांच्या संस्कृतिला बळ देणा-या लोकसंस्कृतीक बंध-अवबंधांचा शोध घेते आहे. परंपरेच्या जड अशा संदर्भाचौकटीतून भारतीय स्त्रीला बाहेर काढून तिचा जिवंत, संवेदनशील चेहरा न्याहाळण्यासाठी धडपडते आहे.

माझ्या कवितांमधून, कथांमधून, ललित-गद्यामधून—एकूणच सगळ्या लेखनातून स्त्रीविषयक आस्थेचा एक पाझर आहे असं इतरांप्रमाणे मलाही कळतं. पण मला असं खात्रीनं वाटतं की, प्रेम आणि सर्जन या दोन्ही गोष्टींशी आतड्यानं बांधली गेलेली स्त्री आजच्या अस्थिर, पोखरलेल्या आणि तुटलेपणाचा शाप भोगणा-या जगात निर्माणाच्या बाजूनं ठामपणे उभी राहू शकते.
साहित्य ही माणसाला माणूस बनवणारी गोष्ट आहे यावर माझा विश्वास आहे.
आण तूझ्या लालसेची, आण लोकांची आभागी
आण माझ्या डोळियांची, पापणी ठेवीत जागी

मर्ढेकरांच्या या शपथेवर माझा विश्वास आहे. कविता ही आयुष्याचा चेहरा उजळून टाकणारी सोबत आहे यावर माझा विश्वास आहे. माणसांमधल्या आणि माणूस आणि सृष्टी यांच्यामधल्या संवादाच्या शक्यता शोधत राहण्यावर माझा विश्वास आहे.
जातिवंत कार्यकर्त्यांप्रमाणेच जातिवंत लेखकालाही काळानं समोर उभ्या केलेल्या दुःखांचं आणि संकटांचं भय वाटता कामा नये. फक्त त्यातला मनुष्यमैत्रीचा स्पर्श घडविणारी दुःखं नेमकी हेरता आली पाहिजेत. चैतन्यशील संकटं हेरता आली पाहिजेत आणि इतिहासाचा कौल आपल्या बाजूनं मागता आला पाहिजे.


हे शब्द तुमच्या पर्यत पोचविणारा मी नाममात्र....
सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com







-

आम्ही खूप बिझी असतो



सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

ईमेलवर पाठवतो ना ई-ग्रीटिन्ज
कोणाच्या गाठीभेटी मात्र घेत नाही
पाठवतो ऑरकुट-फेसबुकवर कलर मेसेजेस
पण समोर आलो तर ओळखतसुद्धा नाही
सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

ऑनलाइन चाटवर आम्ही सदैव हजर
ओह क्रॅप ! समोरासमोर मात्र बोलत नाही
बोलाचीच कढी नेटवर आणि बोलाचाच भात
भेट-गिफ्ट्स प्रत्यक्ष आम्ही कधी देत-घेत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

पत्रा-बित्राचा जमाना गेला कधीच
पोस्ट खात्याला आम्ही त्रास देत नाही
फोनवर बोलायला आहे कुणाला वेळ
"न्यू ईअर विश"चा फोनही आम्ही करत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही

‘थर्टी फर्स्ट’ला मात्र रात्रभर आमची पार्टी
एखादं वर्षही अज्जिबात चुकवत नाही
वेळ काढून मुद्दाम एसेमेस् करतो ना फॉरवर्ड
सेंड टू ऑल झटपट, एकाचे नावही सुटत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो
कुणाकडेच आम्ही जात येत नाही
एकदम म्हणजे
एकदमच बिझ्झी !


- अनुराधा म्हापणकर

Monday, January 17, 2011

लातुरोत्सवात विलासरावांची दूरदृष्टी


बुधवारी लातूर शहरात तीन महत्वाचे कार्यक्रम झाले आणि पत्रकारिता, सांस्कृतिक आणि सहकार आशा तिनही क्षेत्रातली मंडळी १२ जानेवारीसा एकत्रित झाली होती. यामुळे लातूर शहराला नवी झळाळी प्राप्त झाली होती. एकीकडे सुरेश भटेवरा यांना एकमतचा पत्रकारितेचा गौरव. तर दुसरीकडे लातूर मध्ये पहिल्यांदाच भरविलेल्या लातूर फेस्टिव्हलचा उत्सव. बुधवारी समारोप समारंभानंतर तर कैलाश खेरच्या गाण्यांनी लातूरकरांना संगीतात न्हाऊन काढले.
आणि एकडे मांजरा सहकारी साखर कारख्यात २० मेगावॅटच्या वीजप्रकल्पाच्या कार्याचा भूमिपूजन समारंभ ..तर कारख्याच्या मळीपासून सुरू झालेल्या रोड ६० हजार लिटर तयार केलेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन. एका मंडपात...आणि मांजरा साखर कारख्यानावर सुमारे ५००० हजार शेतक-यांच्या उपस्थितीत झालेला सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला राजकीय फडांची भाषणबाजी....
या सा-याचे श्रेय निर्विवाद जाते ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग खात्याचा भार वाहणारे लातूर जिल्ह्याचे कर्ते माननिय विलासराव देशमुख यांचेकडे....
साखर कारखान्यातील मळीपासून तयार होणारे इथेनॉलची मागणी लक्षात घेता त्याचा मोठा ग्राहक वाढू शकेल या उद्देशाने मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले. पुण्याच्या युनिव्हर्सल फोर्सेस इंडस्ट्रीजला हे युनिट बनविण्याचे काम मिळाले आणि अवघ्या सहा महिन्याच्या आत तो तयारही झाला.
प्रदीप ढोकरे ( कार्यकारी संचालक ), गिरीश देशपांडे (संचालक) आणि सतीश थोरात (संचालक) या तीन मराठी तरूणांनी हा प्रकल्प साकार केला आहे. १९९६ पासून ६० साखर कारखान्यांना विविध पातळीवर प्रकल्प तयार करून देणा-या या कंपनीचा कारखाना पुण्यात तळवडेच्या औद्योगिक परिसरात आहे. या उद्योजकांना लातूरला हा प्रक्लप उभी करण्याची संधी नामदार विलासराव देशमुख यांच्यामुळे प्राप्त झाली.. विलासरावांच्या हस्ते या प्रकल्पाचा आरंभ झाला. मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या व्यासपीठावरुन जाहिर भाषणात विलासरावांनी युनिव्हर्सल फोर्सेस इंडस्ट्रीजने इथे नुकसानीत काम केल्याचे सांगून टाकले आणि . मांजराचे काम पाहून तुम्हाला आणखी कामे मिळतील असा विश्वास दिला.शिवाय उपस्थित साखर आणि सहकार क्षेत्राच्या मंडळींना युनिव्हर्सलच्या मंडळींना युनिव्हर्स बनविण्यासाठी इतर साखर कारखान्यांनी कामे देण्याचे ठणकाऊन सांगितले.
यात त्यांच्या कामाची पावती तर होतीच पण असे प्रकल्प इतर साखर कारखांन्यांनी राबवून कारखान्यांनी स्वतःच्या ताकदीवर उभे राहावे असे आवाहनही होते. कंपनीच्या दृष्टीने विलासरावांची ही शाबासकी पुढे काम मिळण्यासाठी आणि ते तेवढेच यशस्वी करण्याचे बळ वाढविणारेही होते.
हा नविन आधुनिक तंत्रावर मल्टी प्रेशर destiletion अणि continuous फ़ेर्मेन्ततिओन वापरून हा प्रकल्प केला आहे .PLC automation असलेला हा प्लान्ट आहे . त्यातून international दर्जाचे alcohol production होत आहे . Also one can produce RS or ENA or Ethanol from Molasses,या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ५०० लोकांचा हातभार लागला..तेव्हा असे काम यशस्वी करणा-या या कंपनीचे भवितव्य किती उज्वल आहे तेच सिध्द होते.
आत्तापर्यत ५२ पुरस्कार प्राप्त झालेला मांजरा सहकारी साखर कारखाना हा आर्थक दृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. ऊस देणारा शेतकरी कारखाना योग्य भाव देते म्हणून खूष आहे.. तर सहकारी साखर कारखाना कसा यशस्वी चालवावा हे महाराष्ट्राला दाखविणारा आदर्श कारखाना आहे. सहकार खात्याचे मंत्री नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या मते आता या कारखान्याने राज्यातले तोट्यात चालणारे साखर कारखाने चालवायला घ्यावे अशी विनंतीही इथे केली.
एकूणच मांजरा साखरचा हा कार्यक्रम राज्यातल्या सर्वात मोठ्या साखर कारखान्याचा पसारा पाहण्याची संधी मिळाली याचा अधिक आनंद होतो आहे.

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
Mob_ 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com

Saturday, January 15, 2011

मराठी रंगभूमीवरचा राजहंस हरपला


मराठी रंगभूमीवर स्वतःचे युग निर्माण करणारे. एका नाट्यसंस्थेचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरणारे. कट्यार सारख्या संगीत नाटकाने मानदंड निर्माण करणारे.....आपल्या भूमिकेने राजहंसी रूप धारण करणारे....ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकरांचे निधन झाले...

आणि रंगभूमिवरचा राजहंसच हरपल्याची जाणीव झाली.

तो मी नव्हेच मधल्या पंचरंगी, बहुढंगी भुमिकांतून स्वतःचे नट म्हणून असलेले अस्तित्व हे तर पणशीकरांच्या अभिनयातला मोरपंखी तुराच जणू...

ते करताना ते भूमिका जगले.. व्यक्तिरेखेतल्या बारकाव्यांनी नाटकाला अजरामर केले,,, काळ बदलला...नटांमध्ये बदल झाले..तरीही पंतांचा तो लखोबा लोखंडेची किमयाच वेगळी.... खरेच ती सर कुणालाच आली नाही.

नाट्यसंपदेचे संस्थापक म्हणून पंतांची कामगीरी अजोड नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल. त्यांनी निर्मिती केलेल्य़ा नाटकांची यादी देण्यापेक्षा जी आज माझ्या स्मृतीत साठवली गेली आहेत...त्यांचा उल्लेख करतो.

वसंत कानेटकरांचे अश्रुंची झाली फुले मधला प्रिन्सीपॉल विद्यानंद... इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब... तो मी नव्हेच तर आहेच...थॅंक यू मि. ग्लॉड मधला इन्स्पेक्टर.... बेईमान मधली सतीश दुभाषींबरोबरची गीरणी मालकाची भूमिका....मला काही सांगायचं...आणि जिथे गवकाला भाले फुटतात मधील अभीनयाचे टोक.....सारेच....पंतांच्या अभिनयातून साकरलेल्या भूमिकांनी मराठी रंगभूमीवर रसिकांना राजहंसी रुपाचे दर्शन घडले..सामीजिक आशय..त्यातून समाजातली दरी..इतिहासात डोकावता औरंगजेबालाही त्यांनी जिवंत केले...प्रिन्सीपॉल विद्यानंदाच्या रुपाने शैक्षणीक क्षेत्रातल्या प्रवृत्तींवर केलेली टिका...

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लखोबा लोखंडेच्या रूपांतून लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणींची कथा सांगणारे आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच ला दिलेले योगदान......सारेच पंतांच्या कर्तृत्वाची त्यांच्या अभिनय केलची उतुंग उंची घडवितात.

पुरुषोत्तम दारव्हेकर..पं. वसंतरांव देशपांडे...पं.जितेंद्र अभिषेकीं या त्रयींच्या रुपाने साकारलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक तथाकथित संगीत नाटकांचा चेहराच बदलून टाकणारे नाटक देउन संगीत रसिकांना वेगळ्या विश्वात घेउन गेले...याची निर्मितीही पंतांच्या शिरपेचातला मानाचा तुराच...

असा कलावंत...असा निर्मिता... फिरता रंगमंच प्रथम रंगमंचावर आणणारे...नाट्यरिषदेला स्वतःचे बळ देणारे सामाजिक भान आणि मराठी संकृतीवर प्रेंम करणारे कलावंत म्हणून ...

आणि अवघ्या काही प्रयोगाचून तो एक राजहंस हे कर्णीच्या जीवनावरचे नाटक धाजसाने निर्माण करणारे....ज्यात कर्णाच्या भूमिकेत शोभणारे रविंद्र महाजनी...

सारेच घडविले ते प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेने....

आज नाट्यसंपदा अवघा रंग एकची झाला...ने कार्यरत..आहेच

पण पंतांची मौलिक दृष्टी आता रहाणार नाही...

मराठी रंगभूमिवर राजहंसी रूपाने वावरणारा कलावंत...आज काळाच्या पडद्याआड गेला....
त्यांच्या आठवणीतून तो दिसणार...
त्यांच्या तो मीच... या आत्मचरित्रातून ते आता वाचता येतील...त्यांच्या भुमिकांची आठवण मनात साठवून

या निर्माता, कलावंत आणि नाटकासाछी आयुष्य वेचणा-या या महान साधकाला....श्रध्दांजली.........



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

www.culturalpune.blogspot.com

www.subhashinamdar.blogspot.com

Mob. 9552596276

Thursday, January 6, 2011

मटा संस्कृतीचा `स्मार्ट` उदय



शुकवार पासून पुण्याच्या वृत्तपत्रसृष्टीत नवी मटा संस्कृती उदयाला आली आहे. तिचे अस्तित्व काही पारंपारिक पायंड्यांना कदाचित धोका निर्माण ठरू शकेल. याचे उत्तर काळच देईल. पण एक नक्की अशा नव्या रूपाची.. नव क्षितीजांची गरज पुण्याच्या वाढत्या शहराला नक्कीच होती. ती गरज महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीने ओळखली आहे.

तिचे रूप आकर्षित आहे.. तिचा चेहरा सुंदर मेकअप केलेल्या पुणेरी मुलीने अधुनिकतेचे पण साजेलशे रुप घेणा-या नवरूणीसारखे मोहक आहे. तिच्या मजकुरात नव्या तरूणाईचे पडसाद आहेत. तिला ज्यागोष्टी हव्याश्या वाटतात याचे सादरीकरण आहे....

मात्र परंपरेला जपणे ती वाढविणे आणि वृध्दिंगत करणेही तेवढेच महत्वाचे आहे..याची जाणीव या नव्या पारंपारिक वृत्तपत्रांच्या कचेरीतून काम करून समृध्द झालेल्या पत्रकारांनी जाणले असेलच...
काळाचा बोजा...आता दिवसेंदिवस वाढणारा आहे...तो न पेलणारा आहे.. नवी माध्यमे आपलेही काही ठसे तरूणाईवर कोरणार आहे...तीही काळाची गरज आहे.

आकर्षक छपाईच्या तंत्रांनी अनेक ठिकाणी होणा-या छोट्या समारंभाची दखल इथे घेतली गेली पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्राचा परिपूर्ण विचार करता..

आज वाचकात तो सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्ग आधिक आहे...जो आपल्या काही नवेपणाचे क्षेय सर्वापर्यंत जावे वाटणारा... ज्याला कलांच्या नवदालनात अजून अडखळल्यासारखे वाटते. ज्याला स्थानिकातही जागा हवी असते.. ज्याचे लक्ष सदाशिवपेठी पुणेरी माणसारखे चाणाक्ष असते....
`शीला की जवानी` बरोबरच त्याला विविध ठिकाणी घडणारे चांगल्या उपक्रमाला प्रसिध्दी हवी असते. त्याला त्या पारंपारिकतेचा ..तिथल्या मक्तेदारीचा....थोड्या आगावूपणाचा तिटकारा आहे...त्या सर्वांना ही नवी मटासंस्कृति कशी सामावून घेणार आहे ?

पुण्यात नवा `आदर्श` देताना ह्या आमच्या `स्मार्ट मित्रा`ला तमाशातला नाचा म्हणून मिरवायचे नाही तर त्याचे खरे सांस्कृतिक बळ सिध्द करायचे आहे..
आमच्यासारखे असंख्य मित्र साथीला आहेतच..पण त्याला नवेपणाचा भपका आणताना परंपरेला धरून प्रसंगी त्याची संस्कृतिक मूल्ये वाढवायची आहेत.
खात्रीने तो ती पूर्ण करेल आणि असंख्य वाचकांच्या घरात केवळ अकरा रूपयात चार महिने दिसणारा हा.. हा.. मित्र आपली खरी गरज भागवून तुमच्या घरचाच सखा बनेल.. तो बनावा हिच सदिच्छा.

आपला मटाप्रेमी,
सुभाष इनामदार, पुणे9552596276
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com

Tuesday, January 4, 2011

गोनीदांचे शब्दशिल्प- नाबाद पाचशे



ती `पडघवली` ..काल श्रोत्यांच्या मनात पुन्हा जागी झाली...त्यांनी त्यातली अंबा, म्हादू, व्यंकू आणि आक्काने आत्महत्या केलेला प्रसंग...सारेच पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचावर अवतरले ते डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव आणि रूचिर कुलकर्णी या तीन्ही कलाकारांकडून...तेही अभिवाचनाच्या रूपाने.

निमित्त ते या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे ५०० व्या प्रयोगाचे...सुदर्शनचे छोटेखानी रंगदालन फूलूनच नव्हे तर उभे राहणाही कठीण झालेले. आजपर्यत या अभिवाचनाला दाद देणा-यांचे आभार मानून पडघवलीतले..एकेक पात्र कादंबरीतून मंचावर अवतरत होते. गो.नी.दांडेकरांच्या लेखणीतून झिरपणारे ते शब्द संकलीत करून डॉ. वीणा देवांनी ते अभिवाचन एक तास चीळीस मिनीटांवर आणले. हा वेळ म्हणजे पडघवलीत मनस्वी हिंडण्याचा. व्यक्तिरेखेच्या एकेक प्रसंगानुरूप कधी बांधावर..तर कधी मामंजीच्या पडवीवर..तर कधी बंदरावर...
तीनही कलावंतींनी अभिवाचनाचा जो आदर्श पायंडा पाडून दिला आहे.. त्य़ातून शब्दातून कलाकृती किती समर्थपणे वाचकांसमोर उभी राहू शकते याचे ते उदाहरणच आहे. कादंबरीचा संक्षेप करूनही पडघवलीतील गुढरम्य वातावरण.. स्त्रीयांच्या स्वभातले कागोरे..ते कोकणातले विविध स्वभावांचे नमुने..त्याही पेक्षा..कोकण सोडून मुंबईकडे गेलेल्या माणसांनी या निसर्गाला कसे ठोकारले तेही साद्यंत स्षष्ट होते.
कधी लहान मुलगी..तर कधी सून..तीही मोठी आणि धाकटी..मामंजी..छोट्या रंग्या..म्हाहदू...नवरा..तर व्यंकू आणि त्यांचा कावेबाज डाव...सारेच उलगडत राहिले. निसर्गाने मानवाला दिलेले हे वरदान काळाच्या पडद्याआड जात आहे....

ते वाचवा... पाणी अमूल्य आहे..ते सांभाळा... गावातली सारी घरे म्हणजे एक कुटुंब ते विस्कटू देउ नका... माणसांच्या स्वभावातले दोष न घेता गुण घ्या ...एक ना दोन...अनेक निरीक्षणे गोनीदांच्या या पडघवलीच्या वाचनवातन बाहेर आली आहेत.
ती काढण्याचे सामर्थ्य ह्या निमित्ताने या आभीरूप वाचनातून बाहेर आले. ४ ते ६ जानेवारी २०१० ह्या तीन दिवशी पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा आणि जैत रे जैत अशा कादंबरीला त्रिपदीतील वाचनाचून साकारून हा एक शब्दयज्ञाचा जागर मांडला आहे. वडीलांच्या कलाकृतीचे जागरण तर यातून होईलच पण कांही समाजाला बोधही मिळेल.
महाराष्ट्रात, परप्रांतात अनेक व्याख्यानमालेत..कधी गडावर तर कधी गडाच्या पायथ्याशी ही अभिवाचनाची भ्रमणयात्रा झाली. शब्दाला साद घातली गेली.
यातून उभे राहिले ते दुर्गप्रमी. त्यांनी किल्ले पुन्हा जागृत केले. त्यातला इतिहास जिवंत केला. मावळ्यांप्रमाणे या किल्ल्यांवर हर हर महादेवचा गजर झाला. गोनीदांच्या स्मृती जागवल्या गेल्या.
अभिवाचनाने तृप्त झालेला रसिक त्यांच्या सीडीही घरी घेउन त्यांची पारायणे करत आहे. अशा नादमयी आणि संवादातून तर कधी निवेदनातून फुलणा-या या अभिवाचनाच्या सेतूला एकहजाराचीही पट्टी न लावता..ते लक्षावधी कार्यक्रमातून मराठी मुलाखाला साद घालत हजारो वर्ष होत राहोत..हिच सदिच्छा.



सुभाष इनामदार,पुणे

Subhashinamdar@gmail.com
Mob. 9552596276
www.subhashinamdar.blogspot.cpm
www.cluturalpune.blogspot.com

Sunday, January 2, 2011

स्वप्नऋतु सीडीतून तरूणाईची गाणी








स्वप्न... हेमंतातल्या गारव्यासारखी ...
गोड आल्हाददायक स्वप्न ....
चांदराती सरून गेल्यावर ....
पहाटेला गुलाबी रंग देणारी ..
ही स्वप्न
अशी हळवी, मोहक स्वप्नांची गीते देणारी स्वप्नऋतु
स्वप्ने सगळेच पाहतात. ती खरी करण्यासाठी आयुष्य वेचतात.
या स्वप्नाऋतु या श्रीरंग उ-हेकरया तरूण संगीतकाराने केलेल्या आठ गाण्यांची सीडी पुण्यात रविवारी २ जानेवारीला संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. तसा पुण्याचा असला तरी सध्या हैद्राबाद इथं नोकरीनिमित्त गेलेल्या हर्षल पाटील याच्या गीतांना या सीडीत बंदिस्त करण्यात आले आहे. ऋचा घाणेकर – थत्ते हिच्या परिराणीच्या गीताने ह्या सीडीतून तुम्ही थोडे लहानही बनाल.

संगीताच्या ह्या दुनियेत नव्याने उदयाला येणा-या या संगीतकाराच्या कामाचे कौतूक करताना त्याने केलेल्या गीतांचेही आनंद मोडक यांनी कौतुक केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निखील श्रीराव यांनी या सीडीची निर्मिती केली आहे. त्यांच्या रूपाने मराठी शब्दांवर प्रेमकरणारा आय टीतला एक तरूण पुढे आला याचा अधिक आनंद होतो. या मराठी अल्बमच्या निमित्ताने अनेक नवे कलावंत संगीताच्या क्षेत्रात दिसायला लागतात. यात संगीतकार श्रीरंग उ-हेकर हा संगीतकार. गीते लिहिणारे हर्षल पाटील आणि ऋचा घाणेकर-थत्ते. अभिषेक मारोटकर हा गायक.
तसे या स्वप्नऋतुत दोन गीतांना सुरेश वाडकरांसारखा गायक-कलावंत सामिल झाल्यानेही या नविन मंडळींना हुरूप येणार आहे. या शिवाय सारेगमप मधले दोन चेहरे ऐकता येतात एक आनंदी जोशी आणि मुग्धा वैशंपायन हे गायक.
सर्वांनीच तयार केलेला हा मराठी अल्बम मनसा या कमलेश भडकमकरांच्या संस्थेने वितरीत करण्यासाठी घेतला आहे. यातच त्याचे मह्त्व पटून जाते.
या निमित्ताने अमर ओक यांच्या बासरीवादनाची छोटेखानी मैफल रंगली. त्यांनी बासरीतून घेतलेल्या आगळ्या सुरावटींनी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत आखणी वाढ झाली. त्यांनी पोकळ बांबूच्या बासरीमधून श्रीकृष्णाने हाती धरलेल्या मुरलीची कमाल तेवढ्याच ताकदीने दाखवून बासरीवरचे नाद ह्दयात साठविण्याची संधी दिली.
आनंद मोडक यांनी सकाळच्या जाहिरातीत कांही गोष्टींचा उल्लेख केला तर दर जास्त लागतो याची खंत व्यक्त केली. ध्वनिफितीचे प्रकाशन म्हटले की ती कमर्शीअल जाहिरात होते. म्हणूनच अमर बन्सीच्या जाहिरातीतून सहभागी गायकांची नावं टाकून जाहिरात दिली आणि हा समारंभ त्याचाच एक भाग म्हणून करावा लागला यांची खंत स्पषटपणे जाणवली.

स्वरांचे सूरेल नाते ते बासरीच्या सूरातून. गायकांच्या मुखातून आणि गीतांच्या बोलातून येत होते आणि ते रसिक चाहता आनंद घेत आस्वाद घेत होता...हेच महत्वाचे नाही काय ?
तुम्हीही हा नवा मराठी गाण्यांचा...मनातल्या भावनांचा...अधु-या स्वप्नांना साकार करणारा....जरूर ऐकावा हिच इच्छा आहे....

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com
www.cluturalpune.blogspot.com