Thursday, August 30, 2012

टपल्या आणि टिचक्या




कधीकाळी मी पीडीएत होतो...तेव्हाची आठवण व्हायचे कारण..कल्याणी या ज्योत्स्ना देवधर यांच्या नाटकात आम्ही काही जण ज्यांना रंगमंचाच्या मागे काम करायची नेमणूक झाली होती...त्या नाटकात काम करणा-या हौशी ज्येष्ठ कलावंत यांचा काल मला अचानक फोन आला..त्यांचे ८४ वर्षांचे पती गेले. त्यांची बातमी कुठे देता आली तर पहावी...
सुमारे १७ वर्ष त्या बिबवेवाडीतून गावात रहायला आल्या पण मला पत्ताही नव्हता... आणि अचानक माझी आठवण...
असो..त्यांचे काम सुख,दुःख याच्या पलिकडचे आहे..ते करायला हवे..पण कुठली गाठ केव्हा पडते ते सांगता येत नाही...हेच खरे..
मदत शक्यतो सर्वांना करीवी ...तीही निरपेक्ष...अखेरीस तिच तुमची ओळख असते..


-------------------------------
फुलांच्या गंधानी घाय़ाळ करावे
असे माझे मन चिंब भरलेय
सारीकडून एकच गलका
कुणातरी झाडावरुन पडलंय...

------------------------


गेल्या पावसाची गोष्ट
धो धो कोसळत
चक्क मला भिती दाखविली
यंदा मात्र तो फिरकलाही नाही...

--------------------------

आज सकाळी या खालील दोन ओळी मनात आल्या चालीसह..

मनास माझ्या का दिसावे ?
स्वप्न उरे ते अधुरे व्हावे ...

यापुढे काही सुचलेले नाही..तुम्हाला कांही सूचत असेल तर जरुर सांगा..

Deepak Sudhakar Kulkarni
आभाळाने भरून यावे,
ओल्या हिरव्या खांद्यांवरती,
दिलवराचे गोंदण हळवे


Awadhoot Deshpande
वेली फुलांनी बहरून यावे,
चिंब मनाने मोहरून जावे
स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यावरती
प्रेमराग मधुर आळवून यावे!

-----------------------------





रोजचे जगणे निराळे
रोज नवा छळ
रोज तेच घड्याळ
रोज नवा खेळ

रोज तोच डबा
तेच सारे मित्र
रोज कामाचा ताण
रोज तेच आकडे खेळ



रोज हवा नवा थाट
रोज हवा नवा ध्यास
रोज नव्याने व्हावे
रोज स्वप्नांचे थवे

आज दिवस वेगळा
आजचा खेळ वेगळा
वेगळ्या वातारवरणात
भासतोय ताजेपणा...

-subhash inamdar.pune

--------------------
थोडं धाडस दाखव..
मनासारखं वाग..
सततचे दडपण झुगारुन दे..
ताण घेतला आहेस..

थांब..जारा विचार कर..

जन्म एकदाच लाभतो..
मग कुणासाठी पुढची संधी येणार..
याच जन्मात मुक्तपणे जग
जगासाठी नव्हे..स्वतः साठी..

मोकळेपणा खरं तर तुझ्यात आहे..
काही वर्षात मात्र तो हरवलीस..
आता मागचे सारे विसरुन जा..
मनसारखे जगत जा...!

subhashinamdar@gmail.com

-----------------------------------
आजही मोहरुन येतं मन
जेव्हा तू मला सुंदर म्हणतोस
बहरलेल्या पारिजातकासारखे
स्वच्छ अहे तुझे मन..पारदर्शी.
निखळ..काहीसे उथळ..
तरीच मला सतत वाटते
तुझ्या त्या नजरेतही मी दिसते..
इतकी सुंदर...खरचं..सांग ना..

-------------------------------

येणारा प्रत्येक सूर
गळ्यातून काढता यायला हवा
इतरांसाठी नाही तरी स्वतःसाठी
आनंद मनमुराद लुटायला हवा.

------------------------

इतकं डोकावून पाहताना वाटतं.
काहीच शिल्लक उरणार नाही.
काही वेळाने पाहिले..
तर तिथे तिळमात्रही उरणार नाही..

-------------------------

नाती जपण्यासाठी मनं मोठी असावी लागतात
मनाला स्वतःची अशी जागा नसते
दुस-याच्या भावनेत त्याचे पाय अडकलेले असतात
भावनेला समजून घतले की सारे कसे मनासारखे होते.
अशाच भावनांना सांभाळून
राखून,
शक्य असेल तेव्हा सांधून नवी नाती निर्माण करा...
तीच आयुष्यात उपयोगी पडतील..
इति-
सुबाष इनामदार, पुणे

-----------------------------

राज्य सरकारचे लेचेपेचे धोरण
नशीबी आहे महाराष्ट्राच्या
म्हणून वाढतीय गुन्हेगारी
होताहेत आंदोलने आणि निघताहेत मोर्चा
जनता रडती आहे..

पावसाने बेजान झालीय
महागाईने जर्जर
आहे का त्यांना त्याची काही पडली..
ते आपल्या आरामदायी महालात पहूडलेत

पण एक दिवस त्यांचीही वेळ येईल
मग पळता भुई थोडी होईल..
मग कितीही धावा केला
तरी कुणीही ढुंकूनही पाहणार नाही..
सावधान..वेळ भरत आली आहे...

-subhash inamdar,Pune

----------------------------




कोरी पाटी घेऊन जसे आपण शाळेत बसतो..तसेच जीवनात आहे..
तिथेही प्रत्येक दिवस ..क्षण आणि काळही नवे धडे देत असतो...
ते टिपून घ्यायचे कौशल्य जर दाखविलेत..
तर तुम्हाला सारे काही न मागता मिळेल..

इति- सुभाष इनामदार, पुणे

-----------------------

पानं उलटतात
मनं पालटतात
कालचं आज
सारेच विसरतात

------------------------
जगात न्याय नक्की आहे..
तुम्ही दुस-याला फसवलत..की समजा.. तुम्ही नक्की फसणार..मात्र तो काळ सांगून येत नाही..तो येतो आपल्या पावलाने..
स्वतः चर एखादा माणूस कसल्याही कारणावरुन ..स्पष्टच सांगायचे झाले पैशाच्या व्यवहारात...स्वतः फसलेला असेल..तर तो
स्वतः मी नाही बुवा त्यातल्या...दाखविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मी नाही हो असे केले हे सांगण्यासाठी त्याचा डंका पसरविण्याचा प्रयत्न करतो...त्याच्या हे तेव्हा लक्षात येत नाही..तो स्वतःसाठी त्यात खड्डा खणत असतो..
गोष्ट उघड्या पडू लागल्या की मग त्याचा सारा खरे पणा आमि फोलपणा बाबेर येतो...मग सारं बिंग बाहेर येते...
न्याय नक्की आहे..पण तो वेळेवर मिळत नाही हे खरं...न्यायालयातही तारखा पडून .खेटा घालून..न्याय मिळतो...पण तेही..दिर्घकाळाने तसेच हे आहे..
-सुभाष इनामदार, पुणे

------------------------------

शब्दही जखम करू शकतो..


काल सहज एका मित्राबरोबर दुपारच्या लंचला बसलो असताना. एक सहज विषय निघाला.
नोकरी सोडल्यावर खर कळतं की खुर्चीला मान असतो..तुम्ही त्या खुर्चीवर असता म्हणून लोक विचारतात...अन्यथा तसं तुम्हाला कोणी विचारत नाही....सारे काही खोटं आहे..ही दुनिया खोट्यांनी भरलेली आहे.

इनामदार, तुमचे म्हणणे बरोबर आहे...पण तुम्हाला नाही का वाटत..त्यातूनही जो तुम्हाला आज एखादा जण विचारत असेल..तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमच्या पाठीशी असेल तर त्या एकावर हा अन्याय नाही का होणार...


मी चमकलो..खरचं..हा विचार केलाच नाही. आपण सरसकट विधान करुन मोकळे झालो..
त्यातून मला वाटते..तो समोरचाही मित्र दुखावण्याची शक्यताही नाकारतचा येत नाही. पण असो , तो मित्र आहे..तो रागावणार नाही आमि गैरसमजही करुन घेणार नाही...

माझे डोळे उघडले. एका क्षणात.


आपण सहच म्हणून कांही विधाने करतो...पण त्यामुळे खरचं त्यातून कुणी दुखावलाही जावू शकतो. शेवटी आपण सहजपणे कुणावरतरी टिकेची दोन वाक्ये बोलून टाकून निराळे होतो...पण त्याची खूण इतरांना किती बोचत असेल याचा जराही विचार करीत नाही...


आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिचे निराळे स्थान असते. कोण केव्हा उपयोगी पडेल काही सांगता येत नाही. तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या काळात तुमच्या संपर्कात येणारा माणूसही तसाच असतो..तो पुन्हा कधी भेटेल आणि तुमची मदत करेल काही सांगता येत नाही..तुमच्या काळातही तो तुमच्या चांगल्यासाठी आणि इतरांच्या फायद्यासाठी काही मागत असेल..त्याचा अर्थ असा होत नाही..तो तुमच्या खुर्चीसाठी तुमच्याकडे येतोय....

इथून पुढे बोलताना जरा सावधपणे असणे आवश्यक कारण...

तोंडातून गेलेला प्रत्येक शब्दही कुठेतरी जखम करू शकतो..हे ही मान्य करायला हवे...


सुभाष इनामदार,पुणे..

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, August 27, 2012

`विभोर` या कविता संग्रहाचा `देखणा` समारंभ




हिशोब करता
आयुष्याचे
हाती उरतो
एक कवडसा...

असे म्हणत म्हणत मूळच्या पुण्याच्या पण पतीच्याबरोबर तीन खंडात ( त्रीखंडातही म्हणायला हरकत नाही) फिरस्तीपणाने जीनव जगलेल्या ...
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयाची पदवी संपादन करुन आता केवळ शब्दांत इमले उभारणा-या...
उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या `विभोर` या कविता संग्रहाचे कालच्या आणि आजच्या पिढीच्या आघाडीच्या कवीयत्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते झोकात प्रकाशन तर झालेच..




मराठी भाषेपासून दूर जाउनही नवे शब्द..नवी चाहूल
देत मराठी कवींच्या मांदायळीत एक आश्वासक नाव घेऊन आपल्या याच संग्रहातल्या कांही कवीतांना घेऊन संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबध्द केलेल्या मराठी अल्बमचे साग्रसंगीत अगदी दणक्यात पं. प्रभाकर जोग यांच्या हस्ते याच समारंभात अनावरण केले गेले.



अगदी अरुणा ढेरेंच्या शब्दात सांगाय़चे म्हणजे `देखणा` समारंभ पुणेकरांच्या साक्षीने `विभोर`मय झाला होता.

नवखेपणाच्या खुणा त्यांच्या कवीतेते जवळजवळ नाहीत असा आश्वासक सूर लावून अरुणा ढेरेंनी त्यांच्या कवीतेतल्या विलक्षणपणाची स्तुती केली... ती करताना त्या सांगतात, ` त्यांच्या कवीतेतून कानांना आणि डोळ्यांना पंचेद्रियांची ताकद मिळते, जगण्यातले बारकाने शांतपणे कवीतेतून व्यक्त करण्याची उज्जला अन्नछत्रे यांची तडफड त्यांच्या कवीतेत जाणवते..जगण्यातले हरवलेपण या कवीतेत पकडणारी ही कवीता असल्याचे सांगून त्यांच्याकडून अधिक मागणी करावी अशी विलक्षण ताकद स्पष्ट होत असल्याचे त्या सांगतात. शब्दातला अनुभव संगीतकार मिलिंद जोशी यांनी तेवढ्याच ताकदीने पोचविल्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात.

यानिमित्ताने या कवीता संग्रहाला प्रस्तावना लिहिणा-या डॉ. निलिमा गुंडी, पं. प्रभाकर जोग, उत्कर्षचे सुधाकर जोशी, सीडीचे निर्मीते फाऊंटन म्युझिक कंपनीचे संचालक कांतीभाई ओसवाल, रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, आणि यामागचे महत्वाचे नाव म्हणजे अरुण अन्नछत्रे सा-यांनी समारंभाला रंगत आणली.




मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेल्या चार गीतांची झलकही संगीताच्या ट्रॅकवर उपस्थितांना ऐकता आल्यामुळे कवीतेचा पोत आणि त्याला लाभलेले सुरेलपण अनुभवता आले. रुद्रतांडव अशा शंकराच्या विविध तालवाद्यातून निघालेले निनिद आणि त्याला सुयोग्य अशी दमदार , तडफदार शब्दांची जोड देऊन रघुनंदन पणशीकरांनी ते इतके सुंदर नटविले आहे की, त्या गाण्यासाठी का होईना ही सीडी विकत घ्यावीशी वाटेल...एकूणच संगीत देताना शब्दानां अधिक सुरेल करताना भारतीय वाद्यमेळीतून वातावरणाला आणि शब्दांना पोषक अशा सूरावटी तयार करुन त्या तेवढ्याच ताकदीच्या गायकांकडून गाऊन घेऊन हा अल्बम ऐकण्यासारखा सजविला आहे...


रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, अन्नछत्रे यांची सध्या रोमानियात बारावीत शिकत असलेली कन्याका चैतन्या हिने या सीडीत एक नवोदित गायिका म्हणून घेतलेला सहभाग हा अभिमानाचा भाग होता..तिनेही यातल्या दोन कवींतांना आपल्या आवाजात सादर केले.



स्वतः उज्ज्वला अन्नछत्रे यांनी या सीडीत आपल्या आवाजत कवीतेचे वाचन करुन त्यातली तरलता आणि शब्दमाधुर्य रसिकांपर्यत पोचविले आहे.




उज्ज्वला अन्न्छत्रे यांची कालची अवस्था त्यांच्याच शब्दात सांगायची म्हणेज..

स्निग्ध सावळ्या अंधारी मी
माझी मजला सापडते
माझ्याशी हो ओळख माझी
नाते मजसी मम जुळते...



अशी झाली होती...आपल्याच कवीता ऐकताना त्या मलाच समजावून सांगताहेत असा भास होत असल्याचे त्या सांगतात.
संगीतकाराने कवितेचा आवाज व्हायचे असते.. एका ओळीत संगीतकाराचे या सीडीतले स्थान समर्पक शब्दात मिलिंद जोशी यांनी मांडले.

आपल्या प्रस्तावनेत डॉ. गुंडी या कवितांचे आणि कवयीत्रीचे मर्म सांगतात. त्या लिहितात, कवयित्रीकडे कवीतालेखनासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता, रचनेला चैतन्याचा स्पर्श देणीरी उत्स्फूर्तता आणि कवितेला आशयाची डूब देणारी चिंतनशीलता असल्याची ग्वाही यातील प्रत्येक कवितांमधून मिळते. या कवितांमध्ये आई आणि मुलगी असा आधिच्या आणि नंतरच्या पिढ्य़ांशी असलेला स्त्रीत्वाचा अनुबंध व्यक्त करणा-या रचना आहेत. निसर्गचित्रांनीही हे विश्व संपन्न आहे. यातील निसर्गचित्रे तरल आणि भावविभोर आहेत...( स्वत कवयित्री उत्तम चित्रकार असल्यामुळे पुस्तकाचे कव्हर आणि आतली चित्रेही त्यांनीच रेखाटली आहेत.)

`विभोर`च्या निमित्ताने मराठी भाषेची नाळ कायम ठेवणा-या असंख्य कलावंतांना आणि साहित्यिकांना तसेच कवींना मनोमन सलाम करावासा वाटतो...इथे आम्ही इंग्रजाळलेपण जपत भाषेचे मूळ सौंदर्य विसरत चाललो आहोत..पण उज्ज्वला अन्नछत्रेंसारखे अनेकजण ती भाषा..तीचे आपले पण संस्कृती आणि तिचा लहेजा सांभाळतातहेत..वाढवित आहेत.....आम्हाला त्यांचा अभिमान आहे.





`विभोर`च्या समारंभात गायक रविंद्र साठे, संगीतकार मिलिंद जोशी, पडद्यामागचे सूत्रधार अरुण अन्नछत्रे, सौ. उज्ज्वला अन्नछत्रे, नव्याने गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली चैतन्या अन्नछत्रे आणि गायक व संगीतकार रघुनंदन पणशीकर....




सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596726

Sunday, August 26, 2012

ए के हंगल एक आठवण



ए के हंगल सरांची एक आठवण जपली गेली आहे माझ्याकडनं... इप्टा या नामवंत नाट्यसंस्थेतर्फे हंगल साहेब काम करायचे, तशी इप्टाची पुण्याई मोठी, परंपराही दिमाखदार.. बलराज सहानी, दीना पाठक, शबाना आझमी नासीर.. किती नावं घेऊ?

तर प्रेमचंद लिखित गोदान या विदीर्ण करणार्या कथेवर ईप्टाने एक दीर्घांक सादर केला त्यात हंगल सर घरातले बुढे बुजुर्ग दाखवले होते, मराठीत नाना पळशिकर तसे हिंदीत हंगल सर

गोदान ही दळीद्री शेतकर्याच्या कुटूंबाची कैफियत, घरात अठराविष्व दारिद्य्र
माणूस मेला म्हणजे तो जिवंत होता याचं लक्षण मानायची वेळ

रंगभवनला गोदानचा प्रयोग होता, रविवार सकाळ दहा वाजता ,तरी गर्दी होती कारण इप्टा या संस्थेचं नावच तसं होतं
तर त्या दिर्घांकात असा एक प्रसंग रंगवला होता की दादू(हंगल सर) शेतात
काम करता करता घेरी येऊन पडतात. लगेच त्याना खाटेवर टाकून घरी आणण्यात येतं ( अर्थात हे सगळं सिंबाँलीक, आपण समजून घ्यायचं पण कलाकारांचा अभिनय असा जिवंत की समजून घ्यायला कष्टच पडायचे नाहीत)तर दादूना घरी आणण्यात यतं खाटेवर बसवलं जातं.. मुलं म्हणतात "दादू अमे हम जात रहा..कासीको भेजैदे दोपार टले पे... हंगलसराना उत्तरा दाखल फक्त हाँ हाँ म्हणून मान हालवायची होती ते कुठल्या तंद्रीत होते देवजाणे उत्तरा दाखल ते म्हणाले ओके ओके... ओके? ओके? अडाणी देहाती म्हातारा शेतकरी उत्तरा दाखल ओके ओके म्हणतो?

फार कुणाच्या लक्षात आलं नाही पण राजा बुंदेला आणि सरोज मिश्रा दोघानी कान टवकारले डोळे लकाकले.. खुदू खुदू हसू पसरलं प्रसंगाचा रसभंग झाला नाही पण... सांगायला एक किस्सा मिळाला

पण प्रयोगानंतर हंगल सरानी नटराजाच्या मुर्तीसमोर स्वता:च्या तोंडात मारून घेतली चहा काय पाणी सुद्धा प्यायला ते तयार होईनात

आताचे कलाकार रंगमंचावर चुकले की त्याला डेली वाटणं असं म्हणतात आणि त्यात फुशारकीही मारतात...काय बोलणार?

-चंद्रशेखर गोखले,मुंबई.

(फेसबुकवरुन साभार)

https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7/posts/428971113806011?notif_t=close_friend_activity

Wednesday, August 22, 2012

वेळ भरत आली आहे...


राज्य सरकारचे लेचेपेचे धोरण
नशीबी आहे महाराष्ट्राच्या
म्हणून वाढतीय गुन्हेगारी
होताहेत आंदोलने आणि निघताहेत मोर्चा
जनता रडती आहे..



पावसाने बेजान झालीय
महागाईने जर्जर
आहे का त्यांना त्याची काही पडली..
ते आपल्या आरामदायी महालात पहूडलेत
पण एक दिवस त्यांचीही वेळ येईल
मग पळता भुई थोडी होईल..
मग कितीही धावा केला
तरी कुणीही ढुंकूनही पाहणार नाही..
सावधान..वेळ भरत आली आहे...



-subhash inamdar,Pune


Monday, August 20, 2012

कीर्ति शिलेदार


बालगंधर्व रंगमंदिरी मंगळवारी एक खास समारंभ साजरा होत आहे..त्यानिमित्त...

संगीत सौभद्रचा प्रयोग विमलाबाई गरवारे हायस्कुलच्या संमेलनात त्यांनी प्रथम केला आणि मराठी रंगभूमिची पताका आपल्या खांद्यावर घेतल्याचे तेव्हा जाणविले..तो झेंडा घेऊन आज पन्नास वर्षे झाली...संगीत नाटकांची आणि स्वतःची कीर्ति एकांड्या शिलेदारासारखी मिरवत आजही त्या डौलाने मिरवत आहेत...

त्यांच्या उमेदीच्या काळातल्या भूमिकांनी संगीत रसिक वन्स मोअरची दाद देत...
दादा ते आले ना...हे वाक्य अशा काही थाटात उच्चारत की आठवण यावी ती बालगंधर्वांची .आठवण व्हावी आपली आई आणि मार्गदर्शक जयमालाबाईंची.....

जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत नाटकतल्या नामवंत कलावंतांच्या घरी दोन कन्या रत्ने जन्माला आली ती म्हणजे लता आणि कीर्ती.....त्या दोघींनी आपल्या कलासेवेचा वारसा केवळ जपलाच नव्हे तर वाढविला..सजविला आणि नटविलाही...



आज कीर्ती शिलेदार त्या कारकीर्दीच्या पन्नाशीच्या प्रवासात अखंड मिरवित आहेत. जयमाला शिलेदार यांच्या मार्गदर्शनासारखा दुसरा गुरु नाही हे त्या जाणतात..मानतात..म्हणूनच संगीत नाटकांची पताका आपल्या शिरावर घेऊन त्या आजही रसिकांच्या तृप्त जेह-यावर समाधान सहजपणे आणण्यात यशस्वी होत आहेत...



मायबाप प्रेक्षक हेच आपले सारे काही हे मानून ही संगीत सेवा करत अनेक शिष्यांना त्या तयार करीत आहेत..पण आज संगीत नाटकांचा वर्गच कमी होत आहे...इच्छा असूनही प्रयोग कमीत कमी कालावधीत सादर केले जात आहेत...आजूनही ती धग रसिकांच्या मनात आहे..तिचे जतन करत कीर्ती शिलेदार आणि त्यांची संगीत संस्था करीत आहे..
http://www.blogger.com/img/blank.gif


त्यांच्या यशामागे कष्टाची परंपरा आहे...गुरुंचे मार्गदर्शन आहे...रसिकांची पावती आहे आणि आई-वडिलांची पुण्याई आहे..
स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, शाकुंतल, एकच प्याला, विद्याहरण, स्वरसम्राज्ञी, सौभद्र किती नावे घ्यावीत तेवढया नाटकात त्यांच्या भूमिका आहेत...शिवाय नाट्यसंगीत ऐकणारा चाहता वर्गही निर्माण झाला आहे...
परंपरेची जोपासना यापुढेही उत्तम घडावी हिच नटेश्वरापाशी इच्छा..




सुभाष इनामदार ,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


http://www.esakal.com/esakal/20120725/4971840578510423152.htm

Tuesday, August 14, 2012

मनात गाता गाणे..


मनात गाता गाणे
जग दिसे दिवाणे
मनात गाण्यातला आनंद काही निराळाच आहे..जो स्वतःपुरता मर्यादित आहे..जे गाणे केवळ स्वतःलाच ऐकू येते..इतरांना त्याचा त्रास नाही, की वेदना नाहीत.
स्वांतः सुखाय
मात्र तेच गाणे जनात म्हणायचे असले तर मात्र कठीण आहे....गवया शेजारी बसलो तर त्यांच्या ताना सहज उचलता येतात..पण त्याच पुन्हा आळवायचा प्रयत्न केला तर मात्र ...सोडा हो राव...
गाणे गात जगावे..
आमचा हा छंद आमच्यापुरताच राहू दिलाय..तो इतरांना सांगण्यासारखाही नाही...म्हणूनच
गाना आये या ना आये...गाना चाहिए...
आमचे हे गाणे...तसे गाणे नाही..मन प्रसन्न असले की सारे काही सुचते तसे...
आपण जो चष्मा घालू तसे जग दिसते....त्या रंगाचे..म्हणून गाणे म्हणत राहिलो...जग सुंदर दिसते


...


जग दिसे दिवाणे

subhash inamdar, Pune
9552596276

स्वातंत्र्य आपल्याला सांभाळता आले काय ?


स्वातंत्र्य मिळाले खरे पण ते आपल्याला सांभाळता आले काय ?
जय स्वातंत्र्य...

प्रत्येक घरात वीज येणार...पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावरुन जाहिर केले...पण...वीज जोड येईल हो..पण वीजेची टंचाई..शेतात पंप आहेत..पण ते सुरु होण्यसाठी वीज नको काय....सारेच घोषणाबाजीचे दिवस...फक्त टाळ्या वाजवत ऐकायचे एवढेच आपल्या हाती आहे...

हा प्रश्न पडतो आजचे भ्रष्ट्र आणि त्रस्त लोकांचे जीवनमान पाहून...आपल्याला जे मिळविले त्याची किंमत आहे..ती पुढे पेलता आली नाही...हातात सत्ता दिली म्हणजे सामान्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करुन राजकीय मंडळींनी हा देश..लाचार आणि महागार्इने त्रस्त अशा नागरिकांचा तयार केला..त्यांना आतुन कितीही वाटले तरी आता त्यांना रोडच्या जगण्याची लढाई करावी लागते..ती रोजच्या जीवनातील प्रसंगांना आणि घरी असलेल्या भुकेल्यांसाठी कमावण्यासाठी...तो जगतो.. जीवनात कमावतो...पण सारेच व्यर्थ्य खर्ची पडते...

बेसुमार महागाईचा वरवंटा त्याला घेऱून तो आपल्याच विश्वात फिरत असतो...क्रांतीचा जयजयकार करण्याची इच्छा त्याला आहे..पण तसे बळ पायात किंवा अंगात संचारत नाही...

मिळेल मोकळा वेळ तेव्हा तो कांही प्रमाणात स्वातंत्र्यात..स्वतःच्या आनंदात जगत असतो....

कधीतीरी हे सारे बदलेल...असे कुठेतरी वाटते म्हणून स्वातंत्र्यदिनही पाळतो...सांभाळतो....पण ज्यांनी देशातल्या जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या लोकांना आपण खरच या शपथेशी प्रामाणिक आहोत काय..हा स्वतःला प्रश्न विचारायवला हवा...


चिरायू स्वातंत्र्याच्या गप्पा मारणा-या राजकीय आणि तथाकथीत नोकरशाहीला जनतेकडे पहाण्याचे बळ मिळो..हिच इच्छा...


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, August 9, 2012

अवघे पाउणशे वयमान ...! अण्णा हस्मे

गेल्याच रविवारी..५ ऑगस्ट २०१२ला आमच्या मेहुण्यांची अण्णा हस्मे यांची पंच्च्याहत्तरी बोरीवलीच्या डॉन बॉस्को शाळेच्या सभागृहात साजरी झाली..त्यांच्या कुटंबीयांची तर हजरी होतीच पण मंत्रालयात कामकरणारे त्यांचे अनेक सहकारीही त्यांच्यावरच्या प्रेमाखातर या कार्यक्रमाला हजर होते..यात आर. व्ही. कुलकर्णी, बापुराव वैद्य, मोरेश्वर उगावकर,अरविंद जोग यांचा समावेश होता..ते सारे १९५८ पासुनचे कर्यालयातले सहकारी...



माझे मेहुणे अत्यंत साधे.लाघवी आणि प्रेमळ ..त्यांनाही माझ्या मामेबहिणीबरोबर अगत्य होते सा-यांचे..
आज बहिणाच्या नसण्याची हूहहूर होती पण तरीही..
`ठेविले अनंते ...`
या न्यायाने त्यांच्या मुलाने आणि मुलीनी हा पंच्च्याहत्तरीचा सोहळा साजरा करुन त्यांच्या आयुष्यात अधिक आनंद देण्याचा प्रयत्न केला...



मोठ्या परिवाराचे आपण एक घटक आहोत..याचा आनंद जमलेल्या सा-यांना झाला..हा जरी कौटुंबिक सोहळा असला तरी आजच्या काळात...असे एकत्र येण्याचे प्रसंग फार दुर्मिळ होतात... सारे विखुरलेले नातेमंडळी आवर्जुन त्यांच्यासाठी हजर होती...



त्यांच्यासाठी एक मानपत्र तयार केले ते या प्रसंगी त्यांचेच ज्येष्ठ सहकारी बापुराव वैद्य यांच्या हस्ते रंगमंचावर दिले...त्याचेच हे दर्शन..




अवघे पाउणशे वयमान ...!

आनंदाच्या, उत्साहाच्या, हसतमुख व्यक्तिमत्वाचे ति. अण्णा हस्मे...तुम्हाला आम्हा सर्वांचा सन्मानाचा मुजरा!
अण्णा, तुम्ही आमचे स्फूर्तिस्थान. पिढ्या घडविणा-या सा-यांचे श्रध्दास्थान. आयुष्याच्या लढाईत कित्येक हादरे तुम्ही पचविलेत, परतवून लावलेत, त्यांच्याशी दोन हात केलेत. कष्टाने तुम्ही जीवन आनंदात फुलविलेत! आशेच्या प्रत्येक किरणांना तुम्ही कुटुंबियात साठविलेत!

बांद्र्याच्या दोन खोल्यातला तुमचा संसार आणि त्यात तुम्ही निर्माण केलेले सुखाचे मळे आजही आमच्या मनात कोरलेल्या आठवणीसारखे ताजे आहेत! तुम्ही घरातल्या वातावरणात स्वतःचे `तेजोमंदिर` निर्माण केलेत...रुजविलेत..वाढविलेत...आम्ही सारे त्याचे साक्षीदार आहोत...!



मंत्रालयात नोकरी करुन दीर्घकाळ तुम्ही घरात पहाट जागती ठेवलीत. म्हणून तर चारकोपच्या चार खोल्यातल्या भिंतीत तुमच्या आनंदाचा सुवास कायम दरवळत राहिलेला आहे..छंदाची जोपासना केलीत. पत्नीचे गुण हेरलेत..मुलांची उत्तम उभारी केलीत. सारे घर कसे स्वागतासाठी नटवून, सजवून ठेवलेत! पण...असो...!

अण्णा, तुमचे येणे म्हणजे आमच्या सर्वांच्या घरातला आनंदाचा उत्सव असतो..तुम्ही सतत येत रहा...सारी आमची घरे आणि मनेही तुमच्या स्वगतासाठी उत्सुक आहेत !

तुम्ही दुःखाचा लवलेशही कपाळावर न ठेवता.. आनंद घराघरात पसरवित आहात ! हाच आनंद पंच्चाहत्तरीनंतरही तुम्ही ठिकठिकाणी ऊजळवून आणाल..अण्णा, तुमचे हे उत्साहाचे झाड पहाणे..त्याखाली सावलीसारखे बसणे यातच आम्हाला धन्यता वाटते..

तुमचा आशिर्वाद..तुमचा भक्कम आधार असाच आम्हाला कायम मिळत राहो...उत्तम आरोग्याचे संपन्न जीवन यापुढेही शताब्दीपर्यंत अखंडीत राहो,,हिच आम्हा सर्वांची इच्छा...आणि त्या परमेश्वराकडे मागणे !


ति. अण्णा हस्मे....
तुमच्या पंच्च्याहत्तरीच्यानिमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने तुमचा मान राखायचा आहे..पण ते या शब्दांच्या कांही ओळीतून...आमच्या भावना त्यातून व्यक्त होतील..आणि त्या तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे...





या निमित्ताने कुटंबियांनी केलेल्या विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेताना स्वतः अण्णा हस्मे आणि इतर उपस्थित
(All Photos by Pankaj Joshi)




५ ऑगस्ट, २०१२



-Subhash Indmdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, August 1, 2012

शब्द कधी कधी धोका देतात..


शब्द कधी कधी धोका देतात..
सांगायचे ते उमटवितच नाहीत..
नको तेच सांगत सुटतात..
गैरसमजायला कारण शब्द हेच असतात..

शब्द जसे सांधतात तसेच ते तोडतातही
शब्दांना स्वतःची धार नसते..
पण धग नक्कीच असते..
ती नेमकी पोहोचते..त्या मनी
म्हणून जरा जपूनच वापरा
हे शब्दाचे शस्त्र..


सुभाष इनामदार,पुणे